You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रक्षाबंधन : राखीपौर्णिमा हा सण पुरुषी सत्तेचं प्रतीक आहे का?
हिंदू संस्कृतीमध्ये राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनला विशेष महत्त्व आहे. हा सण पुरुष प्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे की बहिण भावांच्या प्रेमाचं यावर बीबीसी मराठीने दोन लेखांमधून चर्चा घडवून आणली होती. ही या वादाची पहिली बाजू आहे तर दुसरी बाजू तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
हिंदू संस्कृतीत आणि पुराणात तिला देवीचं स्थान आहे. कधी ती समृद्धी आणि शांतीची देवी आहे तर कधी ती शक्तीचं रूप आहे.
कधी ऐश्वर्य देणारी ती लक्ष्मी आहे आणि कधी संतापली तर ती काली आहे. कुणासाठी ती जगतजननी आहे तर कुणासाठी ती लोकशोकविनाशिनी.
पण एवढं सगळं असूनही समाजाला वाटतं की तिला संरक्षणाची गरज असते. तिच्यावर येणारी संकटं ती स्वतः परतवून लावू शकत नाही, म्हणून तिला पुरुष राखणदार लागतोच.
आणि या पुरुष राखणदाराची गरज अधोरेखित करणारा एक सणही आहे - राखीपौर्णिमा!
एकीकडे शक्ती म्हणून तिला पूजायचं आणि दुसरीकडे तिलाच संरक्षणाची गरज आहे, असं ठसवायचं? हा विरोधाभास नाही का?
"यात काही नवीन नाही. स्त्रीला देवी बनवलं की तिला माणूस म्हणून सन्मानाने वागवण्याची जबाबदारी नाकारता येते. म्हणूनच हे गौरवीकरण असतं देवी म्हणण्याचं," स्त्रीवादी कार्यकर्ते अॅड. एकनाथ ढोकळे सांगतात.
"राखीपौर्णिमेसारखा सण म्हणजे पुरुषी सत्ता कायम ठेवण्यासाठी केलेला एक प्रकारचा प्रपोगंडाच म्हणायला हवा," ते सांगतात.
स्त्रियांना गुलामगिरीत जखडवणारा सण
"स्त्रियांना मुळात संरक्षणाची वगैरेची गरज नसते," ढोकळे सांगतात. "गुलामगिरी कायम ठेवण्यासाठी समाजाची एक मानसिकता कायम घडवणं गरजेचं असतं, तेव्हाच दीर्घकाळ सत्ता गाजवता येते. ही मानसिकता सत्ता चालवणाऱ्यांचीही असते आणि गुलामांचीही."
"अशा प्रकारच्या सणांमागे एकच हेतू असतो, स्त्रियांच्या मनात न्यूनगंड तयार करायचा की आपण स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला नेहमीच संरक्षणकर्त्याची गरज आहे, हे सतत वर्षानुवर्ष, पिढी दर पिढी ठसवलेले संस्कार आहे," ते पुढे सांगतात.
एकनाथ ढोकळे यांच्या मते हे संस्कार एकदा दोन्ही बाजूंनी मान्य केले की सत्तेच्या विरोधात प्रश्न उभे राहत नाहीत आणि स्त्रियाही आवडीने राखीपौर्णिमेचा सण साजरा करतात.
"जेव्हा कोणत्याही व्यक्तीला वाटतं की मी सक्षम आहे, तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहत नाही. ती स्वतंत्र बुद्धीने विचार करायला सुरुवात करते आणि मग सत्तेला हादरे बसू लागतात," ते तर्क सांगतात.
पण सणांचा उलटा अर्थ का काढायचा?
आजकाल आपल्याच देशातल्या लोकांना आपल्या सणांचं विडंबन करण्याची सवय लागली आहे, असं कीर्तनकार क्रांतिगीता महाबळ यांना वाटतं. सणांचा उलटा अर्थ का काढला जावा, असा प्रश्नही त्या उपस्थित करतात.
"राखीपौर्णिमा हा आपल्या संस्कृतीतला महत्त्वाचा सण आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता की महिलांना संरक्षणाची गरज नाही? सतत महिलांवरच्या अत्याचारांच्या बातम्या येतच असतात."
