You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मंटो : आजच्या तरुण पिढीला या लेखकाविषयी आकर्षण का?
- Author, सुप्रिया सोगळे
- Role, बीबीसी हिंदी डॉट कॉमसाठी, मुंबईहून
फाळणीच्या आसपासच्या काळात आपल्या लेखणीद्वारे लोकांच्या मनात घर करणारे सआदत हसन मंटो आजच्या तरुणांनाही आपलेसे कसे वाटतात?
जवळपास एक तप मुंबईत राहिल्यानंतर 1948च्या जानेवारी महिन्यात मंटो लाहोरला रवाना झाले. आपल्या लिखाणातून त्यांनी 1930-40 या कालखंडातील मुंबई जिवंत केली. "मी एक चालती-फिरती मुंबईच आहे," ते म्हणायचे.
अशा या मंटोची मुंबई नुकतीच एका विशेष 'मंटोवॉक' नावाच्या पदयात्रेतून रफीक बगदादी यांनी आजच्या तुरुण पिढीपुढे उलगडली. ज्येष्ठ पत्रकार, चित्रपटांचे अभ्यासक आणि स्वतःला मुंबईप्रेमी म्हणवणारे बगदादी सांगतात, "मंटो यांचं जीवन गुरू दत्त यांच्या 'प्यासा' सिनेमासारखं आहे. ते हयात असताना त्यांचं महत्त्व कुणी समजू शकलं नाही आणि जेव्हा त्यांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा सगळे त्यांच्या कामाची प्रशंसा करत होते."
रफीक बगदादी यांनी आयोजित केलेली सफर मुंबईतल्या ग्रांट रोड स्टेशन बाहेरच्या मरवान अँड कंपनी हॉटेलपासून सुरू होते. कॅनवे हाऊस, जिन्ना हॉल, ज्योती स्टुडिओ, अल्फ्रेड टॉकीज, कामाठीपुरा अशी मुंबईची विविध रूपं पाहून ही सफर अरब गल्लीत संपते. हे सगळे रस्ते, या वास्तू यांचं मंटोच्या जीवनात मोलाचं स्थान आहे. दोन अडीच तासांच्या या सफरीत साधारण 30 जण सहभागी झाले होते. यामध्ये तरुणच जास्त होते.
मंटो यांच्या गोष्टी
नव्या पिढीला मंटो यांच्याविषयी कुतूहल आहे. त्यासंदर्भात बगदादी सांगतात, "जुनी पिढी मंटो यांचं साहित्य वाचायची नाही. प्रतिबंध असल्यासारखं त्यांनी मंटोंचं साहित्य वाळीत टाकलं होतं. त्यावेळी समाजाचे कायदेकानून वेगळे होते. आता शिक्षणव्यवस्था बदलली आहे. मंटो यांचा लिखाणामागचा विचार आजची पिढी अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते."
'मंटोवॉक'मागची भूमिका बगदादी उलगडून सांगतात. "लोकांना शहराची नस कळावी, त्याचा इतिहास जाणून घ्यावा, असं आम्हाला वाटतं."
मुंबई शहराचे विविध कंगोरे बगदादी समजावून सांगतात. "स्वातंत्र्यपूर्व काळात केनेडी ब्रिजचा परिसर सेक्स वर्कर्ससाठी प्रसिद्ध होता. त्याठिकाणी चीन, जपान, रशिया, युक्रेन अशा विविध देशांतून सेक्स वर्कर मुंबईत यायच्या. त्यावेळी केनेडी ब्रिजवर रात्रीच्या वेळी उभं राहून ग्राहकांची प्रतीक्षा करायच्या."
मंटो यांचा पहिला चित्रपट
1934-1935 मध्ये मंटो मुंबईत आले. सुरुवातीला ते अल्फ्रेड टॉकीजसमोरच्या अरब गल्लीतल्या छोट्याशा घरात आठ महिने राहिले. तिथे खूप ढेकूण होते. याबाबत त्यांच्या आईला कळलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
ढेकुणांचा सामना केल्यानंतर मंटो भायखळ्याला स्थलांतरित झाले. केनेडी ब्रिजच्या जवळच ज्योती स्टुडिओ होता. तिथेच मंटोंचं कार्यालय होतं. तिथेच त्यांनी 'किसान कन्या' चित्रपटाचं लेखन केलं.
ज्योती स्टुडिओमध्येच 'आलमआरा' चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. स्टुडिओपासून रेल्वेमार्ग जवळ असल्याने चित्रीकरणात वेळोवेळी व्यत्यय यायचा. म्हणून या स्टुडिओत रात्री 2 ते 4 या वेळेत चित्रीकरण व्हायचं.
1931 मध्ये मॅजेस्टिक सिनेमासारख्या मुंबईतल्या मोठ्य़ा चित्रपटगृहात 'किसान कन्या' प्रदर्शित झाला. तिथे तो आठ आठवडे चालला. चित्रपटाने 42,000 रुपयांची कमाई केली. त्यावेळी प्रेक्षक नाण्यांच्या रूपात पैसे द्यायचे. असे हे 42,000 रुपये एका थैलीत भरण्यात आले.
मंटो यांच्या गोष्टींमध्ये जिन्ना हॉल, काँग्रेस हॉल, बॉम्बे संगीत कलाकार मंडळ (जिथे वारांगनांचा नाचगाण्याचा कार्यक्रम चालायचा) यांचा उल्लेख आहे. आता या आठवणी धुसर झाल्या आहेत. जिन्ना हॉलमध्ये आता छोटेखानी कार्यक्रम होतात.
