You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महापौर महोदय, ही पाहा 'न' तुंबलेल्या मुंबईची दृश्यं
मुंबईसह कोकणात २५ जूनला सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं संपूर्ण मुंबई शहर जलमय झालं आहे. किंग्ज सर्कल, चेंबूर, मालाड यांसारख्या उपनगरांत पाणी साठून राहिल्यानं तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र मुंबई तुंबलेली नाही असं वक्तव्य केलं.
मुंबईसह पालघर आणि ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्येही पावसामुळे वाहतुकीसह अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत.
सोमवार सकाळपासूनच पाऊस पडत असल्यानं त्याचा पहिला फटका मुंबईच्या रेल्वे सेवेला बसला आहे.
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गांवरील लोकल सेवा तब्बल २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत होत्या.
आज पहाटे 4 वाजताच्या सुमारास वडाळ्यातल्या दोस्ती पार्कजवळ जमीन खचल्यामुळे 10-11 गाड्यांचं नुकसान झालं. त्यापैकी 6 गाड्या बाहेर काढण्यात आल्या तर 5 गाड्यांचं खूप नुकसान झालं असून त्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. बीबीसी मराठीसाठी प्रशांत ननावरे यांनी मुंबईहून पाठवलेला हा व्हीडिओ :
मुंबईत पडणाऱ्या या पावसानं समुद्रालाही उधाण आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास 4.13 मीटर उंचीच्या लाटा आल्या.
बीबीसी मराठीचे वाचक निलेश यादव यांनी वरील फोटो दक्षिण मुंबईतल्या कफ परेड भागातून काढला आहे. पावसाला सुरुवात होताच कोळ्यांच्या बोटी कफ परडेला एकाच ठिकाणी येऊन उभ्या राहिल्या.
मुंबईतल्या सखल भागात पाणी साठल्यानं वाहनांचं नुकसान होत असून शहरांत अनेक ठिकाणी वाहनं बंद पडण्याचे प्रकार घडले. अशाच एका बंद पडलेल्या टेंपोला पाण्यातून बाहेर काढणारे हे मुंबईकर.
दक्षिण मुंबईतल्या वडाळा भागात दोस्ती संरक्षित भाग कोसळल्यानं अनेक वाहनांचं नुकसान झालं. या इमारतीचा मलबा थेट वाहनांवर कोसळल्यानं अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत झालेल्या पावसाचा फटका हा परिवहन व्यवस्थेबरोबरच सामान्य नागरिकांनाही बसला आहे. ठिकठिकाणी पाणी साठल्यानं नागरिकांची पाण्यातून वाट काढताना त्रेधातिरपीट उडाली होती. अशाच एका मार्गातून वाट काढणारा हा दुचाकीस्वार.
अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचं मुंबई अग्निशमन दल अधिकारी व्ही. एन. सांगळे यांनी बीबीसीला सांगितलं. लॉईड्स इस्टेटच्या C आणि D विंगच्या परिसरात ही घटना घडलेली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)