गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन होऊच शकत नाही – धनंजय मुंडे #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #5मोठ्याबातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन होऊच शकत नाही'

गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन होऊच शकत नाही, असं वक्तव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

"गोपीनाथ मुंडे माझे काका होते. आमचं रक्ताचं नातं होतं. सीबीआयचा अहवाल आला त्यात हा अपघात असल्याचं समोर आलं. त्यामुळे तो मान्य करणं साहजिक आहे. पण गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचं समाधान झालं नाही," असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडेंचा अपघात नाही तर घातपात होता, असा संशयही असल्याचं त्यांनी म्हटल्याचा बातमीत उल्लेख आहे.

दरम्यान, "माझ्या बापाला काही झालं असेल, तर त्या माणसाचा जीव घेईन आणि त्यानंतर माझा जीव जागच्या जागी जाईल," असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं.

2. रॉबर्ट वाड्रा यांची आज पुन्हा चौकशी

बेहिशेबी संपत्ती आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची गुरुवारी (07 फेब्रुवारी) पुन्हा सक्तवसुली संचलनालयासमोर अर्थात EDसमोर चौकशी होणार आहे. द हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

गुरुवारी सकाळी 10.30ला त्यांची EDसमोर पुन्हा चौकशी होणार आहे.

बुधवारी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरचिटणीस आणि त्यांच्या पत्नी प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या.

'रॉबर्ट माझे पती आहेत, माझं कुटुंब आहेत. हे का होतंय, हे सर्वांना माहिती आहे', असं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

3. 'मराठा आरक्षण ही निव्वळ राजकीय खेळी'

मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे राजकीय हेतूनं प्रेरित आहे, असा आरोप आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांनी केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली आहे.

मराठा हे कुणबी असतील तर कुणबी जातीचा याआधीच ओबीसी वर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना वेगळं 16 टक्के आरक्षण देण्याऐवजी ओबीसीत सामावून घ्यावं, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीनं करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याचं आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाता कामा नये, त्यामुळे नव्यानं देण्यात आलेलं हे आरक्षण बेकायदेशीर आहे आणि ते रद्द करण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

4. निवडणुकीनंतर राम मंदिराची निर्मिती: मोहन भागवत

केंद्रात कोणातंही सरकार असो, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राम मंदिर उभारणीस सुरूवात करेल, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

एक दिवसापूर्वीच विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली होती.

देहरादूनमधल्या संघाच्या कार्यक्रमादरम्यान भागवत यांनी म्हटलं की, "कुंभमेळ्यात झालेल्या धर्म संसदेनुसारच मंदिराची उभारणी केली जाईल."

5. स्वामीनाथन आयोग लागू करणारं दिल्ली पहिलं राज्य

स्वामीनाथन आयोग लागू करणारं दिल्ली हे पहिलं राज्य बनलं आहे. दिल्लीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

केजरीवाल यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

दिल्ली राज्यात शेतकऱ्यांची संख्या जवळपास 39,000 इतकी आहे आणि राज्यात एकूण 75,000 ते 80,000 एकर एवढी शेती आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)