धुळे निवडणूक निकाल : भाजपच्या विजयाची ही आहेत कारणं

महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरलेल्या धुळे महापालिकेत भाजपनं 15 वर्षांची काँग्रेस-राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत काढली आहे. धुळ्यात भाजपला 74 पैकी 39 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर अहमदनगर महापालिकेत त्रिशंकू अवस्था बघायला मिळत आहे. इथं भाजपला 18 तर शिवसेनेला 17 जागी यश मिळालंय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनंही 25 जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे सत्तेसाठी शिवसेना-भाजप एकत्र येणार का याची उत्सुकता आहे.

धुळ्यात आमदार अनिल गोटे यांनी भाजपविरोधात बंड पुकारल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. त्यांनी लोकसंग्राम पॅनल उभारुन भाजपला आव्हान दिलं होतं. शिवसेना आणि मनसेनंही इथं गोटे यांच्याशी उघड हातमिळवणी केली होती.

शिवसेनेचा उमेदवार नसलेल्या 13 वॉर्डात लोकसंग्रामला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपनं धुळ्याची लढत प्रतिष्ठेची करत दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरवलं होतं.

निवडणुकीची पूर्ण धुरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर देण्यात आली होती. तर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेदेखील निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेऊन होते.

विधानसभेच्या निवडणुकीत गोटेंना भरभरून मतं देणाऱ्या धुळेकरांनी त्यांच्या लोकसंग्राम पॅनलला दोनअंकी संख्याही गाठू दिली नाही.

भाजपनं एकूण 74 जागांपैकी 62 जागा लढवल्या होत्या. महापालिका निवडणुकीआधी भाजपनं काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षातून 50 हून अधिक नेते आयात केले, ज्यात 15 विद्यमान नगरसेवक, माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्षांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार शोधण्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी सुरू होती.

धुळ्याच्या लढतीत अनिल गोटे यांनी आपली पत्नी हेमा आणि मुलगा तेजस यांनाही रिंगणात उतरवलं होतं. त्यात प्रभाग एकमधून लढणाऱ्या तेजसचा पराभव झाला. तर महापौरपदाच्या उमेदवार हेमा आघाडीवर असल्याचं समजतंय.

भाजपच्या यशाचं गमक काय?

धुळ्यातले पत्रकार संजय झेंडे भाजच्या यशाचं विश्लेषण करतात:

धुळ्यात 15 ते 20 नगरसेवक असे आहेत, जे कुठल्याही पक्षातून उभे राहिले तरी ते निवडून येतील. ही मंडळी गेली 15 वर्षं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत होती. त्यांना भाजपनं आपल्याकडे वळवलं.

भाजपचे गेल्या निवडणुकीत 4 नगरसेवक होते. त्यामुळे त्यांनी निवडणूक गांभीर्यानं घेतली. वर्षभरापूर्वीच तयारी सुरू केली. काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र बेसावध राहिली.

गिरीश महाजन हे अनुभवी नेते आहेत, त्यांना प्रशासन आणि पोलिसांचा वापर कसा करायचा हे पुरेपूर माहिती आहे. तो त्यांनी यशस्वीपणे केला.

गिरीश महाजन, सुभाष भामरे, जयकुमार रावळ यांचं निवडणुकीवर बारीक लक्ष होतं. त्यामुळे कुरबुरींना जागा नव्हती.

मुख्यमंत्र्यांची सभाही गेमचेंजर ठरली. कारण त्यांनी शहरी भागाचं व्हिजन मांडलं. शिवाय एकाच पक्षाकडे पालिका, राज्य आणि केंद्राची सत्ता का असावी, हे पटवून दिलं.

नगरमध्ये युती होणार?

तिकडे अहमदनगर पालिकेत अजूनही त्रिशंकू अवस्था आहे. अहमदनगर पालिकेतील 68 जागांपैकी भाजपला 18 शिवसेनेला 17 तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 25 जागांवर आघाडी मिळाली आहे.

याआधी एकत्रित सत्ता भोगणाऱ्या शिवसेना आणि भाजपनं स्वबळाची ताकद आजमावली आहे. त्यामुळे सत्तेसाठी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार की आघाडी बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारे श्रीपाद छिंदमही आघाडीवर आहेत. खासदार दिलीप गांधी यांची सून दिप्ती आणि पुत्र सुवेंद्र दोघेही पिछाडीवर आहेत.

तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुली शीतल जगताप आणि ज्योती गाडे दोघीही राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढत असून त्या आघाडीवर आहेत.

आमदार अनिल गोटे यांनी भाजपचा विजय ईव्हीएममूळे झाल्याचं म्हटलं आहे. भाजपने 62 उमेदवार उभे केले आणि 50वर येऊन थांबले ही जादू ईव्हीएमच्या माध्यमातून जळगावमध्ये घडवून आणली तोच फॉर्म्युला धुळ्यात वापरण्यात आला, असं त्यांनी म्हटलं आहे. धुळ्यात प्रशासकीय यंत्रणा सत्तारूढ पक्षाच्या वेठबिगारसारखी वागत होती, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)