'हो, मी विधवा आहे आणि मी विधवांसाठी हळदीकुंकू सुरू केलं'

"लग्नानंतर 25व्या दिवशीचं नवरा अपघातात वारला. माझ्या अंगावरचे दागिने उतरवले, कुंकू पुसलं गेलं. त्यावेळी मला सती प्रथेची आठवण झाली. पण चितेच्या आगीपेक्षा समाजात मिळणारे चटके जास्त त्रासदायक होते. पण नंतर मी ठरवलं विधवांना ताठ मानेने जगता आलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करायचे."

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील आवळाई गावात २०१९ मध्ये हळदीकुंकूचा कार्यक्रम झाला. पण हा कार्यक्रम वेगळा होता. विधवा असलेल्या लता बोराडे यांनी विधवा आणि सवाष्ण महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवला होता.

समाजात अजूनही विधवांना स्वीकारलं जात नाही, म्हणूनच हा कार्यक्रम वेगळी वाट घालून देणारा ठरला. लता बोराडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं. त्यांचा वेदनेच्या वाटेवरचा प्रवास त्यांच्याच शब्दात.

1973मध्ये माझा जन्म झाला आणि 19व्या वर्षी माझं लग्न झालं. पण नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. लग्नानंतर अवघ्या 25व्या दिवशीच नवरा अपघाती मृत्यूने सोडून गेला.

आपल्या रूढी परंपरेनुसार विधवा म्हणून माझ्या अंगावरचे 14 तोळे सोन्याचे दागिने उतरवले, कुंकू पुसलं गेलं, माझा हिरव्याकंच बांगड्यांचा चुडा फोडला गेला.

थोडक्यात काय, सौभाग्याची सगळी निशाणी पुसून टाकण्यासाठी सगळ्यांचे हात सरसावले. आजही त्या आठवणी फक्त वेदनाच देतात.

त्यावेळी क्षणभर सतीची प्रथा मला आपलीशी वाटली. 'माझा चुडा फोडू नका!' असं मी नातेवाईकांना ओरडून सांगत होते. कारण चितेच्या आगीपेक्षा समाजात जगताना मिळणारे चटके जास्त तीव्र आहेत, हे माझ्या लक्षात आलं होतं.

घरच्यांनी सती जाऊ दिलं नाही. पण सौभाग्याची लेणी उतरवण्याच्या माझ्या विरोधालाही त्यांनी जुमानलं नाही.

'विधवा होणं म्हणजे अपंगत्व येणं नाही'

त्यानंतर मी माहेरी राहू आले. अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार आला. तसे प्रयत्नही केले, पण त्यातही नशिबानं साथ दिली नाही.

एक वर्ष अंथरुणाला खिळून होते, अंगावर गुंजभर सोनं नाही, नीटनेटकं राहणं नाही. पण आईवडिलांसाठी आनंदाने जगणं सुरू होतं.

शेवटी पुन्हा उठून उभी राहिले आणि डी. एडचं शिक्षण पूर्ण केलं. अखेर 13 वर्षानंतर 2014मध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत नोकरी मिळाली. आता स्थिरस्थावर झाल्यावर विधवांसाठी काम करायला सुरुवात केली.

10 जून 2015 ला 'विधवा महिला प्रतिष्ठान' सुरू केलं. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असणाऱ्या या प्रतिष्ठानामधून विधवांना मदत केली जाते.

आपल्याकडे विधवा होणं म्हणजे जणू काही अपंगत्व येणं, असंच मला वाटतं. कारण समाजात सतत हेटाळणी होते.

मला घरात शुभकार्यात 'बाजूला बस' म्हणून सांगितलं जायचं. माझ्या भावजयीच्या डोहाळे जेवणाला 'लता, तू जरा मागे हो,' असं सांगणाऱ्या वयस्कर महिला होत्या. पण मी म्हणते शुभकार्यात विधूर चालतो पण विधवा चालत नाही?

विधवेला समाज का डावलतो, असा प्रश्न मला पडतो. हे थांबायला हवं म्हणून मी प्रयत्न करतेय. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिलंय.

ज्याप्रमाणे बालविवाह कायदा झाल्याने बालविवाह प्रथा प्रमाण कमी झालं, त्याप्रमाणे विधवांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी कायदा होण्याची गरज आहे, असं मला वाटतं. त्यासाठी लोकप्रबोधन गरजेचं आहे. पण कायदा आला तर विधवा महिला सन्मानाने जगू शकतील.

विधवा म्हणून जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मी दागिने घालू शकत नाही, नटू शकत नाही कारण मी विधवा आहे. माझ्या पायाकडे पाहिलं जायचं, तेव्हा मी पाय लपवायचे. कपाळावर टिकली नाही, म्हणून विचारणा व्हायची. हे सगळं आता मी सहन करत नाही.

आज मी गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली, पायात पैंजण असं सगळं परिधान करते. कोणत्याही महिलेला तिने काय घालावं आणि काय घालू नये, हे ठरवण्याचा अधिकार आहे. पण विधवा महिलांना तो दिला जात नाही.

'ताठ मानेनं जगायला मिळावं म्हणून...'

यावर्षी मी पाहिल्यांदा संक्रातीचा सण साजरा केला. गावातील विठ्ठल मंदिरात विधवा आणि सवाष्ण महिलांना घेऊन हळदीकुंकू समारंभ केला. माझ्या या कार्यक्रमाला सवाष्ण असलेल्या माझ्या शाळेतील सहकाऱ्यांनी साथ दिली, मात्र लोकप्रतिनिधी तसंच सरकारी अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, याचं दुःख वाटतं. घरातूनही विरोध झाला.

पण जर मी सुरुवात केली नाही तर या प्रथा परंपरा अशाच सुरू राहतील, असं मला वाटलं. म्हणून मी स्वतः यावर्षीपासून सुरुवात केली. जवळपास 80 टक्के लोकांना माझी ही भूमिका पटलेली नाही.

माझ्या घरातून याची खिल्ली उडवली गेली - 'असे कार्यक्रम करून तुला पतीचं सुख मिळणार आहे का?' असा सवाल त्यांनी केला. पण शरीरसुखापेक्षा मानसिक सुख महत्त्वाचं आहे, या भावनेनं मी असे कार्यक्रम हाती घेणार आहे.

विधवा महिलांना समाजाने स्वीकारणं गरजेचं आहे. त्यांचा सन्मान होणं काळाची गरज आहे. वैधव्य काय किंवा सवाष्ण काय, ही मानसिकता बदलली पाहिजे.

त्यामुळे दरवर्षी मी असे हळदीकुंकू समारंभ घेणार, विधवा महिलांना ताठ मानेने जगण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असं मनाशी पक्के ठरवलं आहे.

(शब्दांकन- स्वाती पाटील, कोल्हापूर)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)