केरळच्या पुरातील ते 26 सेकंद : बाळाला घेऊन तो जवान धावला आणि...

    • Author, प्रमिला कृष्णन
    • Role, बीबीसी तामिळ

आकाशातून धोधो पाऊस कोसळत आहे. त्यात पेरियार नदीनं रौद्ररूप धारणं केलं आहे. नदीच्या एका कडेला एक वडील त्याच्या बाळाला हातात धरून केविलवाण्या नजरेने मदतीची वाट पाहात आहेत. अचानक एक जवान धावतो. या बाळाला आपल्या कवेत घेतो. क्षणाचाही वेळ न दवडता हा जवान बुडायला आलेल्या पुलावरून धावत सुटतो. त्याच्या मागोमाग वडील आणि इतर काही लोक पुलावरून धावतात. ते सर्व सुरक्षित पलीकडे येताच हा पूल पुराच्या पाण्याने कोलमडून पडतो.

ही घटना घडली आहे केरळमध्ये. फक्त 26 सेकंदाच्या या थराराचे नायक आहेत NDRFचे जवान कन्हैय्या कुमार.

केरळ राज्यात न 'भूतो' अशा पावसाने थैमान घातले असून पूरस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. या संकटाच्या स्थितीमध्ये अतुल्य असं धैर्य, समयसूचकता दाखवणारे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फोर्सचे (NDRF) जवान कन्हैय्या कुमार यांचं नाव राज्यात सर्वतोमुखी झालं आहे.

इडुक्की जिल्ह्यातील सेरुधानी या गावात पेरियार नदीने अक्राळ-विक्राळ रूप धारण केलं होतं. या नदीच्या काठी एक वडील त्यांच्या नवजात मुलाला कडेवर घेऊन मदतीची वाट पाहात होते. कुठल्याही क्षणी त्यांना आणि तिथे उभे असलेल्यांना जलसमाधी मिळेल अशी स्थिती निर्माण होती.

अशा बिकट स्थितीत कन्हैय्या कुमार त्यांच्या दिशेनं धावले आणि त्यांच्या हातून बाळाला आपल्या ताब्यात घेतले.

त्यानंतर क्षणाचाही वेळ न घालवता कन्हैय्या कुमार यांनी खालच्या बाजूला असलेल्या पुलावरून पलीकडच्या दिशेला धाव घेतली. त्यांच्या मागून मुलाचे वडील आणि इतर लोकही आले. त्यांनी हा पूल ओलांडला आणि त्यानंतर काही क्षणातच पाण्याच्या प्रचंड वेगाने तो पूल कोसळला.

हे सगळं घडलं ते फक्त 26 सेकंदात. NDRFच्या इडुक्की इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की कन्हैय्या कुमार याला या मुलाला वाचवण्यासाठी अवघ्या 26 सेकंदांचा वेळ लागला.

या घटनेनंतर या बाळाचे वडील अतिशय भावूक झाले होते.

'सगळेच माझे कुटुंबीय'

या धाडसामुळे कन्हैय्या कुमार केरळच्या सोशल मीडियावर स्टार झाले आहेत. कन्हैय्या कुमार बिहारचे आहेत. त्यांची घरची परिस्थिती बेताची असून घरी आईवडील आणि 3 भाऊ आहेत. गेली 6 वर्षं ते NDRFमध्ये कार्यरत आहेत.

बीबीसी तामिळने कन्हैय्या कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, "कुटुंबाला मदत व्हावी म्हणून मी सरकारी नोकरी स्वीकारली. माझे दोन भाऊ लष्करात आहेत. तर एक भाऊ काश्मीरमध्ये कामाला आहे. त्यामुळे आमची एकत्र भेट होण्याचा योग फार क्वचित येतो. पण आम्हाला आमचं काम आवडतं. आमच्या आईवडिलांनाही आता आमचा अभिमान वाटतो. जे पीडित आहेत, जे दुःखात आहेत, ते सर्वच माझे कुटुंबीय आहेत."

ते म्हणाले, "केरळमध्ये मदत कार्यासाठी जायचं आहे, हे आम्हाला माहिती होतं. पण इथं आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की फार मोठं काम करावं लागणार आहे. इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन होत आहेत. 26 वर्षांनंतर इथल्या सेरुधानी भागात पूर आला आहे. इथलं बसस्थानक कुठं आहे, ते सापडत नाही. नारळाच्या बागा पूर्णपणे बुडाल्या आहेत."

'निसर्गाचा अंदाज वर्तवणं कठीण'

NDRFचे जवान कृपालसिंग म्हणाले, "निसर्गाबद्दल आणि नैसर्गिक संकटांबद्दल आपण काहीच अंदाज व्यक्त करू शकत नाही. पण आम्ही कशाचाही सामना करण्यासाठी सज्ज असतो."

"लोक जिथं अडकले आहेत, तिथल्या खोलीचा अंदाज घेणं आणि तिथून लोकांना सुरक्षित स्थळी नेणं यासाठी लागणारा वेळ अगदी कमी ठेवावा लागतो. त्यानंतर तातडीने प्रथमोपचारही द्यावे लागतात. आमचं काम अनेकांना आशा देतं," असं ते म्हणाले.

आणखी काही दिवस पाऊस सुरू असण्याची शक्यता असल्याने NDRFच्या पथक इथं सज्ज आहे.

67 ठार, 12 जिल्ह्यांत रेड अलर्ट

गेला एक आठवडा केरळमध्ये पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. आतापर्यंत 67 लोक या पुरात ठार झाले आहेत. जवळपास 35 जलाशयांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून 12 जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)