तर राम मंदिराचा प्रश्न 24 तासांत निकाली काढू - योगी आदित्यनाथ #5मोठ्याबातम्या

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1) तर राम मंदिराचा प्रश्न तो 24 तासात निकाली काढू : योगी आदित्यनाथ

अयोध्या प्रश्नी सुप्रीम कोर्टाला निकाल देता येत नसेल तर युपी सरकार 24 तासांत तो प्रश्न सोडवू असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडिया टीव्हीवरील 'आप की अदालत' या कार्यक्रमात म्हटलं आहे.

या शोमध्ये त्यांना राम मंदिराबाबत प्रश्न विचारला होता. "सुप्रीम कोर्टाने अयोद्धा वाद लवकर सोडवावा. त्यांना जर हा प्रश्न सोडवता येत नसेल तर तो आमच्याकडे द्यावा आम्ही तो 24 तासात निकाली काढू असं," असं ते म्हणाले.

"राम मंदिराबाबत 29 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाला परत एकदा विनंती करतो की त्यांनी वेळेवर निकाल द्यावा. त्यामुळे लोकांचं समाधान होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. जर अनपेक्षित उशीर होत असेल तर ती संस्था लोकांचा विश्वास गमावते," असंही ते म्हणाल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

2) जगातील अर्धे कुष्ठ रुग्ण भारतात : WHO

जगभरातील अर्धे कुष्ठ रुग्ण भारतात सापडत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात देण्यात आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

हा आजार, त्याबद्दलची अनास्था, रुग्णांबद्दल भेदभाव, अज्ञान यामुळे भारतात या आजाराचं प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटलं आहे.

जगभरात दरवर्षी दोन लाख कुष्ठ रुग्ण आढळतात. यातील एक लाख भारतात आढळतात. पुरेशा आरोग्य सुविधा भारतात उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या भारतात उद्भवत आहेत. भारताशिवाय ब्राझील, दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही रुग्णांची संख्या जास्त आहे.

3) ... फक्त मग माझ्या बाबतीतच हॅकरवर का विश्वास ठेवला? : एकनाथ खडसे

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू ही हत्या होती, त्यामागे ईव्हीएम मशीनमधील कथित छेडछाड हे कारण आहे, असा आरोप एका हॅकरने केला. यावर हॅकर हे खोटारडे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे भाजप सांगत आहे. मग माझ्या बाबतीतही हॅकर मनीष भंगाळे यांनी केलेल्या आरोपांवर विश्वास का ठेवला, असा सवाल भाजपचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथे केला. सरकारनामाने ही बातमी दिली आहे.

एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम यांच्यात दूरध्वनीवर संभाषण झाल्याचा व त्याचे कॉल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनीष भंगाळे यांनी केला होता.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी खडसे यांना क्लीन चीट दिली होती. जळगाव येथे एका कार्यक्रमात ते म्हणाले, "त्याने माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले? त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायल मुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला."

4) ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातील संशयित गौतम खेतान यांना अटक

आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून EDने गौतम खेतान यांना अटक केली आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर प्रकरणातील मध्यस्थ ख्रिश्चन मिशेलच्या चौकशीतून नवी माहिती उघड झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असा तपास संस्थांचा दावा आहे, असं लोकसत्ताच्या बातमीत म्हटलं आहे.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीसाठीच्या 3600 कोटी रुपयांच्या या व्यवहारात गौतम खेतान संशयित आहेत. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर प्रकरणी त्यांना गेल्या वर्षीच जामीन मंजूर झाला होता. आता EDनं खेतान यांना आर्थिक गैरव्यवहार आणि काळा पैशांच्या संशयावरून अटक केली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) ही कारवाई करण्यात आली आहे. या व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

5) स्वाइन फ्लूमुळं राजस्थानमध्ये 26 दिवसांत 70 मृत्यू

राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूमुळं शनिवारी आणखी तीन जण दगावल्यानंतर मृतांचा आकडा 70 झाला आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून म्हणजे अवघ्या 26 दिवसांत 70 जण दगावले आहेत.

यावर्षी 84 जणाना स्वाइन फ्लू झाला आहे. जयपूरमध्ये 37, उदयपूरमध्ये 12, जोधपूरमध्ये 10 आणि बिकानेरमध्ये 4 रुग्ण आढळले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)