World Photography Day 2018 : मोबाइलनं फोटो काढून व्यावसायिक फोटोग्राफर होता येतं का?

    • Author, इंद्रजीत खांबे
    • Role, व्यावसायिक छायाचित्रकार

कल्पना करा की तुम्ही तुमच्या मोबाइल फोननं काही फोटो काढले आणि ते एखाद्या स्पर्धेला पाठवले. तिथं आलेल्या असंख्य छायाचित्रांपैकी काही मोजक्या छायाचित्रांना बक्षीस दिलं जाणार आहे. त्यात तुम्ही पाठवलेलं छायाचित्र देखील आहे.

तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तिथं प्रोफेशनल फोटोग्राफर्स त्यांच्या लाखो रुपयांच्या कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रं पाठवतील. तिथं मोबाइलनं पाठवलेल्या फोटोंचा काय निभाव लागणार?

ही गोष्ट दुर्मीळ वाटत असली तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. रॉनी सेन या कोलकात्याच्या फोटोग्राफरनं झारखंडमधील झरीया येथील कोळशांच्या खाणीत जाऊन मोबाईलनं फोटो काढले. त्याने आयफोन 5 हे मॉडेल त्यासाठी वापरलं होते. हे काम जगभर गाजतंय आणि त्याच्या फोटोंचं पुस्तकही आलेलं आहे.

पण हे वाटतं तितकं सोपं देखील नाही. त्यासाठी मेहनत आणि एका विशिष्ट दृष्टिकोनाची गरज आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.

तंत्रज्ञानाच्या शिरकावामुळं अनेकांना कॅमेरा घेणं आणि फोटो काढणं परवडू लागलं आहे. त्याचवेळी फोटोग्राफीत पूर्वीसारखी अस्सल मजा राहिली नाही अशी देखील ओरड आपल्याला ऐकायला मिळते.

पण मोबाइलनं काढलेल्या फोटोंमुळे आपण व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून नावारुपाला येऊ शकतो का? याचा विचार करणं हे आवश्यक ठरतं.

मोबाइल फोटोग्राफीमुळं या कलेचं लोकशाहीकरण झालं आहे हे देखील आपल्याला कबूल करावं लागेल. आता आपण नेहमी ऐकतो खरी फोटोग्राफी- खोटी फोटोग्राफी. यामध्ये काही तथ्य आहे का असा प्रश्न ओघानंच येतो.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे खरी फोटोग्राफी वा खोटी फोटोग्राफी या व्यक्तीसापेक्ष कल्पना आहेत. प्रत्येक तांत्रिक क्रांतीचे फायदे-तोटे असतात.

मोबाईल कॅमेरा बाजारात येऊन फारफारतर पाच वर्षं झाली आहेत. इतक्या कमी कालावधीतच तंत्रज्ञानामुळं तोटा होत आहे असा निष्कर्ष काढणं अयोग्य आहे.

मोबाइल कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान रोज बदलत आहे. त्यात सुधारणा होत आहेत. मोबाईलमुळे खरी फोटोग्राफी अस्ताला जातेय असं मानणारा वर्ग बहुतांशी फिल्म कॅमेरा वापरणारा होता. फिल्म कॅमेरा आणि डार्क रूममध्ये फोटो डेव्हलप करण्याची एक वेगळी मजा होती. जी मजा आज मोबाईलमध्ये नाही हे खरं आहे.

कारण आपल्याला मोबाइल स्क्रीनवर फोटो लगेच दिसतो. परंतु त्याचबरोबर मोबाइलमुळे या कलेचं लोकशाहीकरण झालं आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल.

निरीक्षण केलं तर एक गोष्ट कळेल की मोबाइलनं फोटो काढणारे बहुतांश फोटोग्राफर्स बरेचदा नेहमीचं जगणं डॉक्युमेंट करत आहेत. त्यांचे फोटो हे रोजच्या लोकांचं जगणं मांडणारे आहेत.

