You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
...जेव्हा संघ मुख्यालयात प्रणवदा नेहरूंच्या राष्ट्रवादाची शिकवणी घेतात
- Author, राजेश प्रियदर्शी
- Role, डिजिटल एडिटर, बीबीसी हिंदी
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरच संघाच्या विचारधारेशी भिन्न असे विचार मांडले.
नागपूरस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा एकदा उल्लेख केला. मात्र संघासाठी ही दिलासा देणारी गोष्ट ठरली नाही.
अनेकविध तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर प्रणवदांनी आपल्या भाषणात जे सांगितलं तो नेहरूंनी दिलेला वारसाच होता.
प्रणवदांनी इंग्रजीत दिलेल्या भाषणात देशाचा इतिहास, संस्कृती आणि छाप याबाबत विचार मांडले. अशा भारताचा संदर्भ नेहरूंनी आपल्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकात दिला होता. प्रणवदांच्या भाषणाचं बीज नेहरूंच्या पुस्तकात सापडतं.
भाषणाची सुरुवात टोकदार झाली. ते म्हणाले, 'मी इथे प्रामुख्याने तीन गोष्टींविषयी बोलणार आहे. राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती. या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. त्यांना वेगळं केलं जाऊ शकत नाही.
त्यानंतर त्यांनी शब्दकोशातून राष्ट्र या संकल्पनेची व्याख्या सांगितली. त्या क्षणापासून त्यांच्या भाषणाचा बाज आणि उद्देश स्पष्ट झाला. देशासंदर्भातील काही मूलभूत संकल्पनांबाबत प्रणवदा संघ कार्यकर्त्यांची शिकवणी घेणार हे ओघाने आलंच. भाषणाच्या अगदी सुरुवातीला त्यांनी महाजनपदांविषयी सांगितलं. इसवीसनपूर्व सहाव्या शतकात त्याचे संदर्भ आढळतात. तथ्यांवर आधारित ठोस इतिहास ही तेव्हाच्या भारताची ओळख होती.
हा इतिहास संघशिकवणीच्या परस्पर विरोधाभासी आहे. हिंदू मिथकांचा समावेश असलेला इतिहास संघासाठी प्रमाण आहे. यानुसार सगळे नागरिक हिंदू आहेत, तोपर्यंत संघाला काही अडचण नाही. जसं बिगरहिंदू व्यक्तींचा समावेश होताच सगळी परिस्थिती बिघडते. या इतिहासात विश्वाचं समस्त ज्ञान, वैभव आणि विज्ञान आहे. यानुसार त्याकाळी पुष्पक विमानं उडत असत. प्लॅस्टिक सर्जरी होत असत. महाभारत काळात इंटरनेट होतं.
इसवीसनपूर्व चारशे वर्षांपूर्वी मॅगेस्थेनस भारतात आला तेव्हा त्यांनी महाजनपद प्रशासित भारत पाहिला. त्यानंतर प्रणवदांनी चीनच्या ह्युआन सांग या प्रवाशाचा उल्लेख केला. सातव्या शतकात भारत कसा होता याचं वर्णन ह्युआन सांग यांनी केलं होतं. तक्षशीला आणि नालंदा विद्यापीठं जगभरातल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करत होती.
नेहरूंनी आपल्या पुस्तकात या सगळ्याचा उल्लेख केला आहे. ज्यांना नेहरूंचं पुस्तक झेपणारं नाही त्यांनी युट्यूबवर श्याम बेनेगेल यांची भारत एक खोज मालिका पाहावी. ही मालिका नेहरूंच्या पुस्तकावर बेतलेली आहे.
खुल्या वातावरणात कलात्मकता, सर्जनशीलता कशी वाढीस लागली याबाबत प्रणवदांनी विवेचन केलं. युरोपीय देशांच्या तुलनेत भारताची राष्ट्र नावाची संकल्पना किती जुनी आणि वेगळी आहे याचा दाखला त्यांनी दिला.
या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. राष्ट्र या संकल्पनेची दोन प्रारुपं आहेत. एक युरोपीय आणि दुसरं भारतीय. युरोपीय देशांसाठी राष्ट्र म्हणजे एक धर्म, एक भाषा, एक वंश, एक शत्रू या पायावर आधारित आहे. भारतासाठी राष्ट्र म्हणजे विविधता आणि सहिष्णुता.
