You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शबरीमला प्रवेश : 'नवऱ्याने घराबाहेर काढले, पण मी कुणाची माफी मागणार नाही'
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
शबरीमला मंदिरात ऐतिहासिक प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गा यांना आता त्यांच्या पतीनेच घराबाहेर काढलं आहे. पण न्यायालयाच्या निर्णयानंतर आता पतीच्या घरी परत जाण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
"मंदिरात प्रवेश केल्यामुळे मी कोणत्याही हिंदू संस्थेची अथवा माझ्या कुटुंबीयांची माफी मागणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं मी पालन केलं आहे आणि कुणावरही अन्याय केलेला नाही. न्यायालयीन प्रक्रियेचा अवलंब करत मी माझ्या घरी परत जाईन," असं कनकदुर्गा यांनी बीबीसीला सांगितलं.
कनकदुर्गा यांना घरात प्रवेश दिला जाणार नाही, असं कनकदुर्गा यांच्या पतीनं पोलिसांना सांगितलं आहे. कनकदुर्गा सध्या एका सरकारी आश्रयगृहात राहत आहेत.
कनकदुर्गा आणि बिंदू अम्मिनी यांनी 2 जानेवारीला काही हिंदू संघटनांचा विरोध झुगारून शबरीमला मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजप आणि इतर हिंदू संघटनांच्या भीतीमुळे या दोघी लपून बसल्या होत्या.
पण कनकदुर्गा (38) घरी परतल्यानंतर त्यांना सासूनं कथितरीत्या मारहाण केली आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाला होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं.
मंगळवारी त्या घरी परतल्या तेव्हा त्यांच्या पतीनं त्यांना प्रवेश नाकारला.
हिंदू संघटनांना शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर आक्षेप आहे. इथले अयप्पा स्वामी हे दैवत ब्रह्मचारी असल्यामुळे मासिक पाळीच्या वयातील महिलांनी मंदिरात प्रवेश करू नये, असा या मंदिर संस्थानाचा तसंच संलग्न धार्मिक संघटनांचा आक्षेप आहे.
'घरात प्रवेश नाही'
"पतीनं घरात प्रवेश नाकारल्यामुळे मला सरकारी आश्रयगृहात जावं लागलं. मल वाटतं राजकीय विचारांच्या व्यक्तींच्या प्रभावाखाली त्यांना असा निर्णय घेतला असावा," कनकदुर्गा सांगतात.
"मी मंदिरात प्रवेश करणार की नाही, याबद्दल मी घरच्यांना सांगितलं नव्हतं. ज्या दिवशी मी प्रवेश केला त्याच दिवशी त्यांनी मला परत बोलावलं होतं. यानंतर तुला घरात प्रवेश दिला जाणार नाही, असं काही त्यांनी तेव्हा मला सांगितलं नव्हतं," त्या पुढे सांगतात.
28 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायलयानं शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जावा, असा आदेश दिला. या आदेशानंतर एक ऐतिहासिक परंपरा तोडल्यामुळे कनकदुर्गा यांच्या घरात वाद सुरू झाला आहे.
"मी शबरीमला मंदिरात चालले आहे, असं मी माझ्या मोठ्या भावाला सांगितलं नव्हतं. मी घरी पोहोचले तेव्हा इतरांप्रमाणेच तोही माझ्याशी वाईट वागला नाही. मी सरकारी आश्रयगृहात दाखल झाले, तेव्हा त्यानेच मला न्यायालयीन मदत मिळवून दिली. तो आजही माझ्यासोबत माझी लढाई लढत आहे. तो रोज मला फोन करून माझी विचारपूस करतो," कनकदुर्गा सांगतात.
"माझ्या लहान भावानं माझ्या या कृतीमुळे भाजपची माफी मागिल्याचं मी मीडियात ऐकलं. जर मला असं वाटत असेल मी चुकी केली आहे, तर माफीसुद्धा मीच मागितली पाहिजे. माझ्यातर्फे माझ्या भावानं माफी मागण्याची काही गरज नाही. जर मीडियात म्हटल्याप्रमाणे त्यानं माफी मागितली असेल तर तो त्याचा दोष आहे," त्या पुढे सांगतात.
'मुलांची आठवण येते'
"माझ्या मुलांची मला आठवण येते. 22 डिसेंबरपासून मी माझ्या मुलांना बघितलेलं नाही. माझ्या कुटुंबानं मात्र मला ती संधी अद्याप दिलेली नाही. 15 जानेवारीनंतर 10 मिनिटं मी त्यांच्यासोबत बोलले होते. पण, मी हे का केलं ही बाब त्यांनी समजावून सांगण्याची संधी अद्याप मला मिळालेली नाही," कनकदुर्गा सांगतात.
कनकदुर्गा यांना दोन मुलं आहेत.
सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी स्वामी अयप्पा यांच्याकडे प्रार्थना केली आहे का?
"मी स्वत:च्या फायद्यासाठी मंदिरात जाऊन देवाकडे प्रार्थना करणाऱ्या गटातील नाही. आज माझ्यासमोर असलेलं आव्हानही मला अडचण वाटत नाही. तसंच माझं संकट दूर व्हावं, यासाठी मी अयप्पा यांच्याकडेही प्रार्थना केलेली नाही," कनकदुर्गा सांगतात.
"मी धार्मिक व्यक्ती आहे आणि देवाच्या दारात स्त्री-पुरुष असा भेदभाव नसावा, असं मला वाटतं," असं कनकदुर्गा यांनी मंदिर प्रवेशानंतर बीबीसीला सांगितलं होतं.
कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कनकदुर्गा यांनी न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. पुढील आठवड्यात त्यांच्या केसवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)