संजय निरुपम यांच्याविरोधात मिलिंद देवरांची मुंबई काँग्रेसमध्ये आघाडी

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक अवघी दीड-दोन महिन्यांवर आली आहे. काँग्रेस आणि भाजपनं विजयासाठी आपली पूर्ण ताकद लावण्याची तयारी केली आहे. काँग्रेसनं प्रियंका गांधींना सक्रीय राजकारणात उतरवून षटकार मारल्याचं बोललं जातंय. पण त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्ये सगळं आलबेल नसल्याचं चित्र आहे.

कारण माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट करुन जाहीरपणे मुंबई काँग्रेसच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

देवरा म्हणतात, "सध्या जे सुरु आहे त्यामुळे मी प्रचंड निराश आहे, आणि पक्षाला लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतची माझी भूमिका माहिती आहे. तरीसुद्धा माझा केंद्रीय नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. मी पक्षाच्या विचारांशी बांधील आहे."

त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की, "मला पक्षातील अंतर्गत बाबींवर सार्वजनिकरित्या चर्चा करण्याची इच्छा नाही. पण एका मुलाखतीतील काही वक्तव्यांमुळे मला मुंबई काँग्रेसबद्दलची माझी बांधिलकी पुन्हा आधोरेखित करावी लागली. मुंबई काँग्रेस ही विविधता आणि समाजिक एकोप्याच्या ताकदीचं प्रतिक आहे."

"काँग्रेसनं देशभरात एक मोठी मोहीम उघडली आहे. आपल्या अंतर्गत संघर्षामुळे मुंबई काँग्रेसच्या जनाधाराला धक्का बसता कामा नये. असं होऊ नये म्हणून मुंबईतल्या सर्व काँग्रेस नेत्यांनी एकत्र यावं," असं देवरा म्हणतात."

मिलिंद देवरा यांच्या ट्वीटनंतर मुंबई काँग्रेसमध्ये असलेला अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे? हा प्रश्न विचारला जात आहे.

त्यांच्या या विधानाचा अर्थ काय असं विचारलं असता, ज्येष्ठ पत्रकार समर खडस सांगतात, "सध्या मुंबई काँग्रेसचं नेतृत्व संजय निरुपम यांच्याकडे आहे. मुंबईमध्ये एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. या सहा मतदारसंघातल्या नेत्यांपैकी एका नेत्याकडे मुंबईची जबाबदारी येते. मग उरलेले पाच नेते हे त्या नेत्याचं नेतृत्व मान्य करतील असं नाही. "

"संजय निरुपम यांनी मुंबईची अवस्था अस्थिर करून ठेवली आहे, असं इतर नेत्यांना वाटतं. गेल्या वेळी उत्तर मुंबईतून निवडणूक लढले होते यावेळी त्यांना त्यांचाच मतदारसंघ नकोसा झाला आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला इतर नेते तयार नाहीत. विरोधी पक्षातला नेता म्हणून आंदोलनासाठी संघर्षात्मक नेतृत्व पुरवणं त्यांनी अपेक्षित होतं पण त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांच्याकडे कार्यक्रम देखील नाही. अशा स्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरं जाणं ही भीती इतर नेत्यांना वाटत आहे," असं खडस सांगतात.

संजय निरुपम यांचं नेतृत्व सर्वांना मान्य नाही का?

"मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट होते. एक देवरा गट आणि दुसरा कामत गट. आता हे दोन्ही नेते नाहीत. संजय निरुपम यांचं नेतृत्व प्रिया दत्त किंवा मिलिंद देवरा यांच्यासारखे प्रस्थापित नेते निरुपम यांचं नेतृत्व मान्य करत नाही. पण निरुपम यांचं दिल्लीमध्ये वजन आहे. तसेच निरुपम हे काँग्रेसचा मुंबईतला उत्तर भारतीय चेहरा आहे. ही बाब विसरून चालत नाही अशी मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांची कोंडी झाली आहे," असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात.

काँग्रेसला काय वाटतं?

मिलिंद देवरा यांनी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं, "मुंबई काँग्रेसमध्ये प्रश्न आहेत ही बाब आता काही गुप्त राहिलेली नाही. पण हे प्रश्न सुटू शकतात. यासाठी मुंबईतल्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे."

सध्या मुंबई काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या स्थितीबद्दल तुमचं काय मत आहे असं विचारलं असता काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले, "मिलिंद देवरा यांनी जी चिंता व्यक्त केली ती अगदी योग्य आहे. मुंबईतल्या नेत्यांना निरुपम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाटत नाही. हीच बाब मुंबईतल्या नेत्यांनी एकत्र येऊन पक्षाध्यक्षांच्या कानावर घातली आहे."

संजय निरुपम यांची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोनला किंवा मेसेजला प्रतिसाद दिला नाही.

ही कोंडी कशी सुटू शकते?

"सध्या मुंबईत असलेली कोंडी सुटण्याचा मार्ग म्हणजे जर राहुल गांधी यांनी एखादा मुंबई बाहेरचा नेता निरीक्षक किंवा समन्वयक म्हणून नियुक्त केला तर त्याच्या नेतृत्वात हे नेते एकत्र काम करू शकतील. गुरुदास कामत यांच्यानंतर सर्वांना मान्य असलेला नेता मुंबई काँग्रेसला मिळाला नाही. सध्याचं जे नेतृत्व आहे ते जनतेला तर सोडा ते काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांनाच मान्य आहे की नाही अशी शंका येते. अशा स्थितीत काँग्रेस नेतृत्व काय निर्णय घेईल हे पाहण्यासारखं राहील," असं अभय देशपांडे सांगतात.

एकीकडे देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. संभाव्य उमेदवारांनी तयारीही चालू केली आहे. अशा स्थितीत मुंबई काँग्रेसचे हे दशावतार पक्षासाठी चिंतेचा विषय झाला आहे. ज्याचं उत्तर काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींकडून हवं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)