'मनमोहन सिंह यांना विकणे BMW कार विकण्यासारखे'

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

15 ऑगस्ट 2004 रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करतेवेळी डॉ. मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांच्या संबंधांची पहिली परीक्षा झाली, असे डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधान असतानाच्या काळावर पुस्तक लिहिणारे त्यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांचे म्हणणे आहे.

भाषणाच्या एक दिवस आधी होणाऱ्या भाषणाच्या रंगीत तालमीमध्ये बारू यांना सहभागी व्हायला सांगण्यात आले होते. लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर उत्सुकता म्हणून त्यांनी भाषणादरम्यान असते त्या 'सिटिंग अरेंजमेंटवर' एक नजर फिरवली.

भाषण मंचापासून थोडं मागे डॉ. मनमोहन सिंह यांच्या पत्नी गुरुशरन कौर यांची खुर्ची होती. त्यानंतर वरिष्ठ मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खुर्च्या होत्या. पहिल्या ओळीतून सोनिया गांधी यांची खुर्ची गायब होती.

बारू यांनी संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना विचारले की सोनिया गांधी यांना कुठे बसविण्यात येईल तेव्हा त्यांनी चौथ्या-पाचव्या ओळीकडे बोट दाखवले. तिथे सोनिया गांधी यांच्या शेजारी नजमा हेपतुल्ला बसणार होत्या.

हे ऐकून बारूंना आश्चर्याचा धक्काच बसला. यामुळे डॉ. मनमोहन सिंह स्वतः तर फार खजील झाले असते. शिवाय सोनिया गांधी यांनाही अपमानित झाल्यासारखे वाटले असते.

अखेर सोनिया गांधी यांची सिटिंग अरेंजमेंट बदलण्यात आली आणि त्यांना सर्वात पुढे कॅबिनेट मंत्र्यांसोबत बसविण्यात आले.

डॉ. मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी

पंतप्रधान पदापेक्षा पक्षाध्यक्ष पद मोठं असल्याचं स्वतः डॉ. मनमोहन सिंह यांनी म्हटल्याचे, संजय बारू यांच्या 'द अॅक्सिडेंटल प्राईमिनिस्टर : मेकिंग अँड एनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह' या पुस्तकात सांगितले आहे.

मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांच्या संबंधात हिच क्लिष्टता होती का?, असा प्रश्न मी संजय बारू यांना विचारला.

बारू यांचे उत्तर होते, "त्यांचे संबंध अतिशय स्पष्ट होते. मनमोहन सिंह त्यांच्याशी अतिशय आदराने वागायचे आणि सोनिया गांधीदेखील त्यांच्याशी एका वृद्ध व्यक्तीप्रमाणे वागायच्या. मात्र पक्षाध्यक्षपद पंतप्रधानपदापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटायचे. आपल्या देशात हे पहिल्यांदाच घडले होते."

"पन्नासच्या दशकात आचार्य कृपलानी पक्षाध्यक्ष असताना त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना विचारले होते की तुम्ही सरकारमध्ये काय करणार आहात, हे पक्षाध्यक्ष या नात्याने तुम्ही मला सांगितले पाहिजे. मात्र मी याविषयी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, असे जवाहरलाल नेहरू यांनी कृपलानी यांना सांगितले."

"नेहरू म्हणाले, सरकारमध्ये काय सुरू आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मंत्रिमंडळातील सदस्य व्हा. नेहरू यांनी त्यांना कुठलंही मंत्रालय नसलेले मंत्रीपदही देऊ केले होते. मात्र कृपलानी यांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही."

"कृपलानी यांनी पदाचा राजीनामा दिला तेव्हा पंतप्रधानपद पक्षाध्यक्ष पदापेक्षा वरचे असल्याचे मानले जाऊ लागले. मला वाटतं पंतप्रधानपद पक्षाध्यक्ष पदाच्या एक पायरी खाली असतं, हा मनमोहन सिंहांचा समज चुकीचा होता."

