राम मंदिर होणार नसेल तर मोदींना खुर्चीवर बसू देणार नाही: विहिंपचा दिल्लीत इशारा

    • Author, निरंजन छानवाल
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नवी दिल्लीत आयोजित केलेल्या धर्मसभेला जमलेल्या गर्दीला राम मंदिर निर्माणाविषयी ठोस आणि नवं काहीतरी ऐकायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण या धर्मसभेतून राम मंदिर निर्माणाचा जुनाच संकल्प करत कार्यकर्ते आल्यापावली परत फिरले.

विश्व हिंदू परिषदेने नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या धर्मसभेच्या व्यासपीठावरील फलकावर अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी कायदा आणा असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. तर व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला 'पूज्य संतो का आवाहन जल्द हो मंदिर निर्माण' अशी वाक्य होती.

आठवडा भरापूर्वी याच रामलीला मैदानावर देशभरातले शेतकरी एकत्र आले होते. इथूनच त्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता. कृषी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तीन आठवड्यांचं स्वतंत्र अधिवेशन बोलवा, शेती मालाला हमी भाव द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा या काही त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.

रविवारी त्याच रामलीला मैदानावर विश्व हिंदू संघटनेच्या बॅनरखाली हिंदू संघटना, साधू-संत एकत्र आले होते. त्यांची मागणी होती, संसदेत राम मंदिरासाठी कायदा आणा.

रामलीला मैदानावर जमलेल्या गर्दीसमोर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी यांनी सरकारला उद्देशून राम मंदिर निर्माणासाठी आता कायदा आणणं हाच एक पर्याय असल्याचं सांगितलं. सत्तेत बसलेल्यांनी आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण न केल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारलाच दोषी धरल्याचं त्यांच्या भाषणातून जाणवत होतं.

त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष व्ही. एस. कोकजे यांनी न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असल्यानं प्रतीक्षा करायला हवी, असा सबुरीचा पवित्रा घेतला.

ऑक्टोबर महिन्यापासून देशभरात परिषदेतर्फे राम मंदिर निर्माणासाठी धर्मसभा आयोजित करण्यात येऊ लागल्या आहेत. निवडणुकांवेळीच राम मंदिर कसं आठवलं? असा विरोधकांचा आणि लोकांचा प्रश्न आहे. या गर्दीसमोर त्याचं स्पष्टीकरण देण्याची वेळ कोकजे यांच्यावर आली. याचा निवडणुकीशी संबध नाही असं त्यांना सांगावं लागलं.

संघ आणि परिषदेचे नेते त्यांची बाजू लाऊन धरत असताना व्यासपीठावर बसलेले साधू- संत राम मंदिरासाठी आग्रही दिसले. काही सरकारच्या बाजूने होते. तर काहींनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. "राम मंदिर होणार नसेल तर मोदींना खुर्चीवर बसू देणार नाही. हम चमचे नहीं हैं," अशा शब्दांत काहींनी सुनावलं.

व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक जण हे अयोध्येत बाबरी मशीद पाडतांनाही उपस्थित होते. त्यावेळेचीच मागणी ते इतक्या वर्षांनी या व्यापीठावरून करत होते.

या अधिवेशनात कायदा आणला नाही तर प्रयागराजमध्ये 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला आयोजित अंतिम धर्मसंसदेत आम्ही आमचा निर्णय घेऊ, असंही व्यासपिठावरून सांगितलं गेलं.

रामलीला मैदानावरील सभेसाठी दिल्ली परिसर आणि नजीकच्या जिल्ह्यांमधून कार्यकर्ते आले होते. मैदानाच्या क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आत झाल्यावर पोलिसांनी प्रवेश बंद केला. पण तरीही बाहेर गर्दी होती. दोन नंबरच्या गेटवर काहीवेळ रेटारेटी आणि गोंधळही झाला.

डोक्यावर जय श्रीराम लिहलेल्या टोप्या, गमचे, हातात भगवे झेंडे घेतलेली गर्दी मैदानाच्या चारही बाजूंना दिसत होती. दिल्ली पोलिसांनी मैदानाकडे जाणारे सगळे रस्ते वाहतूकीसाठी बंद केलेले होते. या गर्दीच्या तोंडी जय श्रीरामच्या घोषणा होत्या. मैदानाच्या आतल्या गर्दीला स्फूरण चढवण्याचा प्रयत्न अधूनमधून केला जात होता. तोपर्यंत एकएक करून सर्वांची भाषणं संपत आली होत.

व्यासपीठावरून नविन काहीतरी आदेश मिळेल अशी आशा घेऊन आलेली मैदानातली गर्दी एव्हाना बाहेर पडत होती. स्वामी अवधेशानंद गिरी यांनी सभेच्या शेवटी राम मंदिर निर्माणाचा संकल्प गर्दीला दिला. पण तोपर्यंत अनेकजण बाहेर पडलेले होते.

मैदान आणि परिसरातली गर्दी हळूहळू ओसरत होती. या गर्दीत सकाळपासून धार्मिक ग्रंथ विकणारा तरुण फक्त तीनच धर्मग्रंथ विक्री झाल्याबद्दल नाराज होता.

राणा रणजितसिंह उड्डानपुलावरून निघालेल्या पाच-सहा जणांच्या गळयात भगवे गमचे होते. नोएडा भागातून आलेले हे भाजपचे कार्यकर्ते होते. आजच्या सभेतून काय घेऊन चाललात, असा प्रश्न त्यांना केला असता 'वही मंदिर निर्माण की बात की गयी,' असा एकजण म्हणाला. त्याच्यादृष्टीनं या सभेतून नविन काहीच हाती पडले नव्हते. 'हिंदूओंने एकजूट होना चाहिऐ सिर्फ यही नई बात मिली,' असा तो म्हणाला.

मैदानाबाहेर काही तरुणांशी बोललो. त्यांना व्यासपीठावर कोण काय बोललं याच्याशी काहीच देणंघेणं नव्हतं. राम मंदिर लवकर बनायला पाहिजे, असं त्यांच म्हणणं होतं. 'इथंही तारीखच मिळाली. आता प्रयागराजला सभा होणार म्हटले. कायदा का नाही आणत,' असं तो म्हणत होता.

25 नोव्हेंबरला अयोध्येत विश्व हिंदू परिषदेने अशीच धर्मसभा आयोजित केली होती. तिथली गर्दी आणि आज जमलेली गर्दी एकसारखीच होती. राम मंदिर निर्माणाच्या नावाखाली जमवलेली ही गर्दी होती. वर्षानूवर्षांपासून 'रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे'च्या त्याच घोषणा याही गर्दीच्या तोंडी होत्या.

हेही वाचलंत का?