You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धुळे ग्राउंड रिपोर्ट : 'आम्ही हातावर पोट भरणारी माणसं काय चूक होती आमची?'
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी धुळ्याहून
55 वर्षांचे भारत भोसले रविवारी सकाळी धुळ्यातल्या राईनपाडा गावात उतरले तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की पुढच्या 3 तासांत त्यांची निर्घृणपणे हत्या होणार होती. अंगात मळकट पिवळ्या रंगाचा सदरा, गळ्यात माळ आणि खांद्यावर भगवी शाल असा त्यांचा वेश होता.
नाथपंथी डवरी गोसावी समाजातले आणखी चार जण त्यांच्यासोबत होते. या गावात रविवारी बाजार भरतो, म्हणजे इथे चांगली भिक्षा मिळेल, असं त्यांना वाटलं होतं.
सकाळी साडे नऊच्या सुमारास त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. अजून बाजार नीटसा भरला नव्हता. माणसं तुरळक होती. त्यांचा वेश पाहून आधी त्यांना काही जणांनी हाकललं. मग एकाने भारत यांना 5 रुपये दिले.
त्यानंतर ते एका 10-12 वर्षांच्या मुलीकडे भिक्षा मागण्यासाठी गेले, असं एक प्रत्यक्षदर्शी सांगतात. एका लहान मुलीच्या मागे एक अनोळखी माणूस लागला आहे, असं वाटून तिथे काही तरुण जमले. त्यांनी भारत आणि त्यांच्या साथीदारांना प्रश्न विचारले.
भारत सोलापूर जिल्ह्यातल्या खेवा गावातले. त्यांची मराठी राईनपाड्यातल्या लोकांना धड कळत नव्हती. धुळे जिल्ह्यातल्या या भागात अहिराणी मिश्रित मराठी बोलतात. ती मराठी भारत यांना कळत नव्हती.
समाधानकारक उत्तर मिळेना तेव्हा तरुण चिडले. व्हॉट्सअॅपवर मुलांना पळवणाऱ्या ज्या टोळीविषयी मेसेज होता, ती हीच टोळी असं त्यांना वाटलं असावं. त्यांनी या पाच जणांना मारायला सुरुवात केली.
तिथे सरपंच आणि पोलीस पाटील पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करून तरुणांना थोडं शांत केलं. तोवर भारत आणि इतर चौघं अर्धमेले झाले होते. त्यांना घेऊन पोलीस पाटील ग्रामपंचायत कार्यालयात गेले.
गांधींच्या प्रतिमेसमोर हिंसा
पण गर्दीचं समाधान होईना. त्यांनी कार्यालयाचं दार आणि खिडकी तोडली. आत शिरून त्यांनी हाताला येईल त्या गोष्टीने चोप द्यायला सुरुवात केली. तिथे इतर नेत्यांसोबत महात्मा गांधींचा फोटो होता. अहिंसेचा मंत्र देणाऱ्या या महात्म्याच्या प्रतिमेसमोरच गावकऱ्यांनी हिंसेची परिसीमा गाठली होती.
सिमेटंचे ब्लॉक, सळया, खुर्च्या, टेबल आणि लाकडी दांड्यांनी या पाच जणांवर हल्ला चढवण्यात आला होता. रक्ताच्या थारोळ्यात भारत आणि त्यांचे सहकारी अखेरचा श्वास घेत होते.
राईनपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य विश्वास गांगुर्डे यांनी ही घटना पोलिसांना कळवली होती. ते सांगतात, "लोक त्यांना खूप मारत होते. लोखंडी सळया, रॉडने मारहाण करत होते. लोकांना शंका होती की हे लोक मुलांची किडनी काढून विकणारी टोळी आहे. ते मुलांचं अपहरण करतात. आम्ही त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं आणि पोलिसांना कळवलं. पण जमाव ऐकत नव्हता."
अर्ध्या तासात तिथे पोलीस पोहोचले. गावकरी एवढे हिंसक झाले होते की त्यांनी तिघा पोलिसांना मारहाण केली. मग आजूबाजू्च्या स्टेशनांतून कुमक तिथे पोहोचली. त्यांनी जमावार सौम्य लाठीमार केला तेव्हा कुठे ते पांगले. तोवर तासाभरापेक्षा जास्त वेळ भारत आणि त्यांच्या साथीदारांना बेदम मारण्यात आलं.
पोलिसांनी त्यांना पिंपळनेर दवाखान्यात आणलं. तिथे त्या पाचही जणांना मृत घोषित करण्यात आलं.
हे सर्व लोक नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे आहेत. त्यांच्यातील सगळ्यांत वयस्कर जगन्नाथ भोसले सांगतात की, "भिक्षा मागून खाणं हा आमचा धर्म आहे. प्रत्येक हंगामात महिना दोन महिना बाहेर जाऊन राहतो आणि खातो. आम्ही एसटीच्या कंडक्टरकडे 10-15 रुपये देतो आणि त्याला सांगतो की एखाद्या गावात सोड. त्याप्रमाणे उतरायचं, भिक्षा मागायची आणि परत यायचं. मात्र हे पाच जण कुठे गेले हे आम्हाला माहित नव्हतं. थेट चार वाजता बातमीच समजली आणि आम्ही दवाखान्याकडे धाव घेतली."
