अंधेरी पूल कोसळला : मुंबईकरांच्या हाल अपेष्टांना जबाबदार कोण?

धो धो कोसळणारा पाऊस, फूटपाथ कोसळल्याने खोळंबलेली रेल्वे वाहतूक आणि वेस्टर्न वेवरील ट्रॅफिक कोंडी यामुळे मुंबईकरांची मंगळवारची सुरुवातच मनस्तापाने झाली. गेल्या वर्षी एल्फिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरी होऊन 22 जणांचा बळी गेला होता. आजच्या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी मुंबईतील पायभूत सुविधांचा प्रश्न मात्र कायम आहे, हे मात्र पुन्हा अधोरेखित झाले.

पावसामुळे रस्ते तुंबणं, रहदारी मंदावणं, लोकल सेवा विस्कळीत होणं आणि हे असे अपघात मुंबईकरांसाठी फारसे नवे राहिलेले नाहीत. रोज अशा संकटांना तोंड देत ते कामावर जाण्याची आणि कामावरून घरी येण्याची लढाई लढत असतात.

पण अशा घटनांना, अपघातानांना जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न.

रेल्वे यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले, "पादचारी पूल घटना दुर्दैवी आहे. एक तर पाऊस, फूटपाथ कोसळल्याने खोळंबलेली वाहतूक आणि वेस्टर्न एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी याचा फार मोठा त्रास नागरिकांना सोसावा लागला. एल्फिन्स्टन इथल्या घटनेनंतर सगळ्याच फूट ओव्हर ब्रीज, रोड ओव्हर ब्रीज यांचं ऑडिट करण्यात आलं होतं. या ऑडिटमधून हा फूटपाथ आला नव्हता का?"

"आजच्या प्रकाराला महापालिका आणि रेल्वे दोन्ही जबाबदार आहेत, असं ते म्हणाले. रेल्वेवरून जे पूल जातात त्यांची जबाबदारी रेल्वेची असते. पण जर नागरिक हे पूल वापरत असतील तर त्याची जबाबदारी महापालिकेवरही येते. अशा फूटपाथची, फूट ओव्हर ब्रीजची किंवा रोड ओव्हर ब्रीजचं महापालिकेनही ऑडिट करायला नको का", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

फूटपाथ कोसळल्यामुळे डबेवाल्यांची सेवाही खंडित झाली आहे. अंधेरी ते विरारच्या दरम्यान काही डबेवाले अडकून पडले होते. त्यामुळे डबेवाल्यांची सेवा बंद राहाणार असल्याचे डबेवाल्यांचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितलं.

मुंबईतील पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी ही जबाबदारी महापालिका आणि रेल्वेचे एकत्रित आहे, अशी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर जे ऑडिट करण्यात आलं त्यात गर्दी आणि पुलांची क्षमात याचा विचार करण्यात आला. यात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं नव्हतं. स्ट्रक्टचरल ऑडिटची स्वतंत्र व्यवस्था आहे. या पुलांची जबाबदारी महापालिका आणि रेल्वे यांची एकत्रित आहे."

सततच्या पावासाने मदत कार्यात अडथळे येत होते. गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या फूटपाथची स्थितीही फारशी चांगली नसून त्याच्याही स्लॅबला तडे गेल्याचं दिसून आलं आहे.

मुंबईतील कार्यकर्ते समीर झवेरी यांनी मुंबई महापालिकेने पुलांसाठी गेल्या दहा वर्षांत रेल्वे प्रशासनाला किती निधी दिला ही माहिती माहितीच्या अधिकारात विचारली होती. यातून 117 कोटी इतका निधी दिला असल्याची माहिती महापालिकने दिली आहे. झवेरी म्हणाले, "या निधीचा रेल्वेने कसा विनियोग केला हे याचं ऑडिट महापालिकेने करायला हवं होतं. 2010ला अशीच घटना घडली होती. गेल्या वर्षी एल्फिन्स्टनची घटना घडली. आताही महापालिका आणि रेल्वे प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलताना दिसत आहेत. ही जबाबदारी दोघांची आहे, ती त्यांना घ्यावी लागेल."

(संकलन - मोहसीन मुल्ला)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)