You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस मुस्लीम पालकांचा का आहे विरोध?
- Author, नीतेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी बुलडाण्याहून
बुलडाण्यात गोवर रुबेला लस घेण्यास मुस्लीम समाजातील काही कुटुंबांनी नकार दिला आहे. लसीमुळे नपुंसकत्व येतं असा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या 25 उर्दू शाळेत लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही.
राजा एज्युकेशन बहुउद्देशीय सोसायटी, पिंपळगाव राजा या शाळेत एकाही विद्यार्थाने गोवर रुबेलाची लस घेतलेली नाही.
शाळेतील शिक्षकांनी यासंदर्भात पालकांची बैठक घेतली. बैठकीत शिक्षकांनी लसीकरणाचे फायदे पालकांना समजावून सांगितले. मात्र बैठकीतून फार काही निष्पन्न झाले नाही, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक खान मोहम्मद सलीम यांनी दिली.
त्यांनी सांगितलं, "26 तारखेला प्राथमिक आरोग्य केंद्रातून काही कर्मचारी आले. 27 तारखेला लसीकरणाचा कॅम्प ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पालकांना आम्ही पत्र पाठवलं. पालकांनी लसीकरणाला नकार असल्याचं पत्र विद्यार्थ्यांच्या हातून शाळेत पाठवलं.
"यामागचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा लसीकरण केल्यानं मुलांचा मृत्यू होतो किंवा ते आजारी पडतात असा व्हीडिओ समाज माध्यमांवर वायरल होतोयं, असं आम्हाला माहिती पडलं. त्यामुळे आमच्या एकाही विद्यार्थ्यानं लसीकरण केलं नाही. पालक म्हणतात की लसीकरणानंतर काही झाल्यास त्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलावी, त्यानंतर ते त्यांच्या मुलांना लस देतील, पण अशी जबाबदारी आम्ही उचलू शकत नाही.
मुस्लीम पालकांचा का आहे विरोध?
याच गावामध्ये 'जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा' आहे. शाळेची पटसंख्या 442 च्या जवळपास आहे. वायरल हीव्डिओचा या शाळेलाही फटका बसला आहे. लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर व्हावा यासाठी शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक अब्दुल हादी अब्दुल सय्यद यांनी त्यांच्या मुलापासूनच लसीकरणाला सुरुवात केली.
"पालकांच्या पहिल्या बैठकीत याचा फायदाही झाला. जवळपास 25 विद्यार्थ्यांचं लसीकरण यशस्वीरित्या पार पडलं. पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात अफवा पसरली आणि लसीकरणाला यायला पालकांनी नकार दर्शवला," अब्दुल हादी सांगतात.
"आमच्याकडे गोवर रुबेला लसीकरणाबाबत आरोग्य विभागाकडून पालकसभा घेण्याबाबत पत्र मिळालं. त्याअनुषंगाने आम्ही दोन वेळा पालकसभा घेतली. पहिल्या पालकसभेत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही व्यक्ती सोडल्या तर अनेकांनी लसीकरण करण्यासाठी संमती दर्शवली. पण त्यानंतर समाज माध्यमांवर काही व्हीडिओ शेयर झाल्यानं पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आणि त्यांनी लसीकरण घेण्यासाठी नकार देत थोडा वेळ मागितला "अब्दुल यांनी पुढे सांगितलं.
"दुसऱ्यांदा झालेल्या पालकसभेत 100च्या जवळपास पालकांची उपस्थिती होती. त्यापैकी काही पालकांनी लसीकरणावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे इतर पालकही भयभीत झाले. यात अशिक्षित नागरिक जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम इतरांवरही पडला. यासंदर्भात आम्हाला पोलिसांकडूनही विचारणाही झाली. लसीकरणावर बहिष्काराच्या बातमीनंतर पोलीस स्टेशनमधून चौकशीचे फोन आले. पण शाळेत बहिष्कार नाही असा खुलासा आम्ही त्यांना केला.