मोबाइल हे माध्यम सतत तुमच्याबरोबर राहू शकतं. कॅमेऱ्याबाबत तसं म्हणता येणार नाही. त्यामुळे जाता येता रस्त्यावर फिरताना तुम्ही काही गोष्टी तुमच्या मोबाइलमध्ये कैद करू शकतात. याच फोटोग्राफीला स्ट्रीट फोटोग्राफी म्हणता येतं.

रस्त्यावरचं आयुष्य कसं आहे हे त्या कलाकाराच्या नजरेतून मांडता येतं. त्यासाठी तुम्ही कॅमेरा वापरत आहात की मोबाइल कॅमेरा ही गोष्ट निराळी. स्ट्रीट फोटोग्राफीचा जन्म मोबाइल कॅमेरा येण्याआधीचा आहे.

सौंदर्य कुठे नाही फक्त नजर हवी?

हा प्रकार युरोप अमेरीकेत फार पूर्वीपासून आहे. भारतात तो गेल्या 10 वर्षांत वाढतो आहे. या प्रकाराचं सर्वांत मोठं आव्हान मला हे वाटतं की अगदी सर्वसामान्य रस्त्यावरच्या प्रसंगातून एक छायाचित्र जन्म घेतं. त्यासाठी तुम्हाला थोडं धाडस दाखवावं लागतं. रस्त्यावर चालणाऱ्या असंख्य माणसांच्या नजरेत तुमच्याविषयी संशय असतो.

हे छायाचित्र नेमकं का काढलं जात आहे याबाबत शंका असते. या सर्व गोष्टींना सामोरं जात, तुम्हाला फोटो काढत राहावं लागतं. कालांतराने समाजाचं आणि एका ठाराविक कालखंडात लोकं कशी जगत होती याची साक्ष हे फोटो देतात.

स्ट्रीट फोटोग्राफी या प्रकारात रस्त्यानं चालताना किंवा सार्वजनीक ठिकाणी काहीतरी गमतीशीर घडतं ते तुम्हाला टिपावं लागतं.

रस्त्यावर खूप वेगाने घटना घडत असतात. त्यामुळे तुम्हाला खूप वेगाने फ्रेमिंग, कंपोझिंग, लाईट याचा विचार करावा लागतो जे एक आव्हान असतं.

सराव, सराव आणि फक्त सराव

एकदा रॉजर फेडररला एका पत्रकारानं विचारलं तुमच्या सातत्यपूर्ण खेळाचं रहस्य काय? तेव्हा त्यानं उत्तर दिलं होतं, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अॅंड ओन्ली प्रॅक्टिस.

फोटोग्राफी ही कला आहे. जसं संगीतासाठी रियाज किंवा क्रिकेटसाठी प्रॅक्टिस आवश्यक असते तसंच इथेही आहे. सचिन तेंडूलकरला जर खेळताना पाहिलं तर प्रश्न पडतो की 150 किमोमीटर वेगाने येणारा बॉल तो नेमका सीमारेषेबाहेर कसा घालवतो. याचं उत्तर असतं नेटप्रॅक्टीस.

सचिन मैदानावर जेवढा वेळ खेळला आहे, त्यापेक्षा 100 पट त्यानं नेटमध्ये घाम गाळला. त्यामुळे त्याचं 'क्रिकेटिंग ब्रेन' तयार झालं.

बॉडी रिफ्लेक्सेस विकसित झालेत. सेकंदाच्या काही भागाएवढ्या वेळात त्याचं पूर्ण शरीर हलतं. पाय, हात, डोकं हे अवयव अशा प्रकारे हलतात की ते एका विशिष्ट पोजीशनला येतात आणि तिथून तो बॉलचा अचूक वेध घेऊन तो बॉल सीमेरेषेबाहेर पाठवतो.

हेच फोटोग्राफीबाबत आहेत.