मनमोहन सिंह यांना स्वतःची टीम निवडण्याची सूट नाही

बारू सांगतात, "आपली टीम स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य मनमोहन सिंह यांना नव्हते. सोनिया गांधी यांचे निर्देश अहमद पटेल किंवा पुलक चॅटर्जी यांच्यामार्फेत रोज मनमोहन सिंहांपर्यंत पोहोचवले जायचे. सोनिया यांना ज्या वक्ती मंत्रिमंडळात हव्या असायच्या किंवा नको असायच्या त्यांची यादी पटेलच मनमोहन सिंहांना द्यायचे."

"एकदा मनमोहन सिंह सोनिया गांधींचा निरोप घेऊन मंत्रिमंडळ फेरबदलातील मंत्र्यांची नावं राष्ट्रपतींना पाठवणार, तेवढ्यात पटेल मनमोहन सिंहांकडे आले. दुसरी यादी टाईप करण्याचा वेळ नव्हता. त्यामुळे मूळ यादीतील एका नावावर व्हाईटनर लावून दुसरं नाव लिहिण्यात आले."

"अशा प्रकारे आंध्र प्रदेशचे खासदार सुबिरामी रेड्डी यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आणि हरिश रावत (जे नंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले) यांचे नाव रद्द करण्यात आले. सरकारच्या सामाजिक धोरणांचे श्रेय पंतप्रधानांना नाही तर पक्षाला मिळावे, असाही सोनिया गांधींचा प्रयत्न असायचा."

हा मनमोहन सिंह यांना 'हु इज द बॉस' सांगण्याचा प्रयत्न होता का?, असा प्रश्न मी विचारला.

बारू म्हणाले, "मला वाटतं हा सोनिया गांधींचा नाही तर पक्षातील इतर नेत्यांचा प्रयत्न होता. त्यांना वाटायचे की पक्ष पंतप्रधानांपेक्षा मोठा आहे आणि अशाप्रकारच्या चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये व्हायच्या. पंतप्रधानांनी कधीच याचा प्रतिवाद केला नाही."

राजकीय स्वरुपात खूप जवळून काम करूनदेखील सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांच्यात एक प्रकारचा सामाजिक दुरावा होता आणि ते एकमेकांशी फार खुलेपणाने वागायचे नाही.

बारू सांगतात, "दोन्ही कुटुंबामध्ये येणं-जाणं नव्हतं. दोघंही कधी चहाचे घोट घेत एकत्र गप्पा मारत बसल्याचं मला आठवत नाही. मी मनमोहन सिंह यांच्या मुलींना कधीच राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्याशी बोलताना बघितलं नाही. मला वाटतं दोन्ही कुटुंबांमध्ये जे थोडंफार नातं तयार झालं होतं ते मनमोहन सिंह पंतप्रधान झाल्यानंतरच निर्माण झालं होतं."

ललित नारायण मिश्र आणि मनमोहन सिंह यांच्यातील वाद

पंजाब विद्यापीठातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मनमोहन सिंह यांनी कॅम्ब्रिजमधून भारताची आयात आणि निर्याती या विषयावर शोधनिबंध तयार केला होता. कॅम्ब्रिजमधून परतल्यावर त्यांची परदेशी व्यापार विभागात सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती.

मनमोहन सिंह यांची मुलगी दमन सिंह यांनी 'स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरशरन' हे मनमोहन सिंह यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यात त्या सांगतात, "त्याकाळी परदेश व्यापाराविषयी भारतात त्यांच्यापेक्षा अधिक माहिती असणारी दुसरी व्यक्ती नव्हती, असे माझे वडील आपली नम्रता सोडून अगदी खुलेपणाने सांगायचे. त्यावेळी त्यांचे मंत्री होते ललित नारायण मिश्र."

"एकदा मनमोहन सिंह मंत्रिमंडळाला पाठण्यात येणाऱ्या एका नोटशी सहमत नव्हते. त्यामुळे ललित नारायण मिश्र मनमोहन सिंहांवर नाराज झाले. मनमोहन सिंह म्हणाले ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपल्या प्राध्यापक पदावर पुन्हा रुजू होतील."

