#MeToo : 'दारूमुळे लैंगिक क्षमता नव्हे तर नियम तोडण्याची वृत्ती बळावते'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"दिवसभर शूटिंग करताना त्यांचं स्त्रियांबरोबरचं वर्तन हे अतिशय विनम्र आणि सामान्य असे. दारू प्यायलानंतर मात्र ते वेगळे असायचे. त्यांच्यात बदल व्हायचा. असं वाटायचं की ते दुहेरी आयुष्य जगत आहेत."
#MeToo मोहिमेसंदर्भात एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं सहकारी अभिनेत्यासंदर्भात काढलेले हे उद्गार आहेत.
#MeTooच्या अनेक उदाहरणांमध्ये मद्यपानानंतरच्या बेताल वर्तनाचा उल्लेख सातत्यानं येत आहे. यानिमित्ताने दारूमुळे खरंच लैंगिक भावना उद्दीपित होतात का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नियम मोडण्याची वृत्ती बळावते
"दारूमुळे प्रस्थापित नियमांची चौकट मोडण्यास बळ मिळतं. पण दारूमुळे लैंगिक क्षमता वाढीस लागत नाही. त्या विशिष्ट व्यक्तीची दारू पिण्याची वारंवारता किती आहे, त्या प्रसंगावेळी त्याने किती दारू प्यायली आहे यावरही वर्तन अवलंबून असतं. दारू प्यायल्यामुळे आक्षेपार्ह वर्तनाबद्दलची मनातली बंधनं शिथील होतात. सध्याच्या परिस्थितीत दारू हे कारण बहाणा म्हणून वापरण्याची शक्यता जास्त आहे," असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते यांनी सांगितलं.
ही शुद्ध पळवाट
"दारू पिऊन लैंगिक अत्याचाराची शेकडो उदाहरणं आहेत. मात्र दारूच्या नशेत आक्षेपार्ह वागलो ही सबब होऊ शकत नाही. दारू प्यायलानंतर सामाजिक दडपणं झुगारली जातात. काही गोष्टी बंधन म्हणून आपण स्वीकारलेल्या असतात, त्या शिथिल होतात. दारूमुळे भान राहत नाही ही शुद्ध पळवाट आणि लबाडी आहे," असं मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे सांगताना म्हणाले, "दारू प्यायलानंतरचं वागणं हे कायद्यासमोर सिद्ध होऊ शकत नाही. दारू पिण्याचा निर्णय पूर्ण शुद्धीत घेतला जातो. त्यामुळे दारू प्यायलानंतरच्या वर्तनाची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. हे पुरुष आणि महिला दोघांनाही लागू आहे. मात्र एखाद्या महिलेला नकळत दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात येऊ शकतात. Alcohol increases the desire but decreases the performance हे जुनं तत्व आहे."
"दारूमुळे लैंगिक क्षमता चाळवते किंवा वाढीस लागते असं नाही. प्रत्येक माणसाची नैतिकतेची व्याख्या ठरलेली असते. व्यक्तिमत्वानुसार मूल्यव्यवस्था भिन्न असते. दारू पिणारी प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं शोषण करत नाही. कुठलंही व्यसन नसणारी व्यक्तीही शोषण करते. दारूमुळे शरीरात बदल होऊन लैंगिक शोषण किंवा अत्याचारासाठी प्रेरणा मिळत नाही. व्यक्तीपरत्वे सारासार विचारांचा बांध सुटण्याचा क्षण वेगवेगळा असतो. पण बेताल वागण्याचं दारू निमित ठरू शकते," समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ कल्याणी कुलकर्णी स्पष्ट करतात.
WHOचा अहवाल काय म्हणतो?
दारू सेवन आणि हिंसक वागणं यांच्यातील परस्परसंबंध गुंतागुंतीचा आहे. नियमांची प्रस्थापित चौकट बाजूला सारण्यासाठी दारू एक पर्याय ठरतो असं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
नियमबाह्य वर्तनासाठी मद्यपान ही एक सबब ठरते. मद्यपानानंतरच्या आक्षेपार्ह वर्तनासाठी शिक्षा होणार नाही किंवा नियमातून सूट मिळेल असं आरोपींना वाटतं. सामूहिक हिंसक वर्तन आणि मद्यपान एकमेकांशी संलग्न असतात.