तुम्हाला सतत प्रॅक्टिस करून फोटोग्राफिक रिफ्लेक्स मजबूत करावे लागतात. मग क्षणार्धात तुमचा मेंदू लाईट, कंपोझिशन या सर्वांचे मेळ साधतो आणि छायाचित्र जन्म घेतं.

आशयपूर्ण छायाचित्रं कशी काढता येतील?

भारतात बहुसंख्य लोक हे ट्रॅव्हल फोटोग्राफी या प्रकारात काम करत आहेत. परंतु त्यात सर्वांत मोठा प्रॉब्लेम असा आहे की ते आपल्या फोटोग्राफीतून पाश्चिमात्य दृष्टिकोनातून भारताची मांडणी करतात जी फार फसवी आहे.

त्यात सोशल मोडियावर अशा छानछान फोटोंना खूप फॉलोईंग आहे.

भारत म्हणजे फक्त पुष्कर मेळा किंवा वाराणसी नाही. भारत त्याहून खूप वेगळा आहे जे मांडणं खूप चॅलेंजिंग आहे.

परंतु, आजकाल मला असं वाटू लागलं आहे की अशा प्रकारची ट्रॅव्हल फोटोग्राफी जेवढी वाढेल तेवढं स्ट्रीट किंवा पर्सनल स्टोरीजचा ऑडियन्सही वाढेल.

नुकतीच फोटोग्राफी सुरू केलेल्या किंवा पाहायला सुरू केलेल्या माणसाला स्ट्रीट फोटोग्राफी, डॉक्युमेंट्री या प्रकारांचं सौंदर्यशास्त्र कळेलच असं नाही. परंतु कालांतराने नजर जशी तयार होत जाईल तसतसं लोकं छानछान छायाचित्रांकडून, अर्थपूर्ण छायाचित्रांकडे वळतील.

दैनंदिन जीवनाचं डॉक्युमेंटेशन कसं करावं?

तुमच्या आजूबाजूची लोकं, तुमचं कुटुंब हे वेगळ्या नजरेतून डॉक्युमेंट करणं, सर्वसामान्य दिसणाऱ्या गोष्टीतल्या सौंदर्याचा शोध घेणं फार आव्हानात्मक असतं.

तुम्ही केलेलं काम हे काही वर्षांनंतर समाजासाठी ठेवा असलं पाहिजे असी दृष्टी ठेवून काम करायला पाहिजे असं मला वाटतं. भारतात खूप सारे सामाजिक प्रश्न आहेत. त्या दृष्टिकोनातून जर फोटोग्राफीला सुरुवात केली तर चांगले परिणाम दिसू शकतील.

मुख्यतः शेती आणि शेतीसंस्कृतीच्या अनुषंगाने अवतीभोवती फिरणारं ग्रामीण जीवनाचं डॉक्युमेंटेशन करणं हे सहज शक्य आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाइल आहे. फोटोग्राफीचं थोडंफार बेसिक गोष्टींचं जर शिक्षण ग्रामीण भागात मिळालं तर बहुमोल असं डॉक्युमेंटेशन करणं शक्य आहे.

मोबाइल हे माध्यम सोयीचं असलं तरी याला मर्यादा आहेत. जर एखादा मोठा प्रकल्प हाती असेल तर मी कॅमेराच वापरतो.

मुळात मोबाईलमध्येही लाईट आणि एक्सपोजरवर कंट्रोल ठेवता येतो हे बऱ्याच लोकांना माहित नसतं. शटर स्पीडवरती कंट्रोल नसतो हे खरं आहे. परंतु मला वाटतं की मोबाईल 24 तास तुमच्या सोबत असतो आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे.

कॅमेरा तुम्हाला सतत बरोबर ठेवणं खूप अडचणीचं होतं पण मोबाईल सतत तुमच्या सोबत असतो. परंतु मला वाटतं जर तुमच्या फोटोग्राफीत आशय मजबूत असेल तर अशा तांत्रिक गोष्टींना प्रेक्षक महत्त्व देत नाही.

