मुंबई : एल्फिन्स्टन स्टेशनवरील चेगराचेंगरीचा चौकशी अहवाल सादर

एल्फिन्स्टन रोड स्टेशनची घटनेबद्दल चौकशीचा अहवाल काय म्हणतो; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का?; राहूल गांधी यांची संघावर टीका तर भारतीय जनता पक्षाचा अमेठीत मेळावा, या मोठ्या बातम्यांचा आढावा आजच्या या वृत्तात.

का घडली चेंगराचेंगरी?

मुंबईच्या एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनवर झालेली चेंगराचेंगरी ही पाऊस आणि पूल पडल्याच्या अफवेमुळे घडल्याचं रेल्वे प्रशासनाच्या चौकशी अहवालातून समोर आलं आहे.

29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू आणि ३८ प्रवासी जखमी झाले होते.

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समधील वृत्तांनुसार, पादचारी पुलाच्या पायऱ्यांवर "फुलं पडली, फुलं पडली" असा आवाज झाला. पण फुलांऐवजी "पूल पडला", अशी अफवाच पसरली आणि एल्फिन्स्टन रोडच्या त्या पुलावरील अपघातास कारणीभूत ठरली.

पावसाचा जोर, पावसापासून वाचण्यासाठी पुलावर प्रवाशांनी केलेली गर्दी आणि त्यातच पुलाबाहेरून येणाऱ्या प्रवाशांचा लोंढा, या बाबीही चेंगराचेंगरीला कारण ठरल्याचं या चौकशी अहवालात म्हटलं आहे.

दिवाळीपूर्वी कर्जमाफी मिळणार का?

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणारच, याविषयी सरकार दावे करत असतानाच याबद्दल शंकाही व्यक्त केल्या जात आहेत.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उपसमिती बैठकीत केला आहे.

दिव्य मराठीच्या वृत्तात म्हटलं आहे, की या योजनेंतर्गत 56 लाख 59 हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

दिवाळीपूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास सुरुवात करावी, अशा सूचना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत संबंधितांना देण्यात आल्या.

दरम्यान, 'सामना'मध्ये आलेल्या वृत्तानुसार सध्या गावपातळीवर यंत्रणेला माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केल्या जात आहे.

यानंतर हिरवा, पिवळा, लाल या तीन प्रकारच्या यादी प्रसिद्ध करून त्यांची खातरजमा केल्यानंतरच शेतकरी कर्जमाफीची संख्या निश्चित होणार आहे. पहिल्या टप्प्यात हिरव्या यादीनुसार शेतकऱ्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे.

दरम्यान, या सर्व प्रक्रियेला आणखी महिनाभर लागण्याची शक्यता असल्याने, दिवाळीपूर्वी 'कर्जमाफीची साखर' शेतकऱ्यांच्या तोंडात पडण्याची शक्यता धूसर असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे, असं 'सामना'मध्ये म्हटलं आहे.

काँग्रेस-भाजपात शाब्दीक चकमक

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

लोकमतच्या वृत्तानुसार गुजरातच्या अकोटामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी विचारलं की "संघाच्या शाखांमध्ये हाफ पँटमध्ये कधी महिलांना कुणी बघितलं आहे का?"

संघाच्या राष्ट्रसेविका समितीने प्रत्युत्तरात म्हटलं आहे की, "राहुल गांधी हे काँग्रेसचे जबाबदार नेते आहेत. त्यांनी सखोल माहिती घेऊन बोलणं अपेक्षित आहे."

संघाच्या निर्णय प्रक्रियेत राष्ट्रसेविका समितीची महत्त्वाची भूमिका असल्याचं समितीच्या माहिती प्रमुख संचालिका शांताक्का यांनी मंगळवारी दिली.

'सकाळ'च्या वृत्तानुसार मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "चौकीदाराच्या समोर चोरी झाली. मग प्रश्‍न पडतो की तुम्ही चौकीदार आहात की भागीदार. सरकारनं 'बेटी बचाव, बेटी पढाव' या योजनेचं नाव बदलून 'अमित शहा के बेटे को बचाव' असं ठेवावं.''

दुसरीकडे 'द हिंदू'च्या वृत्तानुसार, अमेठीमध्ये भाजप मेळाव्यात बोलताना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सवाल केला की "नेहरू आणि गांधी घराण्यातील तीन पिढ्या या मतदारसंघाचं नेतृत्व करत असतानाही अमेठीचा विकास का झाला नाही?".

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)