शुजात बुखारी : 'ईदसाठी गाव त्यांची वाट पाहत होतं, पण...'

    • Author, माजिद जहांगीर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी श्रीनगरहून

"शुजात यांच्या हत्येची बातमी ऐकून आमच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. आम्ही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही", असं शुजात बुखारी यांचे भाऊ सईद बशारत सांगत होते.

उत्तर काश्मीरमधलं किरी हे बुखारी यांचं गाव. बुखारी यांच्या घरात पोहोचलो तेव्हा तिथं प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू दिसत होते. तिथं उपस्थित असलेले सर्व जण दु:खी होते आणि त्यांच्या नजरा बुखारी यांच्या मृत्यूचं कारण शोधत होत्या.

गुरुवारी संध्याकाळी ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना श्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये घडली.

या घटनेत बुखारी यांच्यासहित त्यांच्या 2 सुरक्षा रक्षकांचाही मृत्यू झाला.

बुखारी यांच्या किरी इथल्या घरोसमोर लोकांची गर्दी झाली होती. कुटुंबातल्या महिला व्हरांड्यात बसून मोठमोठ्यानं रडत होत्या. एक बुजुर्ग महिला मोठ्यानं रडत होती की, "माझ्या साहेबा, तू कुठे गेलास?"

अंगणातल्या बाजेवर शुजात यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. शुजात यांना शेवटचं बघण्यासाठी नातेवाईक आणि मित्र आले होते.

शुजात आपल्यामागे 2 मुलं, पत्नी आणि आई-वडील यांना सोडून गेले आहेत.

'गाव त्यांची वाट पाहत होतं'

शुजात बुखारी हे काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' या दैनिकाचे संपादक होते. काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना ते भारताला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांनी या घटनेवर टीका केली आहे.

किरी इथल्या स्मशानभूमीत सुजात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शुजात यांच्या दुमजली घरातली प्रत्येक खोली लोकांनी भरलेली होती.

सईद बशारत यांनी या घटनेचा निषेध करत म्हटलं, "आमचं संपूर्ण कुटुंब शोकमग्न आहे. या घटनेवर बोलायला आमच्याकडे शब्द नाहीत. कुणी हे कृत्य केलं आम्हाला माहिती नाही. ज्यानं कुणी हे असं केलं असेल त्यानं एका पत्रकाराची, एका लेखकाची आणि एका सुसंस्कृत माणसाचा जीव घेतला आहे. शुजात साहेब हे नेहमीच अन्यायाला वाचा फोडत होते. ज्यानं कुणी हे केलं त्यानं रमझानच्या पवित्र महिन्याचाही आदर केला नाही."

शुजात बुखारी बऱ्याच वर्षांपासून श्रीनगरमध्ये राहत होते. त्यांचे अनेक नातेवाईकही श्रीनगरमध्येच राहत. ईद आणि इतर सणानिमित्त ते गावी एकत्र येत.

"आमचे जे काही नातेवाईक श्रीनगरला राहतात ते सर्व ईदसाठी गावी येतात. ईदसाठी आम्ही सगळ्यांची वाट पाहात असतो. त्यामुळे शुजात यांचीही आम्ही वाट पाहत होतो. ईदचा जो उत्साह होता त्याचं रुपांतर दु:खात झालं आहे," सईद पुढे सांगतात.

पत्रकार कुठे सुरक्षित?

"इथे निरपराध लोकांचा जीव जातो. यासारख्या हत्येची कुणीही निंदा करेल. ही तर एका निष्पाप व्यक्तीची हत्या आहे. आजपर्यंत त्यांनी कुणाही व्यक्तीबरोबर मोठ्या आजावात चर्चाही केलेली नाही. जेव्हा आम्ही त्यांना भेटायचो तेव्हा ते आम्हाला त्यांच्या मुलाप्रमाणे वागवत," शुजात यांच्या गावातला तरुण आदिल सांगतो.

शुजात यांची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, असं शुजात यांचे जवळचे मित्र तारिक अली मीर म्हणतात.

"काश्मीरच्या पत्रकारितेतला एक अध्याय शांत करण्यात आला आहे. मला सांगा की, पत्रकार कोणत्या जागी सुरक्षित आहेत. पत्रकारितेसाठी ही खूपच मोठी घटना आहे," मीर सांगतात.

काही वर्षांपूर्वी मीर यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. पण तेव्हा त्यांची यातून सुखरूप सुटका झाली होती.

स्वत:चं वर्तमानपत्र सुरू करण्यापूर्वी शुजात बुखारी हे 'द हिंदू' या वर्तमानपत्राचे ब्यूरो चीफ होते.

आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं शुजात यांच्यावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान जम्मू-काश्मीर पोलिसांनी हल्लेखोरांची छायाचित्रं जारी केली आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)