You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंना राम मंदिराचा मुद्दा विश्व हिंदू परिषदेकडून हायजॅक करायचा आहे का?
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, बीबीसी हिंदीसाठी, अयोध्या
गेल्या आठवड्यात विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष चंपतराय यांनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी अयोध्या, मुंबई आणि बंगळुरूमध्ये 25 नोव्हेंबरला धर्मसभा घेणार असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे 25 नोव्हेंबरलाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही अयोध्येत येत आहेत.
25 तारखेलाच धर्मसभेचं आयोजन का करण्यात येत आहे? इतक्या घाईत हे सर्व का होत आहे? हे प्रश्न चंपतराय यांना खोदून खोदून विचारण्यात आले. पण त्यांनी या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत.
समजा त्यांनी ती दिली असती तरी मी किंवा माझ्यासारख्या पत्रकारांच्या शंकांचं निरसन त्यामुळे झालं नसतं.
अयोध्येत मंदिर-मशीद केस संदर्भातील सुनावणी जानेवारीपर्यंत टळल्यानंतर मंदिर उभारणीची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
एकेकाळी विश्व हिंदू परिषदेचे नेते असलेल्या प्रवीण तोगडिया यांनी शक्तिप्रदर्शन देखील केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येत येणार आहेत.
विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिर आंदोलन यांचं नातं अतूट बनलं होतं. असं असताना मंदिराची नव्यानं मागणी विश्व हिंदू परिषदेबाहेरील लोकांनी केली ही गोष्ट त्यांच्या पचनी पडण्यासारखी नव्हती.
हा लोकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे. तेव्हा यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असं चंपतराय आपल्या पत्रकार परिषदेत म्हणत राहिले.
25 नोव्हेंबरला अयोध्येत 1 लाख लोक येतील, असं चंपतराय यांनी सांगितलं. पण ते कशासाठी जमणार, त्यांचा उद्देश काय? ते सरकारवर दबाव टाकणार आहेत की नाही? याबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही.
25 नोव्हेंबर हीच तारिख का निवडली?
लखनौचे टाइम्स ऑफ इंडियातील ज्येष्ठ पत्रकार सुभाष मिश्र सांगतात, "शिवसेना किंवा प्रवीण तोगडिया यांच्यासारखे नेते राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करतील की काय अशी भीती विहिंपला वाटणं साहजिक आहे. शिवसेना सुरुवातीपासूनच या मुद्द्याशी संबंधित आहे आणि शिवसेनाच सर्वांत आक्रमकही आहे."
"शिवसेनेचा उत्तर प्रदेशात प्रभाव नाही. तोगडिया यांना विहिंपमधून काढल्यानंतर नाराज झालेला विहिंपचा एक गट तोगडिया यांच्यासोबत आहे. राम मंदिराचा मुद्दा जी संघटना उचलेल त्या संघटनेला हिंदू समाजातील काही लोक निश्चितच समर्थन देतील," असं मिश्र सांगतात.
उद्धव ठाकरे यांनी अयोध्येमध्ये सभा घेण्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वीच केली होती. 25 नोव्हेंबरला अयोध्येत येऊन राम मंदिरासाठी संकल्प करण्याचा मानस त्यांनी जाहीर केला होता. शिवसेना नेते संजय राऊत हे अयोध्या आणि लखनौमध्ये कित्येक वेळा येऊन गेले आणि इथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन गेले. गेल्या दोन दिवसांत तर ते अयोध्येतच तळ ठोकून आहेत.
रामललाचं दर्शन घेणं, साधू-संतांसोबत चर्चा करणं आणि 25 नोव्हेंबरला एक सभा असा उद्धव ठाकरे यांचा नियोजित कार्यक्रम होता. पण प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे सभा तूर्त स्थगित करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी केलेली तयारी ही विश्व हिंदू परिषद आणि तिच्या इतर सहकारी संघटना यांची डोकेदुखी ठरण्यासाठी पुरेशी आहे.
"एखादी संघटना जर राम मंदिराबाबत पुढाकार घेत असेल तर ती संघटना राज्य सरकार तसेच विश्व हिंदू परिषदेच्या डोकेदुखीचं कारण ठरू शकते. ज्या दिवशी शिवसेनेची सभा आहे त्याच दिवशी धर्मसभेचं आयोजन करणं या पाठीमागे हेच मुख्य कारण असू शकतं," असं मिश्र सांगतात.
"राम मंदिरासाठी एक मोठं आंदोलन केलं जाईल, अशी घोषणा विहिंपनं केली आहे. या घोषणेनी सरकारसाठी जणू एखाद्या सेफ्टी व्हॉल्वचं काम केलं आहे. जर दुसरी कोणती संघटना पुढे येऊन मागणी करत असेल तर त्यांच्या मागणीतला जोर निघून जावा म्हणून विहिंपनं आंदोलनाची घोषणा केली आहे," मिश्र सांगतात.
25 तारखेला एकत्र येऊन विहिंप काय करणार आहे, याचं उत्तर भलेही चंपतराय यांनी दिलेलं नाही. पण, "या दिवशी आम्ही एकत्र येऊ आणि राममंदिरासाठी वातावरण निर्माण करण्याचा आराखडा तयार करू," अशी माहिती विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी दिली आहे.
मंदिराच्या निर्मितीसाठी 26 डिसेंबर रोजी प्रत्येक मंदिर, मठ, आश्रम, गुरुद्वारा आणि घरांघरांत स्थानिक परंपरेनुसार अनुष्ठान करण्याचं आवाहन केलं जाणार आहे. 18 डिसेंबरनंतर प्रत्येक तालुका आणि ब्लॉकच्या स्तरावर 5,000 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, दोन्ही कार्यक्रमाचा अंदाज घेऊन प्रशासन सतर्क झालं आहे. पूर्ण जिल्ह्यात 144 कलम लावण्यात येणार आहे. त्यामुळे वादग्रस्त भागात लोकांनी एकत्र जमण्यासाठी बंदी आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)