"पंतप्रधान इंदिरा गांधींचे सचिव पीएन हक्सर यांना ही गोष्ट कळाली. ते म्हणाले तुम्ही परत जाणार नाही. त्यांना मनमोहन सिंह यांनी अर्थ मंत्रालयातील मुख्य सल्लागार पदाची ऑफर दिली. अशाप्रकारे मंत्र्याशी झालेल्या वादातून मनमोहन सिंह यांना प्रमोशन मिळाले."

नरसिंह राव यांनी अर्थमंत्रीपदी केली नियुक्ती

यानंतर मनमोहन सिंह यांनी नियोजन आयोगाचे सदस्य आणि उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रमुख अशी पदं भूषविली. 1991 साली नरसिंह राव यांनी त्यांना भारताचे अर्थ मंत्री बनवले.

नरसिंह राव यांचे आत्मचरित्र लिहिणारे विनय सीतापती सांगतात, "नरसिंह राव यांच्याकडे कल्पना कमी नव्हत्या. त्यांना जागतिक नाणेनिधी आणि त्यांच्या देशांतर्गत विरोधकांच्या भावनांवर मलम लावणारा एक मुखवटा हवा होता. 1991 साली पी. सी. अॅलेकझँडर त्यांचे सर्वात मोठे सल्लागार होते."

"नरसिंह राव यांनी पी. सी. अॅलेकझँडर यांना सांगितले की त्यांना एक अशी व्यक्ती अर्थमंत्री म्हणून हवी जिचा आंतरराष्ट्रीय पातळीवर धाक असेल. अॅलेक्झँडर यांनी त्यांना आयजी पटेल यांचे नाव सुचवले. ते त्यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये संचालक होते."

"पटेल यांना त्यावेळी दिल्लीत राहायचे नसल्याने त्यांनी हा प्रस्ताव अमान्य केला. त्यानंतर पी. सी. अॅलेक्झँडर यांनी मनमोहन सिंह यांचे नाव घेतले. शपथ ग्रहण समारंभाच्या एक दिवस आधी 20 जून रोजी पी. सी. अॅलेक्झॅंडर यांनी मनमोहन सिंह यांना फोन केला."

"मनमोहन सिंह त्याच दिवशी सकाळी परदेशातून आले होते. त्यामुळे फोन आला त्यावेळी ते झोपले होते. त्यांना उठवून सांगण्यात आले की तुम्ही भारताचे नवे अर्थ मंत्री होणार आहात. मनमोहन सिंह यांनी मला सांगितले की तोपर्यंत नरसिंह राव यांचा त्यांना फोन आलेला नव्हता. त्यामुळे या 'ऑफरवर' त्यांचा विश्वासच बसला नव्हता."

"दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मनमोहन सिंह यूजीसीच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना नरसिंह राव यांचा फोन आला की बारा वाजता शपथ ग्रहण समारंभ आहे. मला माझ्या भाषणाविषयी तुमच्याशी चर्चा करायची आहे. तेव्हा तुम्ही एक तास आधी माझ्याकडे या."

"मनमोहन सिंह तिथे गेले तेव्हा नरसिंह राव त्यांना म्हणाले की आपण यशस्वी झालो तर याचे श्रेय आपल्या दोघांनाही मिळेल. मात्र आपल्याला यश आले नाही तर त्याचे खापर तुमच्या माथ्यावर फोडलं जाईल."

मनमोहन सिंह यांचे आवडते परदेशी नेते होते करझई

मनमोहन सिंह यांनी ते आव्हान स्वीकारले आणि देशाचे सर्वात यशस्वी अर्थमंत्री ठरले.

संजय बारू सांगतात की मनमोहन सिंह खूप अंतर्मुखी होते. ब्रिटेनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन आणि चीनचे अध्यक्ष हू जिन ताऊ देखील त्यांच्यासारखेच कमी बोलणारे होते. ते यायचे तेव्हा तर चर्चा पुढे नेणं खूप अवघड होऊन बसायचं.