उर्दू शाळेला लागूनच जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा आणि कला महाविद्यालय आहे. या शाळेत मराठी माध्यमाचे 6वी ते 10वी मध्ये शिकणारे 600 विद्यार्थी आहेत. त्यापैकी दोन टप्प्यात 567 विद्यार्थ्यांवर लसीकरण पूर्ण झालं. मात्र उर्दू शाळेच्या 300 विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थ्यांनीच लसी घेतली. दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेतच येणे टाळल्याची माहिती मुख्याध्यापक सतीश भावसार यांनी दिली.
ते म्हणाले, "लसीकरणाच्या तारखेला काही विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी लस घेतली नाही. आम्हाला पालकसभा घेऊन त्यांना लसीकरणाची माहिती देणं क्रमप्राप्त आहे. त्यांचाच नकार आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करु शकत नाही. काही अफवांमुळे हे होतंय हे नक्की आहे आहे."
संपूर्ण गावातील मुस्लीम समाजामध्ये या अफवेची चर्चा आहे. गावातील काही नागरिकांसोबत संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. शाळेपासून काही अंतरावर मोहम्मद जावेद यांच्याशी संवाद साधल्यानंतर रोचक तथ्य समोर आलं.
अफवा आणि संभ्रम कायम
ग्रामस्थ मोहम्मद जावेद यांनी अफवांची काही कारणं सांगितली. ते म्हणाले, "समोरची पिढी संपवण्याचा डाव या लसीकरणातून साध्य केला जातोय, असं आम्हाला एका व्हीडिओच्या माध्यमातून समजलं. या व्हीडिओत लसीद्वारे मुलांना नपुंसक करण्यात येतंय असा प्रसार केला जातोय."
जावेद यांना तीन मुलं आहेत. त्यांनी तिन्ही मुलांच्या शाळेतील लसीकरणाला विरोध केला आहे. शाळेत लस देण्यापेक्षा सरकारी रुग्णालयात मुलं सहजच लस घेतील, असं त्यांचं म्हणणं आहे.
ते म्हणतात, "पालकांना लसीकरणानंतर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली गेली पाहिजे. समाज माध्यमांवर उत्तर प्रदेशात लसीकरणानं अनेकांचा मृत्यू झाल्याचाही व्हीडिओ आम्ही बघितलाय. त्यामुळे आमचा लसीकरणाला विरोध आहे."
आमच्या मुलांच्या आरोग्याची जबाबदारी शिक्षकांनी उचलावी. जेव्हा तेच जबाबदारी उचलत नसतील तर आम्ही कुणाच्या आधारावर आमच्या मुलांना लस देण्यासाठी प्रवृत्त करावं, असा प्रश्न पालक मोहम्मद नसुरल्लाह यांनी विचारलाय.
"आजारच नाही तर लस घ्यायची कशाला. उद्या चालून मुलांना कमी जास्त झालं तर जबाबदारी कोण घेणार. समाज माध्यमांवर फिरणारा व्हीडिओ खोटा आहे का? लस घेतल्याने मृत्यू होतो अनेकांना दवाखान्यात दाखल कराव लागतंय या जर अफवा असतील तर त्यांनी आम्हाला ते समजावून सांगावं," अशी अपेक्षा मोहम्मद नसुरल्लाह व्यक्त करतात.
ग्रामस्थ मोहसीन खान यांचा अनुभव मात्र वेगळाच आहे. ते म्हणतात "दोन शाळांमध्ये भेदाभेद करणारी ही लस आहे. एका शाळेला वेगळी आणि दुसऱ्या शाळेला वेगळी लस देण्यात येत आहे. मराठी शाळांमध्ये वेगळी आणि उर्दू शाळांमध्ये वेगळी लस देण्यात येत आहे.
"अनेक ठिकाणी एच औषधाची कुप (ampoule) वापरून हिंदू आणि मुस्लीम मुलांना इंजेक्शन दिलं जात नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी किंवा शिक्षक याला विरोध करतात. अशा काही गोष्टी आमच्या कानावर पडताहेत त्यामुळे आम्ही या लसीच्या विरोधात आहोत.
