You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘नवी सूनच मुलाचा असा घात करेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’
- Author, प्राजक्ता ढेकळे
- Role, बीबीसी मराठीसाठी पुण्याहून
"माझा आनंद कधीच कुणाला वाईट बोलत नव्हता. अख्ख्या वसाहतीत सगळ्या लोकांच्या मदतीला धावून जायचा. पण त्यांनी माझ्या मुलाचा घात केला. आता इतका लांब निघून गेला, की परत कधीच नाय येणार. स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून," डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत मृत आनंद कांबळेच्या आई बोलत होत्या.
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्याच्या औंध परिसरात आनंदच्या खुनाचीच चर्चा सुरू आहे. याच भागातल्या आंबेडकर वसाहतीत एका 10 बाय 12च्या घरात आनंद कांबळे त्याच्या आईवडील आणि भाऊ-वहिनीबरोबर राहत होता. त्याच्या घरातील कॉटच्या खाली आहेर, लग्नात आलेल्या भेटवस्तूंचा पसारा पडला होता.
कॉटखालचा पसारा सारून विचारपूस करायला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बसायला जागा देत आनंदची आई बोलत होती.
आनंदच्या छोट्या भावाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं. मोठा असूनही सेटल झाल्याशिवाय लग्न करायचं नाही, म्हणून आनंदने अगदी आतापर्यंत लग्न केलं नव्हतं.
20 मेला लग्न झाल्यानंतर सगळे सोपस्कार पार पडले आणि त्यानंतर आनंद आणि त्याचा मित्र राजेश बोबडे आणि त्यांच्या बायका, अशा दोन नवदांपत्यांनी एकत्रच पाचगणी-महाबळेश्वरला फिरायला जायचं ठरवलं.
हा त्याच्या आयुष्यातला अखेरचा प्रवास असेल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.
'सून इतकी क्रूर वागेल, असं वाटलं नव्हतं'
"माझा आनंद अत्यंत मन मिळाऊ मुलगा होता. त्याच्या लहान भावाला देखील तो कधी उलटून बोलला नव्हता. आमच्या घरातला कर्ता पुरुष होता तो," आनंदची आई आवंढा गिळत सांगत होती.
"एप्रिल महिन्यात लांबच्या नातेवाइकांकडून सुचवलेल्या मुलीचं स्थळ बघितलं. मुलगी आम्हाला पसंत पडली, म्हणून आम्ही साखरपुडा करायचा ठरवला. साखरपुड्यानंतर लगेच आम्हाला लग्न करायचं नव्हतं. पण मुलीच्या घरच्यांनी आग्रह धरला, त्यानुसार 20 मेला लग्नही लागलं," त्या सांगतात.
"नवीन सून म्हणून घरात आलेली दिक्षा जेवढे दिवस आमच्या सोबत राहिली, तेवढ्या दिवसात खूपच मिळून मिसळून राहिली, आमच्याबरोबर एकदम आदराने वागली. पण तीच इतकी क्रूरपणे वागेल, अस वाटलंच नाही आम्हाला कधी," असं त्या म्हणाल्या.
'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
2 जूनला नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी आम्ही आनंद आणि दिक्षाबरोबर फिरायला गेलेल्या राजेश बोबडे यांना विचारलं.
"आम्हाला पुण्यातून सकाळी लवकर निघायचं होतं, पण निघायलाच दुपारचा एक वाजला. कारमध्ये मी, माझी बायको पुढच्या सीटवर बसलो होतो आणि आनंद-दिक्षा मागच्या सीटवर होते.
"पुण्यातून निघाल्यानंतर खंडाळ्याच्या घाट सुरू झाल्यानंतर दिक्षाला उलट्यांचा त्रास सुरू झाला. म्हणून मी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. थोडा वेळ झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आमची गाडी वाईवरून निघून पसरणीच्या घाटाला लागली होती. पसरणीचा घाट चढायला सुरुवात करून काही वेळ होताच पुन्हा दिक्षाला उलटी येऊ लागली, म्हणून आम्ही पुन्हा गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली.
"दिक्षा गाडीतून उतरून थोडंसं पुढे रस्त्याच्या बाजूला उलटी करण्यासाठी गेली. तिच्या मागे आनंदही पाण्याची बाटली घेऊन गेला. नंतर मी आणि माझ्या बायकोने पसरणी घाटातील कट्ट्यावर बसून काही सेल्फी घेतले.
