एसटी संप : 'सातच्या आत घरी जायचं कसं?'

पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी एस.टी राज्यभरात कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची लाइफलाईन म्हणून समजल्या जाणाऱ्या एसटीची सेवा पुरती कोलमडली आहे. सकाळपासून एसटी स्थानकांतून फार कमी बस सुटल्या. यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

एस.टी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि अचानक संपाचं हत्यार उगारण्याचा उद्देश काय, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या सरूड गावातून भेडसगावला जाण्यासाठी निघालेल्या पारूबाई पाटील यांनाही या संपाचा फटका बसला आहे.

त्या म्हशीचं दूध डेअरीत देण्यासाठी निघाल्या होत्या. "कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांना संध्याकाळी सातच्या आत घरात यावं लगतं. त्यात जर डेअरीत वेळेत दूध पोहोचवलं नाही तर ते घेणार नाही आणि ते घरातच ठेवावं लागणार, असे एक न अनेक तोटे सोसावे लागतात एसटी नसल्यानं," असं त्या बीबीसी मराठीशी बोलत होत्या.

भंडारा जिल्ह्यातल्या साकोली आगारामध्ये कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या सविता कापगते आपली व्यथा मांडताना म्हणाल्या, "गेल्या ८ वर्षांत माझ्या पगारात फक्त साडेचार हजार रुपयांची वाढ झाली. मी २०१०मध्ये नोकरीला सुरुवात केली तेव्हा माझा पगार ५ हजार होता आणि आज तो ९ हजार ५४० रुपये झाला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत, दररोज ३० कि.मी ये - जा करूनही आम्हाला पगार वाढ मिळत नाही. इतक्या कमी पैशांत घर कसं चालणार?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

हा संप कोणत्याही एका संघटनेने पुकारलेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्येच या संपाबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीत संप केला होता. त्यानंतर आता हा अघोषित संप सुरू झाला आहे.

पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे कामबंद आंदोलन सुरू केलं. अचानक काम बंद केल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. ग्रामीण भागात ६०-७०% एसटी बसेस रस्त्यावर दिसत आहेत. शहर मात्र वाहतूक विस्कळीत झाली आहे. या संपात शिवसेना प्रणित एसटी संघटना वगळता, इंटक आणि इतर संघटना सहभागी झाल्या आहे. तर मुंबईमध्येही अशीच काही परिस्थिती पहायला मिळत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)