महिलांचं लैंगिक शोषण होण्यामागील महत्त्वाच्या कारणांमध्ये मद्यसेवनाचा समावेश होतो. नवरा किंवा सहकारी दारुच्या नशेत असल्यास लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता अधिक असते तसंच महिलेनं स्वत: मद्यपान केलं असल्यास अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता घटते.
लैंगिक वर्तणुकीसंदर्भात सामाजिक नीतीनियम, कायदेकानून झुगारून देण्याची मानसिकता दारू तयार करते किंवा उद्युक्त करते. दारू प्यायलानंतर पौरुषत्वाच्या अतिशयोक्त कल्पना मनात तयार होऊन लैंगिकदृष्ट्या आक्रमक वर्तन घडतं.
मद्यपानाच्या सायकोफार्मालॉजिकल परिणामांमुळे सामाजिक नीतीनियम झुगारून देण्याची प्रवृत्ती बळावते. दारूमुळे सारासार विचार तसंच आकलन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.
मद्यपान हा बचाव होऊ शकत नाही
लैंगिक अत्याचार किंवा इतर कोणाताही गुन्हा दारूच्या नशेत घडला, हा बचाव न्यायालयात मान्य होऊ शकत नाही, अशी माहिती कोल्हापुरातील निवृत्त पोलीस उपाधीक्षक भीमराव चाचे यांनी दिली.
ते म्हणाले, "लैंगिक अत्याचारांच्या तसंच इतरही काही गुन्ह्यांत आरोपी दारूच्या नशेत हे कृत्य घडलं, असा बचाव न्यायालयात मांडतानाची उदाहरणं आहेत. घडलेला गुन्हा करण्यामागे कोणतंही पूर्वनियोजन नव्हतं, गुन्हा करण्याचं धैर्य दारूच्या किंवा इतर नशेमुळे माझ्यात आलं, असा हा बचाव असतो. पण असा बचाव न्यायालय मान्य करत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"कोपर्डीमध्ये जो बलात्काराचा गुन्हा घडला, त्यातील दोषी दारूच्या नशेत होते. पण हा गुन्हा नियोजित होता. कारण ती मुलगी कोण आहे, कुठल्या गावची आहे हे दोषींना चांगलंच माहिती होतं. निव्वळ दारूच्या नशेत घडलेलं हे कृत्य नव्हतं," असं ते म्हणाले.
दारूमुळे परिणामांची भीती हरपते
"दारूच्या प्रभावाखाली लैंगिक अत्याचार, शोषणाचे गुन्हे घडतात हे अनेक आंतरराष्ट्रीय संशोधनांद्वारे सिद्ध झालं आहे. दारुच्या अमलाखाली मेंदूवरचं नियंत्रण कमी होतं. सामाजिक बंधनं दूर सारण्याची प्रवृत्ती दारूमुळे वाढीस लागते. ज्यांचा मूळ स्वभाव उतावीळ, आक्रमक असतो त्यांची नियम झुगारून देण्याची वृत्ती दारूमुळे उफाळून येते. परिणामांची भीती हरपते," असं डॉक्टर आणि दारूमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
सिनेसृष्टी, कॉर्पोरेट क्षेत्र, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दारू पिणं हा संस्कृतीचा अविभाज्य घटक झाला आहे. 80, 90च्या दशकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणं टॅबू होतं. मात्र आता त्याला सामाजिक मान्यता मिळाली आहे. दारू न पिणारी व्यक्ती काहीतरी चुकीचं करत आहे असं समजलं जातं.
दारू पिणं किंवा ना पिणं हा वैयक्तिक मुद्दा आहे. स्त्री-पुरूष हा भेद नाही. पण दारूच्या परिणामांविषयी जागरुकता हवी.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









