You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : RSS भाजपपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे का?
- Author, नीरजा चौधरी
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या तीन दिवसीय चर्चासत्रात संघाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतं मांडली.
गाईचं रक्षण करण्याबद्दल संघ आग्रही आहे, पण त्यामुळे होणाऱ्या हिंसेचं मात्र तो समर्थन करत नाही, असं भागवत यांनी म्हटलं आहे.
त्यांना भारताची राज्यघटना मान्य आहे, धर्मनिरपेक्षता मान्य आहे, राजकारणात विरोधी पक्षांच्या भूमिकेचं ते समर्थन करतात आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गोष्ट करतात.
भारतीय जनता पक्षाच्या काँग्रेसमुक्त भारताच्या भूमिकेचं संघ समर्थन करत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. समर्थक असो अथवा विरोधक ते सर्वांनाच आपलं मानतात.
असं वाटत आहे की, आरएसएस स्वत:ला मुख्य प्रवाहात आणू पाहत आहे आणि त्याद्वारे प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत आहे.
संघ असं का करत आहे आणि याच वेळेला का करत आहे, हे वेगळे प्रश्न आहेत आणि त्यावर चर्चा करता येऊ शकते.
'भारतात राहणारे सर्वच लोक हिंदू'
भारतात राहणारे सर्वच लोक हिंदू आहेत आणि मुस्लीमही हिंदूच आहेत, असं संघ म्हणत आला आहे.
भारतात लोक हिंदू शब्दाकडे धर्म म्हणून पाहतात. यामुळे संघानं मुस्लिमांना हिंदू म्हणण्याऐवजी भारतीय म्हटलं पाहिजे होतं.
मुस्लीमही हिंदू शब्दाकडे एक धर्म म्हणून पाहतात. त्यामुळे मोहन भागवतांनी हिंदू शब्दाचा केलेला वापर हा त्यांच्या जुन्याच भूमिकेचा पुनरुच्चार ठरतो.
असं असलं तरी काही दिवसांपूर्वी एकदम रोखठोक बोलणाऱ्या मोहन भागवत यांच्या भाषेत सध्या बदल झाला आहे.
यात लक्षात घ्यायची बाब म्हणजे हे सर्व बोलण्यासाठी हीच वेळ का निवडली गेली.
या दोन्ही बाबींवर नजर टाकल्यास तुमच्या लक्षात येईल की संघाची नजर आता उदारमतवादी हिंदूंवर आहे. उदारमतवादी विचारधारा असणाऱ्या हिंदूंना आपल्या बाजूनं ओढण्याची संघाची इच्छा आहे.
हेच उदारमतवादी हिंदू लिंचिंग आणि लव्ह जिहाद यासारख्या घटनांपासून नाराज होते. तसंच भाजपच्या काँग्रेसमुक्त भारत या संकल्पनेवर ही मंडळी नाराज होती. कारण लोकशाहीत विरोधकांची गरज आहे आणि देशात एकच पक्ष सत्तेवर असण्यात त्यांना कमी विश्वास आहे, असं या उदारमतवादी हिंदूंना वाटतं.
'आधुनिकता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर संघाचा विश्वास'
आधुनिकता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर संघाचा विश्वास आहे, असा मेसेज या नाराज मंडळीला द्यायचा मोहन भागवत यांनी प्रयत्न केला.
भाजप नेतृत्वापासून अंतर ठेवायची संघाची इच्छा आहे, असा दुसरा मेसेज द्यायचा प्रयत्न होता. तसंच विद्यमान सरकारच्या बाबतीत संघ पुरेशा प्रमाणात खूश नाही, असंही त्यांनी सांगायचा प्रयत्न केला.
संघाचे स्वयंसेवक कोणत्याही राजकीय पक्षाला मतं देऊ शकतात. असं असलं तरी संघ भाजपसाठी राजकीय भूमी तयार करत आला आहे, हे सर्वांना माहिती आहे. भाजपपासून दूर राहण्याची संघाची इच्छा आहे, हे यातून स्पष्ट होतं.
पण यालाच दुसऱ्या अर्थानं बघितलं तर समजतं की, भाजप म्हणजेच मोदी असं जे समीकरण झालं आहे त्याला संघ मेसेज देऊ इच्छित आहे की, संघाच्या पाठिंब्याशिवाय भाजप काहीच करू शकत नाही.
प्रत्येकच यशाला नरेंद्र मोदी यांचं यश म्हणण्यावरही संघ नाराज आहे का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
मोहन भागवत यांनी समलैंगिकतेवरही मत मांडलं. समलैंगिकांनाही जगण्याचा अधिकार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. ये सर्वं उदारमतवादी दिसण्यासाठीचे प्रयत्न आहेत.
यामधून हिंदूंना मग ते सवर्ण असो अथवा उदारमतवादी सर्वांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
2019च्या निवडणुकीवर डोळे ठेवून भागवत असं म्हणत असतील असंही असू शकतं. कारण ज्याप्रकारचा पाठिंबा 2014मध्ये भाजपला मिळाला होता त्यात घट होताना दिसत आहे.
मोहन भागवत यांच्या उदारमतवादी विचारानंतर बजरंग दलासारख्या संघटनांची भविष्यातील वर्तणूक कशी असेल, हे आता पाहायचं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)