You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अयोध्या : विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेत काय घडलं?
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, अयोध्येहून, बीबीसी हिंदी
शनिवारपर्यंत छावणी स्वरूप अवस्थेत जगणाऱ्या अयोध्येत रविवार सकाळपासून 'जय श्रीराम,'मंदिर वही बनायेंगे'च्या घोषणा निनादू लागल्या होत्या.
एक दिवस आधीपर्यंत शांततेत नांदणाऱ्या अयोध्येत अचानक गर्दी वाढू लागली. गर्दी किती असेल याबाबत आकडेवारी सांगणाऱ्यांचे अंदाज चुकू लागले होते.
विश्व हिंदू परिषदेनं धर्मसभेचा हा कार्यक्रम बडी भक्तिमाल बागेत आयोजित केला होता. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे हे ठिकाण शहराच्या थोडं बाहेर आहे. दुसरं म्हणजे धर्मसभेसाठी मोठ्या प्रमाणावर लोक हजर राहतील, असा विश्व हिंदू परिषदेचा होरा होता म्हणून एका मोठ्या प्रांगणाची आवश्यकता होती.
कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होणार होता. मात्र संत आणि लोकांचे जत्थे कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळीच जमायला सुरुवात झाली. मोठ्या व्यासपीठावर शंभराहून अधिक संत विराजमान होते. यामध्ये नृत्यगोपाल दास, राम भद्राचार्य, रामानुचार्य अशी मंडळी होती.
कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठीच्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी पाहायला मिळाली. लोकांना रोखण्यासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र रस्त्यावर माणसांइतक्याच गाड्याही दिसत होत्या. धर्मसभेला मोठ्या प्रमाणावर महिला आणि लहान मुलंही उपस्थित होती. गर्दीतून वाट काढत कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न होता. लंच पॅकेट मिळवण्यासाठीही त्यांची धडपड सुरू होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या ठिकाणाहून धर्मसभेच्या कार्यक्रम ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला तब्बल दोन तास लागले. हे अंतर आहे फक्त पाच किलोमीटरचं. उद्धव ठाकरे यांनी लखनौ-फैझाबाद हायवेवरील एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. याच हायवेवरून धर्मसभेठिकाणी लोकांचे जत्थे घेऊन जाणारी वाहनं सातत्याने ये-जा करत होती.
बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होती पण त्यांच्या घोषणांचा आवाज दुमदुमत होता. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून घोषणांचा आवाज आणि ऊर्जा आणखी वाढत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.
संघाचा पूर्ण पाठिंबा
धर्मसभेसाठीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर देखील व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठीची वाट गर्दीने भरलेली होती. एकाचवेळी लोकांचे जत्थे आत बाहेर करत होते. 'संतांचं म्हणणं ऐकून येत आहोत,' असं बाहेर येणारी माणसं सांगत होती. काही माणसं व्यासपीठापर्यंत जाता न आल्याने रागावून अर्ध्यातूनच परतत होती.
धर्मसभेचं आयोजन विश्व हिंदू परिषदेनं केलं होतं. याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा पाठिंबा होता. मंचावरून याबाबत घोषणा केल्या जात होत्या. भारतीय जनता पक्षाने धर्मसभेपासून दूर राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र भाजप नेत्यांचे होर्डिंग्स त्यांच्या उपस्थितीचं प्रतीक ठरत होती.
गर्दीतून जाणाऱ्या आणि बहराईचहून आलेल्या एका गृहस्थांना विचारलं की किती माणसं आली असतील? माझ्या अनभिज्ञतेचा फायदा घेत त्यांनी लाखो असं उत्तर दिलं. मात्र धर्मसभेला उपस्थित पत्रकार बांधवांकडून गर्दीचे वेगवेगळे आकडे मिळाले.
अयोध्येतील स्थानिक पत्रकार आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष महेंद्र त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार लाखभराची गर्दी असू शकते. "धर्मसभेकडे जाण्याचे सगळे रस्ते बंद करण्यात आले होते. माणसं बाहेरच फिरत होती. सभास्थळाची क्षमता एक लाख एवढी आहे. मात्र कार्यक्रमावेळी मंडप निम्मादेखील भरलेला नव्हता," असं त्यांनी सांगितलं.
गर्दीशी झगडत आम्ही आत पोहोचलो तेव्हा सुटकेचा निश्वास टाकला. धर्मसभेच्या ठिकाणाबाहेरच्या रस्त्यांवर ज्या पद्धतीने गर्दीची स्थिती होती, त्या तुलनेत आतलं वातावरण वेगळं होतं. मंचाजवळ गर्दी असल्यासारखं जाणवत होतं. मात्र अनेक खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. ही स्थिती दुपारी एकच्या सुमारास होती. अडीचच्या सुमारास म्हणजे कार्यक्रम संपण्याच्या वेळेस मैदान ओस पडलं होतं.
