श्रीनगर : पत्रकार शुजात बुखारींच्या संशयित मारेकऱ्यांचे फोटो पोलिसांकडून जारी

ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांचा श्रीनगरमध्ये गोळीबारात मृत्यू झाला आहे. ते रायझिंग काश्मीर वृत्तपत्र-वेबसाईटचे संपादक होते.

श्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये सायंकाळी 7.15च्या सुमारास त्यांच्या कार्यालयाबाहेर मोटरसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकांचाही गोळ्या लागून मृत्यू झाला.

संध्याकाळी सव्वा सात वाजता मोटार सायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी बुखारी यांच्यावर गोळ्या झाडल्या, असं जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितलं.

"गंभीर अवस्थेत बुखारी यांनी हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं," अशी माहिती PDPचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी बीबीसीला दिली.

दरम्यान पोलिसांनी संशयित मारेकऱ्यांचे फोटो जारी केले आहेत. पण कुठल्याही संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ज्येष्ठ नेते ओमर अब्दुल्ला यांच्यासह विविध नेत्यांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.

'बुखारी यांचा मृत्यू जहालवाद्यांचं अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे. ईदच्या काही दिवस हा हल्ला करण्यात आला. शांतिप्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या लोकांविरोधात आपण एकत्र होऊन लढण्याची आवश्यकता आहे', असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याचा निषेध करत ट्वीट केलं, "बुखारी यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला आहे. हा काश्मीरचा विवेकवादी आवाज शांत करण्याचा प्रयत्न आहे. ते एक निर्भीड आणि धाडसी पत्रकार होते. आम्ही त्यांच्या कुटुबीयांच्या दुःखात सहभागी आहोत."

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या संवेदना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करत म्हटलं आहे, "जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. या प्रदेशात शांतता नांदावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवेल."

"जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी ते सदैव लढत राहिले," असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानंही या हल्ल्याचा निषेध केला आहे - "हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या मूल्यांवरचा घृणास्पद हल्ला आहे."

अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी सुद्धा या घटनेनंतर ट्वीट करत ही दुःखद आणि घाबरवणारी बातमी असं म्हटलं आहे. विकृत डोक्याचं हे काम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार हामीद मीर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे, "सर्वांत जास्त धोकादायक पेशा, आणखी एका पत्रकाराची हत्या. श्रीनगरमध्ये पत्रकार शुजात बुखारींची हत्या झाल्याचं ऐकून खूप दुःख झालं."

पत्रकार शुजात बुखारी हे 1997 ते 2012 दरम्यान 'द हिंदू' या दैनिकासाठी काम करत होते. त्यानंतर ते रायजिंग काश्मीरचे संपादक झाले होते.

काश्मिरातल्या स्थानिक भाषांच्या संवर्धनासाठी ते अभियान सुद्धा चालवत होते.

शुजात बुखारी यांच्यावर 2000 मध्ये सुद्धा हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं.

काश्मिरात शांतता नांदावी यासाठी बराच काळ ते सक्रिय होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)