You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एसटी संप : 'लेकीच्या घरून तर निघालो आता वेळेत घरी कसे पोहोचणार?'
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईचा उकाडा, घामाघूम शरीर, हातात सामान आणि चेहऱ्यावर प्रतीक्षा... माधुरी आणि चंद्रकांत सानप यांची ही स्थिती. दादरच्या पुलाखाली बसस्टँडवर ते एसटीची वाट पाहात होते. मात्र आजच्या अचानक झालेल्या संपाची पुसटशी माहितीही त्यांना नव्हती.
चंद्रकांत सानप वरसगावच्या पोलीस ठाण्यात काम करतात. "मी सकाळी ९.३० पासून दादरला बसची वाट पाहात आहे. पण दोन तास झाले तरीही बस मिळाली नाही. आम्हाला या संपाबद्दल काहीच माहिती नव्हती. रोहा बस पकडून आम्ही कोलाडला जाणार होतो. मात्र सकाळपासून आमचा खोळंबा झाला आहे. या संपाची अगोदर सूचना द्यायला हवी होती. आता बघू जे काही वाहन मिळेल त्यानं जावं लागेल."
सानप यांची पत्नी माधुरी यासुध्दा बसची वाट पाहून पाहून थकल्या होत्या. हातात सामान आणि मुंबईची गरमी त्यात वाट पाहणं हे त्यांच्यासाठी असहाय्य झालेलं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं.
त्या म्हणाल्या, "मुंबईत आमची मुलगी राहाते. तिला भेटण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र आज परत कोलाडला जाण्यासाठी निघालो तर आम्हाला गाडीच मिळत नाहीये. गाडी न मिळाल्यानं आम्हाला इथं सामान घेऊन ताटकळत उभं रहावं लागतंय. आम्हाला इथून घरी जायला तीन तास लागतात."
सानप यांच्याच बाजूला येऊन थांबलेले विपुल एवळे हेसुद्धा थोडे गडबडीतच होते. ते नुकतेच इथे आले होते. त्यांच्याशी बोलताना कळालं की त्यांना उरणला जायचं होतं.
ते म्हणाले की, "मी खारघरला राहातो. दादरला माझं ऑफिस आहे. मी सकाळीच ऑफिसला आलो होतो. इथून मला माझ्या कामासाठी उरणला जायचं आहे. दुपारी २ वाजता उरणला मिटींग आहे. मात्र इथं आल्यावर मला कळलं की, आज एसटीचा संप आहे. मला आता दुसरा काही तरी पर्याय शोधावा लागेल."
"आता वडाळा डेपोला जावं लागेल. तिथून काही मिळतंय का पाहातो. हा संप अत्यंत चुकीचा आहे. कदाचित त्यांच्या दृष्टीनं तो योग्य असेलही मात्र प्रवाशांच्या दृष्टीनं हा अचानक झालेला संप चुकीचा आहे," ते पुढे सांगतात.
आम्ही परळ बसस्थानकावर काय परिस्थिती आहे हे पाहाण्यासाठी गेलो. परळ बसस्थानकात सर्व बस थांबलेल्या होत्या. तर स्थानकाबाहेर पोलिसांचा फौजफाटा उभा होता.
कर्मचारी डेपोबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. डेपोत प्रवासी नव्हते. जे लोक होते ते आजूबाजूच्या ऑफिसातले होते आणि काही एसटी कर्मचारी होते. थोड्या वेळात एक महिला तिच्या मुलासोबत सामान घेऊन बाहेरगावी जाण्यासाठी बसस्थानकात आली. कदाचित त्यांनासुद्धा संपाबद्दल कल्पना नसावी.
त्यांचं नाव शुभांगी धुमाळ. त्या वरळी कोळीवाड्यातून आल्या होत्या. त्या म्हणाल्या की, "माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी त्याला मुंबईत ठेवलं होतं. माझा मुलगा आयटीआय करतो. मी त्यालाच भेटायला आले होते. मला परत आमच्या गावी अलिबागला जायचं होतं. मात्र इथं आल्यावर कळलं की, बसचा संप आहे. काय करावं सुचत नाहीये. आता इथून शिवडी, मग तिथून पनवेल असं करत कदाचित जावं लागेल."
संपाचं कारण काहीही असो. परंतु उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून घरी परतणारे प्रवासी मात्र या अचानक झालेल्या संपामुळे चांगलेच हैराण झाले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)