या अफवा कोण पसरवतंय असा प्रश्न केल्यानंतर ते शांत होतात. याबाबत आम्हीही संभ्रमात आहोत, असं ते उत्तर देतात.
अफवांवर विश्वास ठेवू नका - प्रशासन
बुलडाणा जिल्ह्यातील किमान 25 मुस्लीम शाळांनी गोवर रुबेला लस घेण्यास नकार दिल्याचं, जिल्हा महिला बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफने यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, "लस दिल्यानं नपुंसक होतात असा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. त्यानंतर नातेवाईक आणि मित्रांच्या माध्यमातून हा व्हीडिओ झपाट्यानं पसरला. जवळपास 20 ते 25 शाळा आहेत ज्या लसीकरणाच्या विरोधात आहेत.
मलकापूरमध्ये शाळांचं प्रमाण अधिक आहे. तिथे 18 ते 19 शाळा आहेत आणि प्रत्येक तालुक्यात दोनेक शाळा असतीलच ज्या लसीकरणाला नकार देत आहेत. आम्ही मलकापुरच्या मशीदमध्ये उच्च शिक्षित मुस्लीम बांधवांच्या बैठकी घेत आहोत. समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आम्ही त्यांना करतोय," गोफने सांगतात.
मराठी आणि उर्दू शाळांना वेगवेगळी लस दिल्याचा आरोप गोफने फेटाळतात. "सर्व शाळांना एकाच पद्धतीची लस देण्यात येत आहे," असं ते सांगतात.
व्हायरल व्हीडिओवर काय कारवाई केली यावर ते सांगतात, "व्हीडिओवरील कारवाईसंदर्भात वरिष्ठांसोबत बैठक घेण्यात येईल आणि त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल."
पसरलेल्या या अफवांमुळे प्रशासन कामाला लागलं आहे. मलकापूरच्या रहेमानिया मशीदीत इमाम आणि सार्वजनिक विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मुस्लीम समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. मुस्लीम समाजामध्ये सध्या पसरत असलेल्या अफवांविषयी आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी आरोग्य विभागाच्या वतीने समाजात जागृती करण्यात येत आहे. मुस्लीम समाजाच्या शंकांचं यातून निरसन करण्यात येतंय.
सोलापुरात 41 शाळांमधील पालकांचा विरोध
सोलापूर जिल्ह्यातल्या 41 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी गोवर-रुबेला लस घेण्यास विरोध केला आहे. यातल्या 25 शाळा या उर्दू माध्यमाच्या आहेत.
"गोवर-रुबेलाची लस दिल्यास आपल्या मुलांना नपुंसकत्व येईल, अशी भीती या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात आहे. त्यामुळे ते लसीकरणाला विरोध करत आहेत," स्थानिक पत्रकार दत्ता थोरे सांगतात.
अधिक माहितीसाठी आम्ही सोलापूर महापालिकेच्या एमआर (Measels-Rubella) मोहिमेच्या नोडल अधिकारी अरुंधती हराळकर यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी सांगितलं की, "पाल्यांना ही लस दिल्यास नपुंसकत्व येईल, असा गैरसमज उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात आहे. आम्ही वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. आता पुढच्या तारखेला या शाळांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल."
गोवर-रुबेला लसीकरण मोहीम
भविष्यात गोवर-रुबेला हा संक्रमित आजार होऊ नये म्हणून आरोग्य विभागामार्फत गोवर रुबेलाचं लसीकरण राबवण्यात येत आहे.
लसीकरणाचा टार्गेट 100% पूर्ण व्हावं यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सक्रिय आहे. 2020 पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या आजारावर नियंत्रण मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील शाळांमध्ये 5 आठवडे ही मोहीम राबवली जाणार आहे. शाळाबाह्य मुलं तसंच 9 महिने ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण प्रभावीपणे राबवलं जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)