शबरीमलात प्रवेश करणाऱ्या त्या दोघी म्हणतात, 'आम्ही घाबरत नाही'

    • Author, इमरान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

केरळमध्ये महिलांना प्रवेशबंदी असलेल्या शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करत इतिहास घडवला. त्यांच्या या मंदिर प्रवेशानंतर केरळमध्ये दोन दिवस बंद आणि हिंसाचार उफाळला होता. या दोघींच्या घराबाहेर निदर्शनं झाली. त्यांना धमक्या देण्यात आल्या. मात्र या दोघींच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नाही.

त्या राहत असलेलं घर सुरक्षित आहे, असं त्यांना वाटतं. त्यांनी याच घरात बीबीसी हिंदीला मुलाखतही दिली. शिवाय ज्यांनी आपल्याला धमक्या दिल्या आहेत ते त्यावर कृती करतील, असं वाटत नसल्याचे सांगायलाही त्या घाबरत नाहीत.

बिंदू अम्मिनी यांनी बीबीसी हिंदीला सांगितले, "आम्ही पहिल्यांदा नाताळच्या आदल्या संध्याकाळी मंदिर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी आमच्या दोघींच्या घराबाहेर आंदोलक होते. माझ्या घराजवळ असलेली माणसं मला कधीच काही करणार नाही, असा मला विश्वास आहे. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. आमच्या घराला घेरणारी आणि आम्हाला धमक्या देणारी माणसं कधीच काही करणार नाहीत."

या देवळात 10 ते 50 या वयोगातील स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे. मात्र वर्षानुवर्ष चालत आलेली ही प्रथा बिंदू आणि कनकदुर्गा या दोघींनी मोडली.

त्यांनी 2 जानेवारीला साध्या वेशातील मोजक्या पोलिसांच्या पहाऱ्यात मंदिरात प्रवेश केला. मंदिर प्रवेशाच्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आलं.

'भविष्याबद्दल भीती नाही'

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी निकाल दिला. कोर्टाने 4-1च्या बहुमताने परंपरेपेक्षा महिला अधिकाराला महत्त्व देत महिलांना मंदिर प्रवेशाची परवानगी दिली होती. त्यानंतर जवळपास 10 महिलांनी मंदिर प्रवेशाचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर बिंदू आणि कनकदुर्गा यांनी ते करून दाखवले.

बिंदूपेक्षा एक वर्ष लहान असलेल्या 39 वर्षांच्या कनकदुर्गा सांगतात, "मला भविष्याबद्दल कुठल्याही प्रकारची भीती नाही. माझा देवावर विश्वास आहे."

बिंदू कनकदुर्गाएवढ्या धार्मिक नाहीत. मात्र त्यांना त्यांच्या सुरक्षिततेविषयी अजिबात भीती वाटत नाही. लहानपणी अत्यंत कठीण काळ बघितल्याने कदाचित त्या इतक्या कणखर झाल्या असाव्या. त्या खूप लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि एक दिवस त्यांच्या आईने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

बिंदू सांगतात, "ती पायी निघाली आणि मी तिला विचारलं आपण किती चालणार आहोत. त्याक्षणी तिने जगण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणापासून आजवर मी खूप संघर्ष केला आहे. मला कसलीच भीती नाही."

त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. शालेय जीवनातही त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. मात्र तिथेही त्यांना भेदभावाचा सामना करावा लागला.

'मंदिर प्रवेशामागे घटनात्मक नैतिकता'

या संघर्षादरम्यान त्यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माले गट) विद्यार्थी संघटनेशी संपर्क आला. त्या संघटनेच्या कार्यकर्त्या बनल्या आणि तिथूनच प्रेरणा घेत त्यांनी कायद्याचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्यानंतर त्या महाविद्यालयात कायद्याच्या प्राध्यापिका झाल्या.

अशी पार्श्वभूमी असलेल्या या दोघी सबरीमलामध्ये महिला प्रवेशाच्या समर्थनार्थ सुरू करण्यात आलेल्या सोशल मीडिया ग्रुपशी जोडल्या गेल्या. 'आजीवन ब्रह्मचारी' असलेल्या स्वामी अय्यप्पांचं हे देऊळ. त्यामुळे या मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नाही.

