You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'रक्षाबंधन स्त्रियांच्या सुरक्षेसाठी नसून भावा-बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे'
हिंदू संस्कृतीमध्ये राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनला विशेष महत्त्व आहे. हा सण पुरुष प्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे की बहिण भावांच्या प्रेमाचं यावर बीबीसी मराठीने दोन लेखांमधून चर्चा घडवून आणली होती. ही या वादाची दुसरी बाजू आहे. या वादाची पहिली बाजू तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
बीबीसी मराठीने राखी पौर्णिमेबद्दल एक लेख प्रसिद्ध केला, ज्यात फेमिनिस्ट कार्यकर्त्यांनी या सणाबद्दल काही आक्षेप व्यक्त केले होते.
"एकीकडे आपण रक्षाबंधन बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे, असं म्हणतो. पण परंपरेच्या नावाखाली हे पुरुषी सत्तेचं बळकटीकरण आहे," असं स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे यांनी या लेखात म्हटलं आहे. हा सण कालबाह्य ठरला आहे, असंही त्या म्हणाल्या.
या बातमीवर सोशल मीडियावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यातल्या अनेकांनी या विचारांशी आपली असहमती व्यक्त केली. कुणी म्हटलं की स्त्रिया अजूनही परावलंबीच आहे. कुणी म्हटलं की आता या सणाचं स्वरूप रक्षेच्या पलीकडे गेलंय आणि लोक केवळ गेट-टुगेदर करतात. कुणी म्हटलं की बहीणच आमचं रक्षण करते.
पाहूया अशाच काही महत्त्वाच्या आणि प्रातिनिधिक 11 प्रतिक्रिया:
1. रेवती गोरे - 'बधिर दुराग्रही विचार'
"असले बधिर दुराग्रही विचार मांडून अत्यंत आनंदी अशा प्रेमळ सणाची बदनामी करणं असलं पुरोगामीत्व पसरवून काय साध्य होणार? उलट यांच्या नाकावर टिच्चून आजच्या झुक्याच्या फेसबुकवर बहीण भावांच्या प्रेमळ हळूवार नात्यांच्या सेल्फीने फेसबुक पेज भरून गेलं आहे."
2. विनीता तेलंग - 'सणाचं स्वरूप बदललं आहे'
"राखी बांधण्यामागचा केवळ भावानं बहिणीचं रक्षण करणं, हा हेतू कधीच मागे पडला. आम्ही परंपरा पाळतोय, ते दोन कारणांसाठी. एक, यामुळे घरदार नातेवाईक एकत्र येतात. भावा बहिणींना भेटायला एक छान निमित्तं मिळतं.
दुसरं कारण म्हणजे, या सणांचं स्वरूप बदलायला हवं का? तर, तेही सूज्ञ व पुरोगामी भारतीय हिंदूंनी कधीच केलं आहे. आता आम्ही रक्षाबंधन विविध मार्गांनी साजरा करतो. सैनिकांना, पोलिसांना, रिक्षाचालकांना, अगदी वृक्षांनासुद्धा राख्या बांधून आमचा स्नेह, कृतज्ञता व्यक्त करतो."
"दुसऱ्या कुणी आम्हाला आमच्या परंपरांविषयी सांगायची गरज नाही. आम्ही काळानुसार बदलतो म्हणून टिकून आहोत आणि राहू.
3. उदय गांधी - 'स्त्रिया परावलंबीच आहेत'
"स्त्रिया बहुतांशी परावलंबीच आहे. (सर्व भारताचा विचार करता!) आणि त्यांच्या रक्षणीची जबाबदारी कुटुंबातल्या वडील, भाऊ, मुलगा, नवरा इत्यादी पुरुषांवार असते.
त्यामुळे रक्षाबंधन हा एक अतिशय चांगला पारंपरिक सण आहे आणि भारतभर हा सण अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व बहिणभाऊ आनंदाने व प्रेमाणे साजरा करतात. त्यामुळे ही परंपरा आपण डोळे झाकून पुढे चालवतो, असं म्हणणं बेअकली आणि मूर्खपणाचं आहे."
4. सचिन अंबिलवाडे - 'स्त्री अबला दाखवण्याचा हेतू नाही'
"रक्षाबंधन हा सण सगळे नातेवाईक एकत्रं येऊन साजरा करतात. सण त्यासाठीच निर्माण केले आहेत. लग्न झालेल्या स्त्रियांना आपल्या भावावर आणि भावाला आपल्या बहिणीवर असलेलं प्रेम व्यक्त करता येतं. किमान या बहाण्याने तरी सगळे नातेवाईक भेटतात. यात स्त्रीला अबला दाखवण्याचा हेतू नसतो, पण संस्कृती काय हे बीबीसीला समजणार नाही, बीबीसीने व्हॅलेंटाईन डेवर लेख लिहावा, मग समजेल," अशी प्रतिक्रिया सचिन अंबिलवाडे यांनी दिली आहे.
5. सुहास काळे - 'रणांगणावर शूरपणे लढते स्त्री'
"नवरात्रीचे नऊ दिवस, भाद्रपदातलं गौरी पूजन, दुर्गा पूजा इ. कितीतरी सण हे शक्तिपूजेचे आहेत. मग आपण असं म्हणायचं का की हे सण स्त्रीसत्ताक आहेत? यात पुरुषांना स्थान नाही? तर अर्थातच असं नाही.