हे सगळं सुरू असताना भारत यांच्या पत्नी नर्मदा यांना काय घडतंय याचा थांगपत्ताही नव्हता. बीबीसीशी बोलताना त्यांना रडू कोसळलं. स्वतःला सावरत त्या म्हणाल्या, "आम्ही भिक्षा मागून पोट भरतो. आता पाऊस आला की गावाकडे जायचं आणि शेतीला लागायचं. पण पाऊस उशिरा आला म्हणून आम्ही मुक्काम वाढवला. शनिवारी संध्याकाळी इथे आलो तेव्हा जेवायची वेळ झालेली म्हणून इथेच पाल टाकला. दुसऱ्या दिवशी हे सगळे बसमध्ये बसले आणि गेले. मी फोन केला तर उचललाच नाही. नंतर कुणीतरी त्यांचा मोबाईल घेतला आणि म्हणाला नर्मदाबाई यांचा नवरा व दीराचा मृत्यू झालाय."
हुंदका देत त्या म्हणाल्या, "आमच्या दुनियेचा भारत गेला, काय करायचं साहेब सांगा तुम्ही... आम्ही हातावर पोट भरणारी माणसं काय चूक होती आमची?"
गावात स्मशान शांतता
सोमवारी राईनपाड्यात कडक पोलीस बंदोबस्त होता. गावात स्मशान शांतता पसरलेली होती. प्रत्येक घराचं दार बंद होतं. बहुतांश गावकरी गावात नव्हते. गावातली शांतता घटनेची दहशत विषद करत होती.
गावातल्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी मिळून एकूण 38 विद्यार्थी पटावर आहेत. या घटनेमुळे आज मात्र कुणीच आले नाही अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली. तर सरकारी निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे पालक घेऊन गेले.
1100 लोकवस्ती असलेल्या या गावात फेरफटका मारल्यावर फक्त 2-3 महिला भेटल्या. पण त्यांना घटनेविषयी फार माहिती नव्हती. "खूप गर्दी होती. आवाज येत होते, पण आम्ही नाही गेलो तिकडे," असं पारूबाईंनी सांगितलं.
गावचे सरपंच भोये यांचे घर बंद होतं. आजूबाजूच्या महिलांनी सांगितलं की ते पोलीस स्टेशनला गेले आहेत.
आम्ही पोहोचलो तोवर हे ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छ धुतलं होतं, पण रक्ताचा वास येत होता. रक्ताचे डाग होते, उडालेल्या रक्ताने भिंती माखल्या होत्या. खिडक्या तुटलेल्या होत्या. जमावाच्या मारहाणीत त्या पाच जणांच्या रक्ताचे शिंतोडे गांधींजींच्या फोटोवरही उडालेले होते.
'...पाच मालकांविना पाल उठले'
तिथून काही मैलांवर असलेल्या नाथपंथी डवरी गोसावींच्या पालावर शोककळा पसरली होती. सोमवारी दुपारी तिथे सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील खेव या गावचे सरपंच आणि भारत भोसलेंचे नातेवाईक मारुती भोसले पोहोचले.
मदत मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायला त्यांनी नकार दिला. मग जिल्हाधिकारी पीडित कुटुंबीयांशी बोलायला आले. ही चर्चा चालू असताना मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील वणी इथे मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर केली. त्यानंतर धुळ्यातील पिंपळनेर-साक्री रोडवर शनिवारी संध्याकाळी वसलेले 'पाल' सोमवारी आपल्या पाच मालकांविना उठले आणि आपल्या मूळ गावी रवाना झाले.
याबाबत बोलतना साक्रीचे आमदार बी. एस. अहिरे म्हणतात, "व्हॉट्सअॅपवरच्या मेसेजमुळे हा सर्व प्रकार आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून आरोपींना शासन झालंच पाहिजे. मी स्वतः आदिवासी आहे. लोक असं करतील हे वाटलंही नव्हतं. पण ते घडलं आहे."
धुळ्याचे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी सांगितलं की, "या प्रकरणात आतापर्यंत आम्ही 23 लोकांना अटक केली आहे. उपलब्ध व्हीडिओंच्या आधारे आरोपींची ओळख पटवून अटक करतो आहोत. सायबर सेल या व्हीडिओचा मूळ स्रोत आणि मुलं पकडणारी टोळी आल्याचा मेसेज पसरवणाऱ्यांचा शोध घेत आहोत."
गेल्या महिन्याभरात या प्रकारच्या घटना औरंगाबाद, गोंदिया, बीडमध्ये घडल्या आहेत. औरंगाबादच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. चार दिवसांपूर्वी नंदुरबारच्या म्हसवडमध्ये मजूर नेण्यासाठी आलेल्या पंढरपूरच्या माजी नगरसेवकासह तीन जणांना बेदम मारहाण करणयात आली. तर पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांच्या चारचाकीची तोडफोड करत आग लावण्यात आली होती.
धुळ्यातील रविवारच्या घटनेचं लोण रविवारी रात्री मालेगावात पोहचलं. मध्यरात्री मालेगावमध्ये दोन जोडप्यांसह एका लहान मुलाला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जोडप्याला वाचवलं, पण संतप्त जमावानं पोलिसांच्या तीन गाड्यांची तोडफोड करत आपला राग व्यक्त केला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)