You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिल्पा शिंदे : सही पकडे है...भाभीजी अब काँग्रेस में है
'भाभाजी घर पर है' आणि बिग बॉस 11 च्या विजेत्या शिल्पा शिंदे यांनी राजकीय आखाड्यात एन्ट्री घेतलीय. मंगळवारी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिल्पा शिंदेंनी राजकारणात प्रवेश केल्याने आता त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याची उत्सुकता आहे.
40 वर्षाच्या शिल्पा शिंदे गेल्या 20 वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. 1999 त्यांनी मनोरंजन क्षेत्रात कामाला सुरुवात केली. मात्र 2000साली स्टार प्लसवर आलेल्या 'भाभी' मालिकेतील खलनायिकेच्या पात्रानं त्यांना ओळख दिली. ही मालिका 8 वर्ष सुरु होती.
त्यानंतर 'कभी आए ना जुदाई' आणि 'संजीवनी' मालिकेत त्या चित्राच्या भूमिकेत दिसल्या होत्या. याशिवाय दूरदर्शनवर 'मेहर: कहानी हक औऱ हकीकत की'मध्येही त्यांनी भूमिका केली होती.
पण 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभींच्या पात्राने शिल्पा शिंदे यांना घराघरात पोहोचवलं. या मालिकेतील त्यांचा 'सही पकडे है' हा डायलॉग अत्यंत गाजला होता. मात्र निर्मात्यांशी झालेल्या वादानंतर त्यांनी ही मालिका सोडून दिली.
कोण आहेत शिल्पा शिंदे?
शिल्पा शिंदेंचा जन्म मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला.
त्यांचे व़डील सत्यदेव शिंदे हे उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते.
शिल्पा यांनी मुंबईच्या के.सी.कॉलेजातून मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे.
त्यांनी कायद्याचं शिक्षण घ्यावं अशी वडिलांची इच्छा होती, मात्र शिल्पा यांना अभिनयात रस होता
शिल्पा शिंदे आणि वाद
'भाभीजी घर पर है' या मालिकेची लोकप्रियता शिखरावर असताना शिल्पा यांनी ही मालिका सोडून दिली. निर्मात्यांनी मानसिक त्रास दिल्याचा शिल्पा यांचा आरोप होता.
इतकंच नाही तर शिल्पा यांनी निर्माते संजय कोहलींवर लैंगिक शोषणाचाही आरोप केला होता. संजय यांच्या पत्नीनं शिल्पा यांना करिअर संपवण्याची धमकी दिल्याची तक्रार त्यांनी केली होती.
या प्रकरणात सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनबरोबर त्यांचा वाद झाला. शिल्पा यांनी त्यांच्याविरोधातही मानहानीचा खटला दाखल केला होता.
मात्र शिल्पा शिंदेंचे लैंगिक शोषणाचे आरोप संजय कोहलींनी निराधार असल्याचं म्हटलं होतं.
'भाभीजी घर पर है' मालिका सोडल्यानंतर शिल्पा यांनी 'पटेल की पंजाबी शादी'चित्रपटात एक आयटम साँगही केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)