मुंबई पाऊस : भिंत खचली, कलथून वाहतूक गेली, शाळा-कॉलेजांनाही आज सुटी

मुंबई आणि उपनगरांत गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबईतल्या सर्व शाळा आणि कॉलेजना सुटी जाहीर केली आहे.

मुंबईच्या विविध भागांमध्ये पाणी साचलं आहे. सायन, किंग्स सर्क, भेंडीबाजार, दादर टीटी, भारतमाता, माहीम चर्च, एल्फिन्स्टन, प्रतीक्षा नगर, सुमन नगर, वांद्रे, खार, गोरेगाव, जोगेश्वरी, दहिसर अशा अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.

हिंदमाता, परळ या ठिकाणच्या वस्त्यांमध्ये पाणी तुंबलं.

पाणी साचल्यामुळे रस्ता वाहतुकीवरही परिणाम झाला.

पण पावसाची संततधार सुरू असताना काही अनोखे प्रसंगही पाहायला मिळाले.

मुंबई महापालिकेचे एफ वॉर्डचे कर्मचारी काशिराम पांडुरंग तळेकर सकाळी 9:30 वाजेपासून हिंदमाता परिसरातल्या एका मॅनहोलपाशी उभे होते. तुंबलेल्या पाण्यात मॅनहोल लक्षात न येवून अपघात होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती.

सततच्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. त्यातच शाळांना सुटी मिळाल्यामुळे लहान मुलांनी पाण्यात मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला.

सकाळी दक्षिण मुंबईत सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनातली एक भिंत कोसळली. त्यामुले स्लो लाईन काही वेळ बंद होती. कोसळलेल्या भिंतीचे अवशेष उचलल्यानंतर काही वेळापूर्वीच रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

मुंबईतल्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीनही मार्गांवर लोकल उशिराने धावत आहेत. आम्ही मोठे पंप लावून रुळांवरचं पाणी सतत काढत आहोत, असं पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे. LBS, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि अनेक महामार्गांवर मोठे ट्रॅफिक जॅम झाले आहेत.

पावसाची चर्चा नागपूरमध्ये सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही चर्चा झाली. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे शुक्रवारी विधिमंडळातली वीज गेली होती. अधिवेशनाचा एक दिवस वाया गेल्याचा मुद्दा विरोधकांनी सदनात उचलला. छगन भुजबळ यांनी 'जलयुक्त विधिमंडळा'बद्दल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं.

मुंबईच्या आसपासही पाऊस सुरू आहे. विरार-वसई परिसरात अजूनही पाऊस सुरू आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 24 तासांनंतर पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मुंबईसोबतच कोकणात सर्वत्र पाऊस सुरू आहे. विदर्भात यवतमाळमध्येही मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरांत पाणी शिरलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)