या दोघींनी 24 डिसेंबरच्या संध्याकाळी पहिल्यांदा दर्शनाचा प्रयत्न केला. डोंगरावर असलेल्या या मंदिरात प्रवेशासाठी त्यांनी चढायला सुरुवात केली. मंदिरापासून केवळ दिड किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्यासोबत असलेल्या गणवेशातील पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर जाण्याच्या भीतीमुळे पुढे जायला नकार दिला.

बिंदू सांगतात, "आम्ही निराश झालो नव्हतो. पोलिसांनी आम्हाला जाण्यास सांगितले. त्यानंतर कोट्टायममधील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना सांगितले की आम्हाला पुन्हा शबरीमलाला जायचे आहे. त्यांनी आम्हाला घरी जाण्यास सांगितले. आम्ही उपोषणाला बसलो. तेव्हा कुठे शक्य होईल तेव्हा तुमची मदत करू, असं आश्वासन पोलिसांनी दिले."

2 जानेवारीला पुन्हा मंदिर प्रवेशाची मानसिक तयारी होण्याआधी या दोघीही आपल्या वेगवेगळ्या मैत्रिणींच्या घरी थांबल्या. यावेळी पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस द्यायचं ठरवलं.

मंदिरातील कर्मचारी जातात त्या मार्गाने तुम्ही गेला होतात का आणि तुम्हाला अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले का? यावर बिंदू म्हणाल्या, "नाही. प्रसार माध्यमांनी चुकीच्या बातम्या दिल्या. इतर भाविक जातात त्याच मार्गाने आम्ही गेलो होतो.

कनकदुर्गा देवावर असलेल्या निस्सीम श्रद्धेमुळे तिथे गेल्या. मात्र बिंदू यांचे तसे नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला.

त्या सांगतात, "माझ्या मंदिर प्रवेशामागे घटनात्मक नैतिकता हे महत्त्वाचं कारण होतं."

बिंदू या कनकदुर्गा यांच्याप्रमाणे धार्मिक नसल्या तरी मंदिर प्रवेशाआधी उपवासासारख्या ज्या काही धार्मिक विधी कराव्या लागतात, त्या सर्व विधी दोघींनीही केले.

त्या सांगतात, "जेव्हा मी मंदिरात पोहोचले त्यावेळी मला स्वामी अय्यप्पांकडे काहीही मागायचं नव्हतं. मात्र मी स्वामी अय्यप्पांशी बोलले. ते माझ्याशी बोलले. मला खूप आनंद झाला. मी स्वामींशी संवाद साधला. त्यांनी मला विचारले, दर्शन कसं झालं?"

दुसरीकडे कनकदुर्गा यांची स्वामी अय्यप्पांवर गाढ श्रद्धा आहे. त्यामुळेच धर्मात स्त्री-पुरुष भेद त्यांना मान्य नाही. त्या म्हणाल्या, "येणाऱ्या काळात मी पुन्हा शबरीमला इथे दर्शन घ्यायला जाणार आहे."

मात्र बिंदू यांनी शबरीमलाला पुन्हा जायचे की नाही, हे अजून ठरवलेले नाही. देवावर श्रद्धा निर्माण झाली आहे की नाही, हेही त्या सांगू शकत नाहीत, त्या म्हणतात, "कदाचित माझा विश्वास बसतोय. मात्र खात्रीने सांगता येत नाही."

असे असले तरी त्यांनी आणि कनकदुर्गा दोघींनी 'इतर महिलांसाठी शबरीमलाचा मार्ग मोकळा केल्याचा' त्यांना अतिशय आनंद आहे.

आपल्या या कृतीच्या परिणामांची बिंदू यांना पूरेपूर कल्पना आहे. त्या म्हणतात, "मला ठार मारलं जाऊ शकतं."

"आम्हा दोघींना भविष्यात सुरक्षा पुरवण्याविषयी आमचं सरकारशी काहीही बोलणं झालेलं नाही. मात्र पोलिसांनी सुरक्षा पुरवण्याची हमी दिली आहे. खरंतर मला माझ्या सुरक्षेची काळजी नाही."

तर कनकदुर्गा म्हणतात, "मी घाबरत नाही. स्त्रीने जेव्हा जेव्हा प्रगती केली आहे समाजाने त्यावर रान उठवलं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)