"काही वेळानं एक दुचाकी आमच्या गाडीच्या मागे येऊन उभी राहिली. त्यावर दोघं होते, पण मी काही लक्ष दिलं नाही. काही मिनिटांतच दुसऱ्या दुचाकीवरून अजून दोघं आले, पण ते आमच्या गाडीच्या पुढे जिथे दिक्षा आणि आनंद उभे होते, तिथे थांबले. अन् काही क्षणात... म्हणजे अगदी काही कळण्याच्या आतच दिक्षाकडे तोंड करून उभ्या असलेल्या आनंदच्या पाठीत त्यांनी कापडातून गुंडाळून आणलेल्या कोयत्याने वार करायला सुरुवात केली!
"पुढची 5-10 मिनिटे मला काही सुधरलंच नाही. वार झाल्यानंतर आनंद स्वतःला वाचवण्यासाठी माघारी पळण्याचा प्रयत्न करत होता. तो गाडीजवळ येईपर्यंत कोसळला होता. गाडीवर आलेल्या हल्लेखोरांनी पुन्हा माघारी वळून जाताना गाडीच्या पुढच्या बाजूला कोयत्याने वार केला. तो वार नेमका काचेवर बसल्यामुळे काच फुटून माझ्या बायकोला थोडी जखम झाली.
"काही क्षण मला नेमक काय करायचं तेच कळत नव्हतं. थोडंसं सावरून मी पाचगणी पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मला 'ही घटना वाई पोलिसांच्या हद्दीत येते. तुम्ही वाई पोलिस स्टेशन मध्ये जावा,' असं सांगितलं. मी लगेच वाई पोलीस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची माहिती दिली," असं राजेश बोबडे सांगतात.
रेडियम नंबरप्लेटचं दुकान होतं
आनंदवर घाटात हल्ला झाल्याचं दिक्षानेच आनंदच्या घरी फोन करून सांगितलं. संतोष कांबळे या त्याच्या छोटा भावाला घटनेच्या दिवशी दुपारी साडे तीन वाजता दिक्षाचा फोन आला.
याविषयी संतोष म्हणतात, "'घाटात आमच्यावर कुणीतरी हल्ला केला आहे. माझं मंगळसूत्र हिसकावून घेतलं आहे आणि यांच्यावर हल्ला केला आहे,' एवढंच बोलून दिक्षानं फोन ठेवून दिला. घाबरलेल्या अस्वस्थेतच मी पाचगणीला काही मित्रांना घेऊन निघालो. तिथे पोहोचेपर्यंत तर सगळं संपलं होतं."
"माझा भाऊ आमच्या घरातील कर्ता पुरुष होता. औंधमधील आंबेडकर वसाहतीजवळच त्यानं रेडियम नंबर प्लेट बनवण्याचं दुकान सुरू केलं होतं. पुढं त्यानं बाणेर रोडला दुसरं रेडियम नंबर प्लेट बनविण्याचं दुकान टाकलं. ते सध्या मी बघतो," संतोष सांगत होता.
"त्याचं कुणाशीही वैर नव्हतं. गेल्या चाळीस-बेचाळीस दिवसातच होत्याचं नव्हतं झालं. दिक्षाने अत्यंत थंड डोक्याने आमच्या आनंदचा घात केला," संतोष आरोप करतात.
नवरीनेच केला नवरदेवाचा घात
का आणि कसा गेला आनंदचा जीव, हे आम्हाला सविस्तर वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्याकडून कळलं.
"दिक्षा आणि निखिल मळेकरचे प्रेमसंबंध तिच्या लग्नाच्या आधीपासून सुरू होते. पण दिक्षाच्या घरच्यांचा या प्रेमसंबधाला विरोध होता. त्यामुळे दिक्षाच्या घरच्यांनी तिचं लग्न आनंद कांबळे यांच्याशी लावून दिले.
"पण निखिल आणि दिक्षाला अजूनही हे मंजूर नव्हतं. अखेर त्यांनी आनंदचा काटा काढायचा बेत आखला... एकदम शांत डोक्याने," असा पोलीस दावा करतात.
