अहमदनगर : जिथे पाण्यासाठी श्रमदान तिथेच शुभमंगल सावधान!

    • Author, अभिजीत कांबळे
    • Role, बीबीसी मराठी

उघडं माळरान, त्यावर रणरणतं ऊन, आणि या उन्हात टिकाव-फावड्यानं जमीन खोदण्याचं काम सुरू होतं. जिकडे नजर टाकली तिकडे धूळ. आणि अशातच 'शुभमंगल सावधान'चे सूर ऐकू आले!

अहमदनगर जिल्ह्यातल्या टाकळी खंडेश्वरी गावातल्या माळरानावरचं हे दृश्य, जिथे जलसंधारणासाठी श्रमदान सुरू असताना एक जोडपं विवाहबंधनात अडकलं. साता जन्माच्या गाठी बांधताना, आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत राहण्याची वचनं घेताना या जोडप्याने श्रमदान करत दुष्काळमुक्तीचा संदेशही दिला.

महाराष्ट्रात ज्या भागांमध्ये कायम पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं. अशाच भागांपैकी एक म्हणजे नगर जिल्ह्यातला कर्जत तालुका. या तालुक्यात टाकळी खंडेश्वरी गावात आमीर खानच्या 'पानी फाऊंडेशन'तर्फे जलसंधारणासाठी श्रमदान उपक्रम राबविला जात होता.

त्याच दरम्यान टाकळी गावात राहणारे नानासाहेब वाघमारे आणि सोलापूरच्या शीतल पुजारी यांनी आपल्या आयुष्यातल्या सर्वांत महत्त्वाच्या क्षणाचा योग साधला. जिथं श्रमदान सुरू होतं, त्याच ठिकाणी आंतरपाट धरून, मंडपाशिवाय या दोघांवर अक्षता पडल्या.

दहावीपर्यंत शिकलेले नानासाहेब हे शेतकरी 1 एप्रिलपासून जलसंधारण मोहिमेत श्रमदान करत होते. त्याच वेळी सोलापूर जिल्ह्यातील बाळे गावच्या शीतल यांच्याशी त्यांचं लग्न निश्चित झालं.

'...तर लग्नातून लोकांना संदेश जाईल'

मग चर्चा सुरू झाली की लग्न कुठे करायचं, कधी करायचं, कसं करायचं. तेवढ्यात नानासाहेबांचे चुलतभाऊ विकास वाघमारे यांनी सुचवलं की श्रमदान सुरू असलेल्या ठिकाणीच लग्न केले तर...?

यावर नानासाहेब आणि शीतल दोघंही विचारात पडले. आणि काही वेळाने त्यांनी निर्णय घेतला - "करूया! लग्न श्रमदानाच्या ठिकाणीच करूया."

या निर्णयाविषयी बोलताना शीतल सांगतात, "प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपलं लग्न थाटामाटात व्हावं. आयुष्यातला तो एक महत्त्वाचा क्षण असतो. माझंही स्वप्न होतं की आपलं लग्न थाटामाटात व्हावं. माझ्या आई-वडिलांची परिस्थिती नाजूक असली तरी आपल्या कुवतीप्रमाणे लग्नसोहळा व्हावा, असा आमचा विचार होता."

"श्रमदानाच्या ठिकाणी लग्न करण्याचा प्रस्ताव समोर आला तेव्हा मी विचारात पडले. इतके दिवस आपण लग्नाबाबत ज्या कल्पना केल्या होत्या, जी स्वप्नं सजवली होती त्यांचं काय?"

त्या पुढे सांगतात, "लग्नाबाबत विचार करत असतानाच मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पाणीटंचाईची, आणि त्यामुळे माझ्यासारख्या असंख्य महिलांना होणाऱ्या त्रासाची. पाणी अडवण्यासाठी आणि पाणी जिरवण्यासाठी सुरू असलेल्या श्रमदानात जर आपण लग्न केलं तर त्यातून एक संदेश जाऊ शकेल. या संदेशातून प्रेरणा घेत 'पाणी अडवा-पाणी जिरवा' या मोहिमेत अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी होतील. याचा मोठा फायदा माझ्यासारख्या असंख्य महिलांना होईल ज्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते. म्हणून मी अखेर निर्णय घेतला की आपण श्रमदान करतच लग्न करायचं."

दोघांना एकमेकांची साथ

शीतल यांच्या या निर्णयाला नानासाहेबांचीही साथ मिळाली. नानासाहेब स्वत: या ठिकाणी 1 एप्रिलपासून श्रमदान करत होते. त्यांच्यासाठी हा एक वेगळाच अनुभव होता. ऐन दुपारी 12 च्या रणरणत्या उन्हात हा सोहळा पार पडला. आजूबाजूच्या गावातील अनेक गावकरी, जलसंधारण मंत्री राम शिंदे हे या लग्नसोहळ्याला हजर होते.

लग्नासाठी कोणताही मंडप घातला गेला नव्हता. जलसंधारणासाठी खोदलेल्या जागेतच आंतरपाट धरला गेला. तळपत्या उन्हातच मंगलाष्टकं पार पडली. डोक्यावर अक्षता पडल्यावर नवरदेव-नवरी दोघांनीही कुदळ-फावडं-घमेलं हातात घेऊन श्रमदान केलं.

एवढंच नाही तर लग्नानंतरही हे जोडपं श्रमदानासाठी नियमितपणे जात आहे.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राला भीषण दुष्काळाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळं पाण्याचा थेंब न थेंब वाचवणं राज्याच्या लोकांसाठी महत्त्वाचं आहे.

एकीकडे महाराष्ट्र सरकारच्याच जलयुक्त शिवार योजनेतून या दिशेत राज्यभरात कामं होत असताना नानासाहेब आणि शीतल यांचं हे लग्न पंचक्रोषीत चर्चेचा विषय बनलं आहे.

टाकळी खंडेश्वरीचे गावकरी किरण पाटील यांनी सांगितलं की, "आमच्या भागाला दुष्काळाचा वारंवार सामना करावा लागला आहे. अत्यंत भीषण दुष्काळी परिस्थितीतून आम्हाला गेलो आहे. त्यामुळे पाणी आमच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून या जोडप्यानं कुदळ-फावडं हातात घेऊन दिलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे."

लग्नसोहळ्याला उपस्थित महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी या जोडप्याचं कौतुक करताना म्हटलं की, "दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी या जोडप्याने डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या असताना श्रमदान केलं, हा त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. समाजाला एखादा संदेश देण्यासाठी लग्नसोहळ्यासारख्या महत्त्वाच्या क्षणात तडजोड करणं ही सोपी गोष्ट नाही. नानासाहेब आणि शीतलचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)