बारू सांगतात, "ते खूप लाजाळू आणि कमी बोलणारे होते. समोरची व्यक्ती बोलायची तेव्हा त्यांना फार आनंद व्हायचा. कारण त्यामुळे त्यांना बोलायची गरज नसायची. आंतरराष्ट्रीय बैठकांमध्येसुद्धा त्यांना खूप बोलणारे नेते आवाडायचे. उदाहरणार्थ अफगाणिस्तानचे अध्यक्ष करझई. ते खूप बोलायचे आणि मनमोहन सिंह स्मित करत ते ऐकत बसायचे."

मनमोहन सिंह यांना अंडही उकळता येत नाही

डॉ. मनमोहन सिंह यांची मुलगी दमन सिंह यांनी मनमोहन सिंह यांच्या आत्मचरित्रात त्यांची दुसरी बाजू दाखवली आहे.

त्या लिहितात, "दर दोन महिन्यात आमच्या कुटुंबातील आम्ही सर्वजण बाहेर जेवायला जायचो. आम्ही कमला नगरमधील कृष्णा स्वीट्समध्ये दक्षिण भारतीय पदार्थ खायचो किंवा दरियागंजमधील तंदूरमध्ये मुगलई. चीनी पदार्थांसाठी आम्ही मालचा रोडवरील 'फुजिया रेस्टॉरंटमध्ये' जायचो आणि चाटसाठी आम्हाला आवडायचे बंगाली मार्केट."

"माझ्या वडिलांना अंड कसं उकळतात, टीव्ही कसा लावलात हेही माहीत नव्हते. आम्हाला त्यांच्या सरकारी गाडीत बसण्याची संधी कधी मिळाली नाही. आम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे असेल आणि ते ठिकाण वडिलांच्या रस्त्यातच असेल तरीदेखील ते आम्हाला त्यांच्या सरकारी गाडीत बसू द्यायचे नाही."

"काही कारणांमुळे त्यांना त्यांचं चालवण्यावर नियंत्रण नव्हतं. त्यांनी एकदा वेगात चालायला सुरुवात केली की इच्छा असूनही त्यांना त्यांचा वेग कमी करता येत नव्हता. त्यामुळे त्यांच्या सोबत चालणाऱ्यांना बरेच कष्ट पडायचे."

भाषणाचा अभ्यास करायचे मनमोहन

मनमोहन सिंह यांना अजिबात भाषण करता येत नव्हते. त्यांचा आवाज खूप बारीक होता आणि त्यांना योग्य शब्दांवर जोर देता येत नव्हता. सुरुवातीच्या दिवसांमध्ये राष्ट्राला संबोधित करताना ते आधी आपल्या भाषणाचा सराव करायचे.

संजय बारू सांगतात, "2004 साली जेव्हा ते पहिल्यांदा लालकिल्ल्यावरून भाषण देणार होते त्यांनी आपल्या भाषणाचा बराच सराव केला होता. मात्र एकदा सवय झाल्यावर त्यांनी सराव करणे सोडून दिले. त्यांना हिंदी वाचता येत नव्हते. ते भाषण एकतर गुरुमुखी किंवा उर्दूत लिहायचे."

"त्यांना उर्दू साहित्याची फार आवड होती. ते नेहमीच आपल्या भाषणात उर्दू शायरी वापरायचे. मुजफ्फर राजमी यांचा एक शेर त्यांनी संसदेत वाचला होता आणि जनरल मुशर्रफ यांनाही ऐकवला होता - ये जब्र भी देखा है, तारीख की नजरों ने... लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई..."

'अंडररेटेड' राजकारणी

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी 2012 साली डॉ. मनमोहन सिंहांविषयी एक खास टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते, "मनमोहन सिंह एक 'ओव्हररेटेड अर्थशास्त्रज्ञ' आहेत की नाही, हे मला माहिती नाही. मात्र ते एक 'अंडररेटेड' राजकारणी नक्कीच आहेत, हे मला नक्कीच ठाऊक आहेत."