धर्म, द्वेष आणि भेदभावाच्या जोरावर राष्ट्राची ओळख जोडण्याचा प्रयत्न झाल्याने राष्ट्र ही मूळ संकल्पनाच कमकुवत झाली आहे हे सांगायला प्रणवदा विसरले नाहीत. या सगळ्या गोष्टी प्रणवदा नागपूर इथे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्यातील व्यासपीठावर बोलत होते. त्यामुळे या गोष्टींना अपार महत्त्व आहे.
प्रणवदांच्या भाषणासंदर्भात अनेक शंकाकुशंका होत्या. महत्त्वपूर्ण अशा भाषणासाठी प्रणवदांनी नेहरूंच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा आधार घेतला. सम्राट अशोक या देशाचा महान राजा होता. अशोकाच्या कारभाराने लोकशाही व्यवस्थेची बीजं रुजवली तसंच राष्ट्रीय चिन्ह अशोकचक्र या राजाचीच देणगी होती, असं नेहरूंचं म्हणणं होतं.
माजी राष्ट्रपती असलेले प्रणवदा म्हणाले, "चंद्रगुप्त मौर्याचे वंशज असलेल्या राजा अशोक यांनी विजयाच्या जल्लोषात शांतता आणि प्रेम यांचं महत्त्व जाणलं. त्यांनीच बंधूभावाचा संदेशही दिला."
मात्र दुसरीकडे भारत देश सनातन धर्माचं मंदिर आहे, असा संघाचा सिद्धान्त आहे. या देशावर राज्य करणारे प्रशासक बाहेरून आले मात्र भारताचा मूळ धर्म हिंदू आहे आणि या देशाला हिंदूशास्त्र, रीतीरिवाज, परंपरा यांच्यानुसार वाटचाल करायला हवी. मात्र प्रणवदांनी परस्परविरोधी भूमिका मांडली. एक भाषा-एक धर्म- एक ओळख हा आपला राष्ट्रवाद नसल्याचं प्रणवदांनी स्पष्ट केलं.
त्यांनी भाषणादरम्यान महात्मा गांधींचाही संदर्भ दिला. भारताचा राष्ट्रवाद आक्रमक आणि भेदभावकारी असू शकत नाही. तो समन्वयाच्या मार्गानं जाणारा असेल असं गांधी म्हणाले होते.
संघाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी
याव्यतिरिक्त प्रणवदांनी मांडलेल्या दोन गोष्टी संघाच्या मंडळींना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. धर्मनिरपेक्षतता ही एक श्रद्धा आहे तसंच भारताच्या संविधानाला प्रमाण मानणं म्हणजेच खरी देशभक्ती असं प्रणवदा म्हणाले.
हिंदुत्वाची संस्कृती आधारभूत मानणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या साक्षीने प्रणवदांनी संमिश्र सर्वसमावेशक संस्कृतीचं महत्त्व विषद केलं. देशातल्या हिंसक घटना कमी व्हायला हव्यात, नागरिकांचा एकमेकांप्रति असलेला राग आणि द्वेष कमी व्हायला हवा, एकमेकांप्रती आदर आणि प्रेम वाढीस लागायला हवं याकडे प्रणवदांनी लक्ष वेधलं.
एकूणात त्यांचं भाषण उदार, लोकशाही मूल्यं, प्रागैतिक, संविधान प्रमाणित, मानवतावादी भारताबद्दल होतं. या गोष्टींची बैठक महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी प्रस्थापित केली होती. प्रशिक्षित, शिस्तबद्ध आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित संघ स्वयंसेवकांनी यातून काय बोध घेतला हे तेच जाणोत!
प्रणवदांनी समरसून शिकवणी घेतली. त्यांनी संघाच्या व्यासपीठावर जाण्याने चिंताक्रांत झालेले काँग्रेसजन आता टाळ्या पिटत आहेत. मागच्या पिढीतले जुनेजाणते नेते असल्याचं प्रणवदांनी सिद्ध केलं. प्रणवदांसारख्या नेत्यांचं म्हणणं आजकाल संघसमर्थक असो की काँग्रेस अभावानंच ऐकलं जातं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)