You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंदा कोचर यांच्याकडून ICICI बँकेनं 10 वर्षांचा पगार व्याजासह मागितला परत
- Author, टीम बीबीसी हिंदी
- Role, नवी दिल्ली
चंदा कोचर यांनी व्हीडिओकॉन प्रकरणात बँकेच्या अचारसंहितेचा भंग केला आहे असं चौकशीत समोर आलं आहे. ICICI बँकेने निवृत्त न्यायाधीश बी.एन.श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती.
त्यांच्या अहवालात चंदा कोचर यांच्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसंच कोचर यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
त्यामुळे आता त्यांना कंपनीतर्फे बडतर्फ समजलं जाईल, तसंच त्यांना पगार, बोनस, निवृत्ती वेतन आणि आरोग्यविम्या सारख्या सुविधा बँकेकडून दिल्या जाणार नाहीत.
कंपनीनं त्यांच्याकडून 2009 ते 2018 दरम्यान त्यांना देण्यात आलेला पगार व्याजासह परत मागितला आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्रातलं पुरुषांचं वर्चस्व तोडणाऱ्या आणि संपूर्ण बँकिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या चंदा कोचर यांच्यावर आता CBI च्या कारवाईचं वादळ घोंघावतं आहे. चौकशी अहवालाने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
CBI ने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचा आणि फसवणुकीचा गु्न्हा दाखल केला आहे. व्हीडिओकॉन समूहाला कर्ज देण्याच्या प्रकरणात कोचर आरोपांचा सामना करत आहेत.
आज भलेही त्यांचं नाव चुकीच्या कारणांनी चर्चेत असलं तरी त्यांच्या बँकिग क्षेत्रातील कारकिर्दीवर नजर टाकली तर हा प्रवास संघर्षपूर्ण असल्याचं दिसतं आहे.
राजस्थान ते मुंबईचा प्रवास
चंदा कोचर यांचा जन्म जरी जोधपूरला झाला असला तरी त्यांनी शिक्षण जयपूरला झालं. त्यांचे वडील रुपचंद अडवाणी जयपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक होते तर आई गृहिणी होती.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या अधिकृत ब्लॉगवर त्यांच्याविषयी लिहिलं होतं. जेव्हा चंदा 13 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं.
त्यांनी मुंबईच्या जय हिंद कॉलेज मधून बी.कॉम केलं. 1982 मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर ICAI मधून कॉस्ट अकाऊंटंसी चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मधून मास्टर्स डिग्री प्राप्त केली.
मॅनेजमेंट स्टडीजमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे चंदा कोचर यांना वोक्हार्ट गोल्ड मेडल आणि अकांऊंटंसीमध्ये जे.एन.बोस गोल्ड मेडल मिळालं होतं.
1984 मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्या ICICI बँकेत रुजू झाल्या.
1955 मध्ये ICICI बँकेची स्थापना भारतीय उद्योगांना प्रोजेक्ट आधारित अर्थसहाय्य मिळावं यासाठी केली होती.
1994 मध्ये ICICI चं रुपांतर संपूर्ण स्वायत्तता असलेल्या बँकेत झालं. तेव्हा चंदा कोचर यांची असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर नियुक्ती झाली.
बँकेच्या CEO आणि पद्मभूषण
चंदा कोचर सातत्याने यशाच्या पायऱ्या चढत गेल्या. डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर अशी पदं सांभाळत 2001 मध्ये त्या बँकेच्या कार्यकारी संचालक झाल्या.
त्यांच्यावर कॉर्पोरेट बिझनेसची जबाबदारी देण्यात आली. आणि नंतर मुख्य वित्तीय अधिकारी झाल्या.
2009 मध्ये त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या. चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालीच बँकेने रिटेल क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यांना भरपूर यश मिळालं.
त्यांचं योगदान पाहता भारत सरकारने त्यांना 2011 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं.
ICICI च्या कार्यकाळात त्यांना भारत आणि परदेशात बँकेशी निगडीत विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वात ICICI बँक खासगी क्षेत्रातील दुसरी सगळ्यात मोठी बँक झाली. 2016 मध्ये दीपक कोचर यांनी चंदा कोचर यांच्या वार्षिक पगाराच्या आकड्याचा उल्लेख केला होता. तेव्हा ती 5.12 कोटी होती असं सांगितलं होतं.
फोर्ब्स मासिकाच्या 100 शक्तिशाली महिलांमध्येही त्यांचा समावेश होता.
पदाचा चुकीचा वापर
नऊ वर्षं मुख्य कार्यकारी पदावर राहिलेल्या चंदा कोचर यांच्यावर 2018 पासून संक्रांत येण्यास सुरुवात झाली. त्यांच्यावर व्हीडिओकॉन ग्रुपला कर्ज देण्याचा आणि बेकायदेशीरपणे लाभ देण्याचा आरोप ठेवण्यात आला.
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने असा दावा केला होता की व्ही़डिओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांना ICICI बँकने एप्रिल 2012 मध्ये 3250 कोटींचं कर्ज दिलं.
प्रकरण कसं समोर आलं?
व्हिसल ब्लोअर अरविंद गुप्ता यांच्या तक्रारीनंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. अरविंद गुप्ता हे व्हीडिओकॉन समुहातील एक गुंतवणूकदार होते.
त्यांनी 2016 मध्ये ICICI बँक आणि व्हीडिओकॉन समूहात झालेल्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गैरव्यवहार आणि हितसंबंधांबाबत माहिती दिली होती.
त्यावेळी अरविंद गुप्ता यांच्या तक्रारीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यानंतर त्यांनी दीपक कोचर द्वारा 2010 मध्ये प्रमोट केलेल्या NU Power Renewables कंपनीबद्दल अधिक माहिती गोळा केली.
मागच्या वर्षी इंडियन एक्सप्रेसने या प्रकरणात बातम्या प्रकाशित केल्या तेव्हा हा राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला.
ICICI बँकेनेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतला. बँकेने मागच्या वर्षी 30 मे ला घोषणा केली की संचालक मंडळ तक्रारीची सविस्तर चौकशी करेल.
नंतर या प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.एन.श्रीकृष्णा यांना सोपवली होती.
एप्रिल महिन्यात CBI ने या खटल्याचा ताबा स्वत:कडे घेतला. दीपक कोचर, व्ही़डिओकॉन ग्रुप समवेत अज्ञात लोकांमध्ये झालेल्या व्यवहाराची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली.
जूनमध्ये चंदा कोचर यांनी सुटीवर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर संदीप बक्षी यांना 19 जून रोजी मुख्य परिचालन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. चंदा कोचर यांच्या राजीनाम्यानंतर बक्षी यांना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेमण्यात आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)