"महिला कार्यकर्त्या काहीही म्हणोत... की आम्ही स्वयंपूर्ण आहोत, आम्हाला संरक्षणाची गरज नाही, आम्ही चंद्रावर चाललो, तरीही त्यांना संरक्षणाची गरज आहेच. सध्याच्या काळातल्या घटना बघता तर जास्तच," असं महाबळ सांगतात.
मग आजही राखपौर्णिमा का साजरी होते?
पूर्वी परिस्थिती वेगळी होती. स्त्रियांना वैयक्तिक स्वातंत्र्य नव्हतं, ना व्यावसायिक ना आर्थिक. त्यांना घराबाहेर विश्व नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारचे सण साजरे करणं ही आपली गरज आहे, कर्तव्य आहे, असं त्यांना वाटणं साहजिक होतं.
पण आता काळ बदलला आहे. स्त्रिया बऱ्याच प्रमाणात स्वावलंबी आणि स्वतंत्र झाल्या आहेत. आर्थिक स्वातंत्र्याने त्यांच्याकडे निर्णयक्षमता आली, त्यामुळे विचारानेही त्या स्वतंत्र झाल्यात, मुक्त झाल्यात.
महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याने आपल्या संरक्षणाची सोय स्वतः करणं त्यांना शक्य झालं आहे. मग तरीही त्या राखीपौर्णिमा का साजरी करतात? आपल्याला पुरुषाच्या संरक्षणाची गरज आहे, असं त्यांना का वाटतं?
याचं उत्तर देताना स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे सांगतात, "कारण जी स्त्री हे सण साजरे करत नाही, तिला एकटं पाडलं जातं. तिला असं भासवलं जातं की तिचं चुकतंय."
"आणि ज्या हे सण साजरे करतात त्यांचं कौतुक केलं जातं. मला वाटतं बऱ्याच जणी पटत नसतानाही असे सण साजरे करतात, या मागचं कारण हेच आहे. खरंतर आजच्या काळात राखीपौर्णिमा हा सण खूप आउटडेटेड झालेला आहे."
"तो साजरा करावा, यासाठी कोणतंही कारण नाही. एकीकडे आपण त्याला बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे, असं म्हणतो. पण परंपरेच्या नावाखाली हे पुरुषी सत्तेचं बळकटीकरण आहे," खरे सांगतात.
"बरं, यात गृहित धरलं गेलंय की बाईवर संकटं येतातच. म्हणजे जसा पावसाळा येतो नेमाने, तशी नेमानी बाईवर संकटं येतात. त्यामुळे तिला संरक्षणाची गरज आहेच. मग त्या संरक्षणकर्त्याचं ग्लोरिफिकेशन म्हणजे राखीपौर्णिमा."
"मला हेही पटत नाही की महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत म्हणून तिने रक्षणकर्ता नेमावा. राखीपौर्णिमा हे महिलांवरच्या अत्याचारांवरचं उत्तर नाही," असंही वंदना खरे सांगतात.
याची दुसरी बाजू कीर्तनकार महाबळ यांच्याकडून ऐकायला मिळते. या सणाचं महत्त्व विशद करून सांगताना त्या हे अधोरेखित करतात की, "राखीपौर्णिमेचा सण हा फक्त आपल्याच बहिणीचं रक्षण करायला सांगत नाही. आपली पत्नी सोडून सगळ्या स्त्रिया या पुरुषाच्या माता-भगिनी असतात, या सगळ्यांचं रक्षण करायचा संदेश देणारा हा सण आहे. हा नुस्ता सण नाही तर एक संस्कार आहे."
पण अशा सणांचं स्वरूप आता बदलायला हवं असं वंदना खरे यांना वाटतं.
"एकट्या बाईचं कर्तृत्व ग्लोरिफाय करणारे सण आपण साजरे केले पाहिजेत. भाऊ नसला की राखीपौर्णिमा नाही, नवरा नसला वटपौर्णिमा नाही. कशाला हवं ते? एकट्या बाईचं कौतुक करायला पाहिजे. तसे सण आता नव्याने आले पाहिजेत."
या लेखाची दुसरी बाजू - 'रक्षाबंधन स्त्रियांच्या सुरक्षेसाठी नसून भावा-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे'
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)