युवा पिढीला मंटो यांच्याविषयी आकर्षण का?
काँग्रेस हॉलमध्ये आता एक हॉटेल उघडलं आहे. बगदादी यांच्या मते त्याकाळची मुंबई खूपच वेगळी होती. समाजातली मान्यवर मंडळी तवायफ नृत्यांगनांचं नृत्य पाहण्यासाठी येत असत. या परिसरात खूप चित्रपटगृहं होती.
कामाठीपुरा परिसरातही एक चित्रपटगृह होतं, जिथे परिसरातल्या सेक्स वर्कर्स गुरुवारी जाऊन चित्रपट पाहायच्या. या चित्रपटगृहात चित्रपट पाहणं महाग असायचं.
'मंटोवॉक'च्या निमित्ताने एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने परिसंवादाचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक जाणकार वक्ते उपस्थित होते. त्यांनी मंटोविषयी आपले विचार मांडले. यामध्ये 'मंटो' या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिता दास, पारोमिता चक्रवर्ती, राजेंद्र गुप्ता, जमील गुलरेज यांचा समावेश होता.
कथाकथनासाठी प्रसिद्ध जमील गुलरेज यांनी मंटो यांच्या 'सोने की अंगूठी' आणि 'लायसन्स' या दोन कथा सादर केल्या. यावेळी जमील गुलरेज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"मंटो केवळ तवायफ महिलांबद्दल लिहितात असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात त्यांनी सर्वसमावेशक लिखाण केलं आहे. मंटो यांच्या लिखाणात सेक्सबद्दल मोकळेपणाने लिहिलेलं असतं. त्यांच्या लिखाणातली ही गोष्ट युवा पिढीला भावते. परंतु मंटो खरे कसे होते, हे कुणालाच ठाऊक नाहीत."
नंदिता दास यांचा चित्रपट मंटो
'मंटो' यांच्यावर आता एक नवीन चित्रपट नंदिता दास घेऊन येत आहेत. त्यात नवाझुद्दीन सिद्दिकी मंटोची भूमिका साकारतोय.
2012 मध्ये नंदिता यांनी मंटो यांचं लिखाण वाचायला सुरुवात केली. हळूहळू मंटो यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीची त्यांची उत्सुकता वाढू लागली. मंटो यांचं लिखाण आणि त्यांच्या कहाण्या आजही तितक्याच परिणामकारकतेने लागू होतात, असं त्या सांगतात.
"आपण सगळे मंटोमय आहोत. ज्या गोष्टींवर बोलणं, लिहिणं समाज मान्य करत नाही त्या मुद्द्यांवर विचार करायला प्रवृत्त करणं, हा मंटो चित्रपटाचा उद्देश आहे. आता आजूबाजूला जे घडतंय त्यावर उतारा म्हणजे हा चित्रपट. काय चूक, काय बरोबर, महिलांप्रती समाजाचा दृष्टिकोन काय, सेन्सरशिप, या सगळ्यांबद्दल हा चित्रपट आहे.
मंटो यांच्या गोष्टी देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. 'टोबोटेक सिंह'मध्ये याचं यथार्थ वर्णन आहे.
'मंटोवॉक'मध्ये आम्हाला आर्किटेक्चरच्या विद्यार्थिनी असलेल्या भाग्यश्री भेटल्या. त्यांनी सांगितलं, "मला मुंबईविषयी तसंच चित्रपटांविषयी जाणून घ्यायला आवडतं. कला आणि सिनेमा या गोष्टी मंटो यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता. मी त्यांच्या गोष्टी वाचत नाही. परंतु या वॉकच्या निमित्ताने त्यांच्याविषयी अनेक गोष्टी कळल्या. आता मला मंटो यांचं साहित्य वाचायचं आहे."
विल्सन कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राच्या विद्यार्थिनी उर्वशी यांनी 'मंटो' चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. उर्वशी यांना जुने चित्रपट पाहायला आवडतात. या वॉकनंतर मंटो यांच्याप्रती जिज्ञासा वाढली आहे, असं त्यांनी सांगितलं.
मंटो यांनी जुन्या चित्रपटातील कलाकारांविषयी सुरेख लेख लिहिलं आहेत.
इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थिनी प्रृकती यांना मंटो यांचं साहित्य वाचायचं आहे. "मी हिंदी किंवा ऊर्दूत मंटो यांचं साहित्य वाचलेलं नाही. मात्र त्यांच्या 'मेरा नाम राधा है', 'मोजेल', 'टोबोटेक सिंह' या गोष्टींचं इंग्रजी भाषांतर वाचलं आहे. त्यांच्या गोष्टींना खोल वैचारिक बैठक जाणवते. त्यांच्या गोष्टी माणुसकी आणि देशाबद्दल विचार करायला भाग पाडतात," असं प्रकृती यांनी सांगितलं.
शिक्षण क्षेत्रात सल्लागार कंपनीत कार्यरत अभिषेक यांनी गेल्या वर्षभरापूर्वी मंटो यांचं साहित्य वाचायला सुरुवात केली आहे. मंटो यांच्या इंग्रजीत भाषांतरित झालेल्या कहाण्या त्यांना आवडतात. मंटो यांच्या साहित्याचा अन्वयार्थ समजून घेण्यास वेळ लागेल असं ते म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)