अंधेरीत ब्रिज कोसळला, लोकल सेवा विस्कळीत, मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

आज सकाळी मुंबईतल्या अंधेरी इथल्या गोखले पुलाच्या फुटपाथचा काही भाग रेल्वे स्टेशनवर कोसळला. या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे मंगळवारी सकाळी हजारो प्रवाशांचे हाल झाले.

लोकल सेवा सुरळीत व्हायला उद्या सकाळपर्यंतची वाट पाहावी लागेल, असं पश्चिम रेल्वेने म्हटलं आहे. दुपारी 2च्या सुमारास अंधेरीहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी हार्बर लाईन सुरू झाली.

पश्चिम रेल्वेच्या लोकल अंधेरी पार करू शकत नसल्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

मंगळवारी सकाळी हा खोळंबा झाला असताना मुसळधार पाऊस सुरू होता. हवामान विभागाने येत्या 2 दिवसांत मुंबईत जोरदार पाऊस पडू शकतो, असा इशाहा दिला आहे. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका, असं मुंबईच्या महापौरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या ब्रिजच्या देखरेखीची जबाबदारी रेल्वेची होती, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटल्यामुळे आता बॉल रेल्वेच्या कोर्टात आहे.

पाहूयात सकाळपासून काय काय झालं -

दुपारी 1.12 वाजता

पश्चिम रेल्वेची संपूर्ण वाहतूक पूर्ववत होण्यासाठी उदयाचा दिवस उजाडेल असं मदतकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांना सांगितलं आहे.

दुपारी 12.40 वाजता

वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे प्रवासी अडकून पडले आहेत.

दुपारी 12.27 वाजता

मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा खंडित झाली आहे. अंधेरी ते विरारच्या दरम्यान काही डबेवाले अडकून पडले आहेत. त्यामुळे डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार असल्याचं डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितलं आहे.

दुपारी 12.18 वाजता

संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फास्ट ट्रॅकवरची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता पश्चिम रेल्वेनं व्यक्त केली आहे. तसंच मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

दुपारी 12.09 वाजता

अंधेरी आणि परिसरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मदतकार्यात पुन्हा अडथळे येत आहेत.

दुपारी 12 वाजता

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. लोकांना बुलेट ट्रेन नाही तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.

सकाळी 11.49 वाजता

मुंबईतली वाहतूक कोंडी लक्षात घेता विमानतळावर जाण्यासाठी लवकर निघा अशी सूचना पोलिसांनी लोकांना केली आहे.

सकाळी 11.26 वाजता

कोसळलेल्या पुलाची ही एक्सक्लुसिव्ह दृश्यं टिपली आहेत मुंबईत बीबीसी मराठीसाठी काम करणाऱ्या प्रशांत ननावरे यांनी.

सकाळी 11.14 वाजता

गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या फूटपाथची स्थिती सुद्धा जीर्ण झाल्याचं दिसून येतं आहे. ज्या ठिकाणी हा भाग कोसळला आहे. त्या ठिकाणाहून हा फोटो काढला आहे बीबीसीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी.

सकाळी 10.54 वाजता

मोटरमन चंद्रशेखर सावंत यांच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. सकाळी 7.34 वाजताची अंधेरी लोकल त्यांनी प्लॅटफॉर्मवरून सोडली, पण त्याचवेळी पुलाचा काही भाग ट्रॅकवर कोसळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीनं इमर्जन्सी ब्रेक दाबला आणि गाडी पडणाऱ्या पुलाच्या अगदी 50 ते 100 मीटर अंतरावर जाऊन थांबली.

सकाळी 10.45 वाजता

पावसामुळे मध्य रेल्वेनं गाड्यांची संख्या कमी केली.

सकाळी 11.37 वाजता

मुंबईच्या वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहतुकीची कोंडी.

सकाळी 10.35 वाजता

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टनं बोरीवली ते वांद्र्यादरम्यान अतिरिक्त बस सोडल्या.

सकाळी 10.30 वाजता

NDRF ची टीम युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे.

सकाळी 10.20 वाजता

बेस्टच्या अतिरिक्त बसेस सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत. तसंच त्यांनी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

सकाळी 10.10 वाजता

रद्द झालेल्या गाड्या

1) वांद्रे - वापी एक्स्प्रेस

2) वापी - विरार शटल

सकाळी 10 वाजता

संततधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. त्याचवेळी पश्चिम रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळी 9.28 वाजता

मुसळधार पावसामुळे अंधेरी स्टेशनबाहेरचा परिसर जलमय. पावसामुळे मदतकार्यात अडथळे

सकाळी 9 वाजता

मुंबईच्या वेस्टन एक्स्प्रेस हायवेवर सध्या मोठी वाहतूक कोंडी आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक संथगतीनं पुढे सरकत आहे. तसंच वांद्रे ते गोरेगाव दरम्यानची वाहतूक ठप्प असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

चर्चगेट ते वांद्रे आणि गोरेगाव ते विरार वाहतूक मात्र पूर्ववत करण्यात आली आहे.

आतापर्यंत

अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले बाजूनं पुलाचा फूटपाथ कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. फलाट क्रमांक 8 आणि 9 मधील हा ब्रिज आहे.

हा भाग ट्रॅकवर कोसळल्यानं मोठ्या प्रमाणावर ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा हलवण्यात अडचणी येत आहेत.

हा पूल बी. एम. सी.च्या अखत्यारीत आहे. या ठिकाणी National Disaster Response Force चं पथक तैनात करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)