You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'संघ दक्ष' : राहुल-अखिलेशना निमंत्रण तर मोदी-शहांना इशारा
- Author, स्वाती चतुर्वेदी
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नागपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित केलं होतं. संघाचा हा प्रयोग नागपूरहून दिल्लीला पोहोचला आहे. दिल्लीतल्या विज्ञान भवनात संघाचा मंथन कार्यक्रम सुरू आहे, ज्यात संघाची माणसं देशाच्या भविष्यावर चर्चा करत आहेत.
'भारताचं भविष्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन' असा या चर्चेचा विषय आहे. तीन दिवसांच्या या चर्चासत्रात पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी मत मांडलं.
या चर्चासत्रात संघाच्या अनेक अजेंड्यांचा समावेश आहे.
संघ हा विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवतो, असा स्पष्ट संदेश या चर्चासत्रातून संघाला द्यायचा आहे.
तसंच भाजपचं राजकारण आणि धोरणावरही संघाचं नियंत्रण आहे, असंही संघ सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
राहुल, भाजप आणि संघ
संघानं या चर्चासत्रासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणं धाडली होती. संघाला 'एक्स्लुझिव्ह' संघटना असं संबोधणाऱ्या या नेत्यांना संघ या माध्यमातून स्पष्ट संदेश देऊ पाहत आहे.
भाजप आणि संघ द्वेषाचं राजकारण करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केला आहे. या दोन्हींच्या तिरस्काराचं उत्तर आपण प्रेमानं देऊ, असंही राहुल यांनी म्हटलं होतं. राहुल यांनी सर्वांना चकित करत संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली होती आणि हाच संदेश द्यायचा प्रयत्न केला.
राहुल यांना त्यांचं हे वक्तव्य तपासून घेण्यासाठी संघाने त्यांना मोहन भागवत यांचं भाषण ऐकण्यासाठी बोलावलं होतं.
मोदी आणि शाह यांनाही मेसेज
संघाच्या निमंत्रणावर काँग्रेस पक्षानं मौन धारण केलं आहे. राहुल यांना कार्यक्रमात मत मांडण्याची संधी दिली असती तर ते या कार्यक्रमाला गेले असते, असं पक्षानं म्हटलं आहे. ज्या विचारसरणीचा राहुल विरोध करतात, त्या विचारसरणीला ते फक्त ऐकायला कसे काय जातील, अशी काँग्रेसची भूमिका होती.
काँग्रेसचं हे उत्तर फारस समाधानकारक वाटत नाही.
दुसरीकडे अखिलेश यादव यांचं म्हणणं आहे ते संघाला खूपच कमी ओळखतात. सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातली होती आणि सरदार पटेल स्वत:ला संघापासून दूर ठेऊ इच्छित होते, असं अखिलेश सांगतात.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नागपूरमधील भाषणानंतर काँग्रेसनं त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांना मैदानात उतरवलं. मुखर्जींचं भाषण इतिहासजमा होईल पण त्यांचे फोटो मात्र वापरण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं होतं.
विज्ञान भवनात सुरू असलेली चर्चा हा एक खेळीचा भाग आहे. या खेळीची सुरुवात मुंबईहून झाली. मुंबईतील कार्यक्रमातही मोहन भागवत यांनी भूमिका मांडली होती.
संघाची ताकद भाजपपेक्षा जास्त आहे, ही बाब संघ फक्त देश आणि विरोधकांनाच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनाही या चर्चासत्रातून दाखवून देत आहे.
अमित शहा यांच्या 'काँग्रेस मुक्त भारत' या घोषणेवर भाष्य करताना मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की, 'ती राजकारणाची भाषा आहे, संघाची नव्हे.'
मुरली मनोहर जोशी यांना राष्ट्रपती करावं, ही मोहन भागवत यांची इच्छा होती. ती डावलल्याने संघ नरेंद्र मोदी यांच्यावरही नाराज आहे.
प्रतिमा बदलण्याचा संघाचा प्रयत्न
संघ हळूहळू स्वत:ला बदलत आहे. नुकतंच संघानं गणवेशात बदल केला आहे.
भारताला मातृभूमी समजणारी प्रत्येक व्यक्ती आमची आहे. आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत, असं भागवत नेहमी सांगत असतात, असं संघाच्या एका नेत्याचं म्हणणं आहे.
लोकांपर्यंत संघाची ही प्रतिमा पोहोचावी, असा संघाचा प्रयत्न असणार आहे. पण संघ यात यशस्वी होईल का?
मोहन भागवत विश्व हिंदू संमेलनाच्या कार्यक्रमासाठी शिकागोला गेले होते. रानटी कुत्री एका सिंहावर हल्ला करत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावर टीकाही झाली होती. तर आज भाजपची केंद्रात आणि देशातल्या 22 राज्यांत सत्ता आहे.
"भारत एक हिंदूबहुल देश आहे. बहुसंख्याकांचं राजकारण करणारेच देशावर राज्य करतील, असा संदेश लोकांना देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत आणि हेच आमचं सर्वांत मोठी यश आहे," असं संघाशी जोडलेले भाजपचे एक नेते सांगतात.
हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनं चालेल की संघाच्या 'हिंदूप्रथम' राजकारणाने, हे 2019चं ठरवेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)