तर भाजपवर विश्वास ठेवा
मंचावरून होणारी भाषणं, संतांचे उद्गार सळसळत्या ऊर्जेने भारलेले होते आणि धर्मसभेत याचीच अपेक्षा होती. 'राम मंदिर बांधूच,' 'राम मंदिराच्या उभारणीत आतापर्यंत अडथळे निर्माण केले जात होते, अडथळा आणणारं सरकार आता नाही,' 'राम लला यांना तंबूत राहू देणार नाही,' 'हिंदू आता जागृत झाला आहे,' या स्वरूपाचे शब्द, उद्गार जवळपास प्रत्येक संताच्या भाषणात होते.
हरिद्वारहून आलेले संत रामानुजाचार्य खूपच आक्रमक दिसले. राम मंदिर उभारणीत कपिल सिब्बल, राजीव धवन यांचा असा थेट उल्लेख त्यांनी मंदिर उभारणीतील अडथळा असा केला. 'मंदिर उभारणीचं काम सध्याचं सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतील,' असं त्यांनी भाषणात सांगितलं. हे कार्य करण्यासाठी त्यांचे हात बळकट करायला हवेत, असं आवाहनही त्यांनी केलं.
तुलसी पीठाधीश्वर चित्रकुटाचे संत रामभद्राचार्य म्हणाले, "भाजपवर विश्वास ठेवा. भाजप राम मंदिर उभारेल. अतिविश्वासाने धोका होईल असा विचार करू नका. निवडणुकांनंतर भाजप राम मंदिराच्या मुद्याकडे लक्ष देईल."
अशा ज्वलंत भाषणांमध्ये, 'याचना नही अब रण होगा' अशा घोषणाही फुलत होत्या. अशा घोषणा झाल्यानंतर मंचावर उपस्थित संत पुन्हा एकदा ती घोषणा देण्यासाठी उपस्थितांना चेतवत होते. अनेक तरुण मंडळी अशा घोषणांचे बॅनर घेऊन हजर होते.
मात्र मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करणाऱ्यांवर ही तरुण मंडळी टीका करत होती. या रागातूनच ही तरुण मुलं काही घोषणा देत होती. मंचावरील उपस्थित काही संतांना ते आवडलं नाही. मंचावर उपस्थित एका संताने ही तरुण मुलं कुणाचे तरी दलाल आहेत असा आरोप केला. यांच्यामुळे कार्यक्रमात अडथळा येत आहे असंही त्यांनी सुनावलं.
कार्यक्रमानंतर उपस्थित लोकांना राम मंदिर उभारणीत सहकार्य करू, अशी शपथ देण्यात आली. शपथ घेण्याच्या कार्यक्रमापर्यंत बरीचशी गर्दी निघून गेली होती. 'विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिर उभारणीच्या दृष्टीने आतापर्यंत सातत्याने योग्य दिशेने काम केलं आहे. यापुढेही करत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यांना आमचं पूर्ण समर्थन असेल,' असं या शपथेत म्हटलं होतं.
कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणांबरोबर बोलता आलं. मंदिर उभारणीसाठी वातावरण निर्मितीसाठी त्यांना बोलावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदू जागृत आहे की नाही हे पाहण्यासाठीच धर्मसभेचं आयोजन करण्यात आल्याचं, बस्तीहून आलेल्या एका तरुणानं सांगितलं. मंदिर उभारणीबाबत संतांनी काय सांगितलं याबाबत या तरुणाला विचारलं असता, तो म्हणाला, "हिंदू जागृत झाला आहे हे समजलं आहे. आता कधीही मंदिर उभारणीला सुरुवात करता येईल."
या तरुणांच्या उत्साहपूर्ण बोलण्यासमोर सर्वोच्च न्यायालय, घटना, अध्यादेश या सगळ्या गोष्टी गौण वाटत होत्या. मंदिर उभारणी सुरू होईल, असं त्यांना वाटत होतं. त्यावेळी बाराबंकीहून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवलं. मंदिर उभारणीचं आता ठरणार नाही. 11 डिसेंबरला होणार असलेल्या धर्मसंसदेत याबाबत निर्णय होईल, असं ही व्यक्ती म्हणाली.
हसत हसत तरुण म्हणाले- 'म्हणजे पुढची तारीख मिळाली.'
अडीच किलोमीटर पायपीट केल्यानंतर आम्ही अयोध्या शहरात पोहोचलो. टपरीवर चहा घेत असताना 81 वर्षांच्या एका गृहस्थांना भेटलो. ते गोरखपूरहून आले होते. तेही चहा पिण्यासाठी तिथे आले होते. आतापर्यंत मंदिर झालं नाही याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
धर्मसभेनंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा होऊ शकेल का? यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, 'होइहै सोइ जो राम रचि राखा...'
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)