अहो, साक्षात भगवंताने प्रत्येक अवतार एका स्त्रीच्या पोटीच घेतला आहे हे आपल्याला विसरून कसं चालेल? स्त्रीचं स्थान हे अढळ आहे आणि ते अढळच राहणार. आम्ही तिला पूज्य मानतो. रणांगणावर शूरपणे लढणारी सैन्यदलातील स्त्री ही घरी आपल्या बालकाला मायेने पाजतेच ना? तेव्हा तिच्यातील मातृत्व, स्त्रीत्व जागृत असतं ना? हा विचार करून पाहा."
6. अजय निंबाळकर - 'दिदी करते लहान भावाचं रक्षण'
"राव, आज तर विभाजीत चर्चा नको. रक्षा फक्त भाऊच नाही करत तर मोठी दिदीसुद्धा जगासोबत लढून लहान भावाचं जगणं सोपं करतात," असं मत अजय निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे.
7. जयमाला धनकीकर - 'प्रत्येक सणात स्त्री-पुरुष स्पर्धा का निर्माण करता?'
"कोणत्याही सणांबद्दल पूर्ण माहिती नसली की असे तर्क लावले जातात आणि स्वत:ची प्रसिद्धी केली जाते. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देताना अनेक विचार पुढे येतात आणि स्वत:ला अतिशय पुढारलेला असा भास निर्माण करतात. प्रत्येक सण हा स्त्री-पुरुष नात्यात स्पर्धा निर्माण करणाराच असावा असं का वाटते तुमच्या स्वयंघोषित तज्ज्ञांना? यामुळे नात्यात प्रेम घट्ट होईल, असा विचार का नाही येत डोक्यात? पटत नसेल तर नका करू पण चुकीचे प्रचार करू नका," असा सल्ला जयमाला धनकीकर यांनी बीबीसीला दिला आहे.
8. सुनील काळे - 'राखी पौर्णिमेत काहीही चूक नाही'
"रक्षाबंधनात कुठलेही कर्मकांड होत नाही. भाऊ-बहिणीचा भेटीचा दिवस आहे. प्रेमाने बहीण भावाला राखी बांधते. मी एक हिंदू आहे. मला ज्या सणात अनावश्यक कर्मकांड दिसतात, चुकीच्या रुढी दिसतात. त्यावर मी नेहमीच टीका करतो. राखी पौर्णिमेत मला काहीही चूक दिसत नाही," असं मत सुनील काळे यांनी व्यक्त केलं आहे.
"एखाद्याला वाटलं तर बहिणीला ओवाळा. काय हरकत आहे? पण आज बहिणीला भेटा जरूर," असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
9. महेश राऊत - 'भगिनीच आमची रक्षा करतात'
महेश राऊत म्हणतात, "संपूर्ण बातमी वाचली... सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आमच्या बहिणी आम्हाला राखी बांधतात तेव्हा याचा अर्थ असा होत नाही की आम्ही आमच्या भगिनीची रक्षा करू, उलट त्याच आम्हला राखी बांधून आमचे संरक्षण करतात."
"आता हे उलटी गंगा कशी वाहते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल प्रत्यक्षात राखी म्हणजे काय हे सर्वात आधी समजून घेणं गरजेचं आहे. राखी म्हणजे रक्षासूत्र. महाभारतात कुंतीने अभिमन्यूला रक्षासूत्र बांधल होत आणि जोवर ते रक्षसूत्र त्याच्या हाताला होत तोवर त्याला मृत्यू आला नाही."
तर काही जणांनी मत व्यक्त केलं की रक्षाबंधन हा सण पुरुषी वर्चस्ववादी मासनिकतेतून सुरू केला असून आता मात्र स्त्रिया स्वतंत्र झाल्या आहेत.
10. माणिक भवर - 'आज स्त्रिया स्वतंत्र आहेत'
"या देशात स्त्रियांना कधी चूल आणि मूल, सती जाणे पुरते मर्यादित ठेवले जायचे आणि आज नारीशक्तीचा (नारा) दिला जातो. आज भारतीय स्त्रियांना सार्वभौम स्वातंत्र आहे, ते कुणामुळे? त्यामुळे ज्याला साजरा करायचा असेल तो करेल आणि ज्याला नाही करायचा तो नाही करणार, आणि काही जण तर करायचा म्हणून करतात. थोडक्यात जो तो आपल्या सोयीनुसार वागत असतो."
11. सुशीलकुमार माने - 'सणाचा जन्म पुरुषी वर्चस्वी मानसिकतेतून'
"रक्षाबंधनाचा अर्थ आम्हाला लहानपणापासून असा सांगितला गेलाय की भावाने बहिणीचं रक्षण करावं. पूर्वी नक्कीच कोणत्याही युद्धाच्या वा तहाच्या सगळ्यांत मोठ्या पीडित या स्त्रियाच होत्या. त्या दृष्टीने तसं असेल कदाचित, पण तरी नकळतपणे तुम्ही तुमची रक्षा करू शकत नाहीत. तुम्हाला आम्हीच हवेत वाचवायला, असं म्हणत सणाचा जन्म हा पुरुषी वर्चस्व मानसिकतेतूनच झालेला आहे, अस म्हणता येईल. पण सध्या काळ बदलला आहे. स्त्रिया फार पुढे गेलेल्या आहेत ना त्यांना कसल्या पुरुषी रक्षणाची गरज आहे. त्यामुळे फक्त बहीण भावाच्या नात्यासाठी समर्पित एक दिवस अस म्हणता येईल!"
तुम्हाला ही मतं पटतात का? आणखी काय वाटतं? कॉमेंट करा फेसबुक आणि ट्विटरवर.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)