संजय बारू सांगतात, "तुम्ही त्यांना अर्थशास्त्रातील विद्वान म्हणून बघाल तर ठीक आहे. कॅम्ब्रिज आणि ऑक्सफोर्डमध्ये ते शिकले आहेत. मात्र आपला शोधनिबंध प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी एकही पुस्तक लिहिलेले नाही."

"दुसरीकडे राजकारणात नवखे असूनही ते दहा वर्षं भारताचे पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक कार्यकाळ त्यांचाच होता."

मनमोहन सिंह यांना रागही येतो

डॉ. मनमोहन सिंह यांची मृदू प्रतिमा बघता फार कमी लोकांना याचा अंदाज असेल की त्यांना रागही यायचा.

संजय बारू सांगतात, "त्यांना खूप राग यायचा. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद व्हायचा. ते दोन-तीन वेळा माझ्यावरही रागवले आहेत. रागात अनेकदा त्यांचा आवाज चढायचा. एकदा तर सोनिया गांधी यांचं एक पत्र लीक केलं म्हणून ते जयराम रमेश यांच्यावर चिडले होते."

"ते माझ्यासमोर फोनवरून जयराम रमेश यांना ओरडले होते. जयराम रमेश फोनवरून स्पष्टीकरण देत होते. मात्र ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांनी जोरात फोन आदळला."

मी बारू यांना विचारले, पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागाराचं सर्वात मोठं काम असतं लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिमा प्रस्तुत करणे. तुमच्यासाठी हे काम किती कठीण होतं?

बारू यांचे उत्तर होते, "त्यांच्या पहिल्या कार्यकाळात माध्यमांमध्ये त्यांची प्रतिमा इतकी चांगली होती की मला काहीच मेहनत करावी लागली नाही. त्यांना विकणे बीएमडब्लू कार विकण्यासारखे होते. ती कार इतकी चांगली आहे की ती विकण्यासाठी 'सेल्समन'ची गरजच नसते."

डॉ. मनमोहन सिंह आणि वाजपेयी

वाजपेयी आणि मनमोहन सिंह यांच्या काम करण्याच्या स्वरुपाची तुलना करताना संजय बारू खास टिप्पणी करतात. ते म्हणतात, वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश मिश्रा पंतप्रधानांसारखे काम करायचे आणि मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते म्हणजे मनमोहन सिंह पंतप्रधानांच्या सचिवाप्रमाणे वागायचे.

याविषयी विस्ताराने सांगताना ते म्हणतात, "आम्ही एक 'विनोद' करायचो. वाजपेयींसोबत काम केलेले अनेकजण आमच्यासोबत होते. ते म्हणायचे वाजपेयी राजकारणी अधिक होते आणि प्रशासक कमी. तर मनमोहन सिंह प्रशासक अधिक आणि राजकारणी कमी होते."

"वाजपेयी निर्देश देऊन पुढचं सगळं काम अधिकाऱ्यांवर सोडून बाजूला व्हायचे. ब्रिजेश मिश्रा एकप्रकारे पंतप्रधान कार्यालय चालवायचे. मात्र मनमोहन सिंह यांची कार्यपद्धती एकदम वेगळी होती. ते जास्तीत जास्त वेळ मिटिंगमध्ये घालवायचे."

"नरेगा, भारत निर्माण, सर्वशिक्षा अभियान, कुणाचीही बैठक असो मनमोहन सिंह तिथे हजर असायचेच. नियमानुसार हे काम कॅबिनेट सचिव किंवा पंतप्रधानांच्या सचिवाचे आहे. पंतप्रधानांचं नाही."

"मी त्यांना नेहमी चिडवायचो. त्यांना म्हणायचो ब्रिजेश मिश्रांची ख्याती होती की ते पंतप्रधान म्हणून काम करतात आणि तुमची ख्याती आहे की तुम्ही तर पंतप्रधानांच्या सचिवासारखं काम करता."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)