सोशल : '2019च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काश्मीरमधील युतीचा बळी'

भाजपचे प्रवक्ते राम माधव यांनी मंगळवारी दुपारी एक पत्रकार परिषद घेऊन मेहबुबा मुफ्ती यांच्या Peoples Democratic Party (PDP) बरोबरची युती मोडत असल्याचं जाहीर केलं.

"गेल्या काही दिवसांत ज्या घटना झाल्या त्यावर सगळी माहिती घेतल्यावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा सल्ला घेतला. त्यातून आम्ही असा निर्णय घेतला की आता ही युती पुढे जाऊ शकणार नाही," असं माधव म्हणाले.

या राजकीय घडामोडीवर आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यापैकीच काही प्रतिक्रियांचा हा संपादित गोषवारा.

निमीशकुमार पांड्या लिहितात, "आपण काश्मीर प्रश्नावर खंबीर आहोत आणि त्यासाठी सरकारचा त्याग सुद्धा करू, असा संदेश समर्थकांना आणि जनतेला देण्यासाठी 2019च्या निवडणुका नजरेसमोर ठेवून युतीचा बळी देण्यात आलेला आहे."

अनंत पाटील यांचंही काहीसं असंच मत आहे. "गेल्या 3-4 वर्षांत दहशतवाद जास्त वाढला. लोकांना जम्मू-काश्मीरबद्दल जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण न करू शकल्याने आता नौटंकीबाज पक्षाकडून नौटंकी सुरू झाली आहे."

विवेक लकडेंना मात्र हे मान्य नाही. ते थोडं वेगळं मत व्यक्त करतात. "यात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे (जबाबदारीपासून) आपले हात झटकणे आणि दुसरं म्हणजे दिल्लीतल्या अरविंद केजरीवालांच्या आंदोलनावरून लक्ष विचलित करणे."

तर "एक प्रयत्न करून पाहिला. दुर्दैवानं असफल झाला. आता आपल्या देशातील तथाकथित सेक्युलरवाद्यांना भाजपला दोष देता येणार नाही," असं म्हटलं आहे सत्या गावकर यांनी.

वाजिद मिर्झा लिहितात, "सौ चुहे खाकर बिल्ली (BJP) चली हज को."

"अंगाशी आलं की पळ काढायची भाजपची सवय आहे," असं प्रशांत मयेकर यांनी लिहिलं आहे.

तर सुरेश फटाटे म्हणतात, "बहुतही देर आये लेकिन दुरुस्त आये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)