शुक्रवारी म्हणजे 1 जूनला दुपारीच खुनाची सुपारी घेतलेले चौघे पाचगणीला पोहोचले होते. निखिलच्या मोबाईल लोकेशननुसार तो पाचगणीत खुनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच आला असल्याचं दाखवत होते, असं पोलीस सांगतात.
"शनिवारी दिक्षा तिच्या नवऱ्याबरोबर पाचगणी-महाबळेश्वरला येणार असल्याची माहिती तिने निखिलला दिली होती. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत या दोघांचं चॅटिंग चाललं होतं, हे तिचे चॅटिंग रेकार्ड चेक केल्यावर आम्हाला कळलं. एवढंच नव्हे तर दिक्षा निखिलला आनंदच्या प्रत्येक हालचालीची माहिती अगदी खून होईपर्यंत देत होती. घटनेच्या दिवशी दिक्षा आणि आनंद हे पुण्याहून पाचगणीला निघाले असताना दिक्षा सातत्यानं निखिल मळेकरला ते जात असलेल्या रस्त्याचं लोकेशन पाठवत राहिली.
"वाईवरून पसरणीचा घाट चढायला सुरुवात केल्यानंतर दिक्षाने पुन्हा एकदा आपल्या गाडीचे लोकेशन निखिलला पाठवलं आणि दुसरीकडे आपल्याला उलटी होत असल्याचा बहाणा करून गाडी रस्त्याच्या कडेला थांबण्यास सांगितली. दिक्षा उलटी करण्याच्या बहाण्याने गाडीतून खाली उतरली. तिच्या पाठोपाठ आनंद कांबळे देखील गाडीतून खाली उतरले.
"मात्र तेवढ्यात पाचगणीच्या बाजूने दोन दुचाकीवर चार लोक दिक्षा आणि आनंदजवळ आले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या धारदार शस्त्रांनी आनंदवर वार करायला सुरुवात केली," असं पोलीस निरीक्षक वेताळ सांगतात.
पोलीस घटनास्थळी पोहोचताच दिक्षाने 'आम्हाला लुटण्यासाठी लोक आले होते. त्यांनीच आनंद यांच्यावर हल्ला केला, माझं मंगळसूत्र हिसकवण्याचा प्रयत्न केला,' असं सांगितलं.
"आनंद यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवण्यात आलं, पण तिथे पोहोचताच डॉक्टरांनी आनंद यांना मृत घोषित केलं होतं," अशी माहिती वेताळ यांनी दिली.
'फाशीची शिक्षा व्हायला हवी'
वेताळ यांनी सांगितल की खुनाच्या कटातील आरोपी निखिल मळेकर हा मूळ निगडी येथील चिखलीचा रहिवासी आहे. त्याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सोबतच मृत आनंदची बायको दिक्षाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
आम्ही दिक्षाच्या कुटुंबीयांकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काही बोलण्यास ठाम नकार दिला. दिक्षाच्या शेजाऱ्यांनीही या विषयावर बोलणं टाळलं.
दिक्षा आणि निखिल मळेकर यांच्या वकिलांशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
सुरेखा परिहार यांनी दिक्षाचं स्थळ आनंदच्या घरच्यांना सुचवलं होतं. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाची ती मुलगी होती, पण तिच्या वर्तनाविषयी मला कोणतीच कल्पना नव्हती, असा दावा सुरेखा यांनी केला आहे.
दरम्यान, आनंदच्या खुनाला सुरेखाही तितक्याच जबाबदार आहेत, असा आरोप आनंदचे लहान भाऊ संतोष कांबळे यांनी केला आहे.
"अजूनही मी कुठल्या गोष्टीत दोषी आढळले तर शिक्षा भोगायला तयार आहे," असं सुरेखा म्हणाल्या.
आनंदचे वडील ज्ञानदेव कांबळे यांनीही आपलं दुःख, आपला आक्रोश बीबीसीबरोबर बोलताना व्यक्त केला.
"आनंदच्या खुनाच्या कटातील आरोपी निखिल मळेकरचे राजकीय लागेबांधे खूप असल्यामुळे हे प्रकरण दडपलं जाऊ नये. सरकारने आमच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी. याबरोबरच या केसचा लवकरात लवकर निकाल लावून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी," अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)