नेहमीच्या जगण्यातले क्षण पकडण्यासाठी मोबाईल उत्तम आहे. त्यामुळे फोटोग्राफरची नजर तयार होत राहते.

आत्ममग्नतेमुळे कलेचं नुकसान?

सोशल मीडियावर सेल्फींचा पाऊस पडतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशल मिडिया आणि त्यावर सेल्फी टाकणारे मित्रमंडळी हे त्या सेल्फीतून व्यक्त होत असतात.

मी अमूक ठिकाणी, अमूक लोकांसोबत होतो हे दाखवणं हा त्या मागचा हेतू असतो. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अभ्यास, त्यानं टाकलेल्या सेल्फीमधून होऊ शकतो. परंतु कला म्हणून मला या सेल्फीजचं तितक्या महत्त्वपूर्ण वाटत नाहीत.

आता आपण रस्त्यांकडे पाहतो तर पूर्वीइतकी हालचाल या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. लोक एकमेकांना बोलण्याऐवजी मोबाइलमध्येच गुंतलेले आपल्याला दिसतात.

प्रसिद्ध स्ट्रीट फोटोग्राफर जोएल मेयेरोविझनं नुकतंच एके ठिकाणी म्हटलं- "Phone killed the sexiness of the street."

पूर्वी जसं लोक रस्त्यांवर अड्डे जमवून गप्पा मारत असत किंवा बाकावर बसून निवांतपणे वेळ घालवत असत आता तसं दिसत नाही.

लोक कानाला हेडफोन लावून बसलेले किंवा फेसबुकवर आपलं न्यूजफीड बघण्यात बिजी असतात. त्यामुळे रस्त्यावरच्या जगण्याची रंगत गेली असं त्यांचं म्हणणं आहे.

सर्वांचं वागणं साचेबद्ध झालं आहे आणि निश्चितच यामुळे स्ट्रीट फोटोग्राफीची मजा कमी झाली आहे. म्हणजे एका ठिकाणी मोबाइलमध्ये कॅमेरे आल्यामुळं या कलेचं लोकशाहीकरण झालं आहे तर मोबाइलमुळे आत्ममग्नता वाढल्यामुळे त्याच कलेवर परिणाम देखील होत आहे हे वास्तव आहे.

प्रत्येक तंत्रज्ञानाचे काही ठाराविक फायदे-तोटे असतात. मोबाइलमुळे प्रस्थापित छायाचित्रकारांना मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पण त्याचबरोबर एका मोठ्या समाज घटकाला ही कला जोपासणं सोपं झालं आहे.

सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून आपण आपलं काम प्रसिद्ध करू शकतो. मी एका वर्कशॉपला कोलकात्याला गेलो होतो. तिथं एक ब्राझीलची व्यक्ती मला भेटली आणि त्या व्यक्तीनं म्हटलं, 'मी तुमचा चाहता आहे.' मला आश्चर्य वाटलं, पण त्यानं सांगितलं 'मी तुम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.' योग्य हॅशटॅग वापरले तर आपण योग्य व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत पोहोचू शकतो. ही सोशल मीडियाची ताकद आहे.

इंडियन फोटोग्राफी फेस्टिव्हल या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी महोत्सवात यावर्षी माझं जे काम प्रसिद्ध होत आहे ते मी रेडमी 4 या सहा हजार किंमतीच्या मोबाइलनं केलेलं आहे.

आज प्रत्येक घरात मोबाईल आहे आणि प्रत्येक घराघरात काहीतरी कथा आहेत, ज्या फोटोग्राफीच्या माध्यमातून मांडता येऊ शकतात. आपण याकडे संधी म्हणून पाहिलं पाहिजे.

(इंद्रजीत खांबे हे व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. त्यांची छायाचित्रं राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. या लेखातील त्यांची मतं ही वैयक्तिक आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)