रामदेव बाबा : व्हॉट्सअॅपला स्वदेशी पर्याय म्हणून आणलेलं अॅप एका दिवसात पतंजलीनं मागे घेतलं कारण...

गेल्या काही वर्षांमध्ये पतंजली हे नाव घराघरात पोहोचलं आहे. पतंजली समूहाची टूथपेस्ट, साबण, अशी अनेक उत्पादनं बाजारात आहे.

पतंजलीनं व्हॉट्सअॅपला स्वदेशी पर्याय देण्याचा प्रयत्न केला. नवीन अॅप लाँचही झालं. पण सुरक्षेच्या कारणामुळं त्यांना ते परत घ्यावं लागलं.

पतंजली प्रॉडक्ट्सनं व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी किंभो नावाचं अॅप गुरुवारी लाँच केलं पण खूप साऱ्या अडचणी निर्माण झाल्यामुळं त्यांना ते परत घ्यावं लागलं.

हे अॅप लाँच झाल्यानंतर काही तासांतच ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या. ग्राहकांनी शेअर केलेला डेटा सुरक्षित राहात नव्हता, असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. त्यामुळं ते अॅप त्यांनी अॅप स्टोअरवरून परत घेतलं.

"पतंजलीनं लाँच केलेल्या अॅपमध्ये काही त्रुटी नव्हत्या पण आम्ही ते परत घेतलं. कारण आम्ही ते प्रायोगिक तत्त्वावर लाँच केलं होतं," असं पतंजलीचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी बीबीसीला म्हटलं.

"भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही अग्रेसर आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही किंभो हे अॅप लाँच केलं.

या अॅपला लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे तपासून पाहण्यासाठी आम्ही हे अॅप लाँच केलं होतं. लोकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. लवकरच आम्ही हे अॅप पुन्हा लाँच करू. त्यानंतर आम्ही या अॅपशी संबंधित असणाऱ्या तांत्रिक आणि सुरक्षेबाबतच्या प्रश्नांची उत्तरं आनंदानं देऊ", असं तिजारावाला यांनी सांगितलं.

तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रात येण्याचा हा रामदेव बाबांचा पहिला प्रयत्न होता.

रामदेव बाबांनी या क्षेत्रात पाय ठेवण्याची घाई केल्याचं निरीक्षण इलियट एल्डरसन या टोपणनावानं ट्विटर अकाउंट चालवण्याऱ्या सायबर सिक्युरिटी तज्ज्ञानं म्हटलं आहे.

किंभो हे अॅप बोलो मेसेंजरची नक्कल असल्याचं तंत्रज्ञान विषयक लेखन करणाऱ्या प्रशांतो रॉय यांनी म्हटलं आहे. "बरीच फीचर्स हे बोलोप्रमाणेच आहेत. सर्वच गोष्टी या अॅपप्रमाणे नाहीत पण काही बाबतीत हे अॅप अगदी बोलोसारखंच आहे."

किंभो अॅपमध्ये स्टोर होणारा डेटा सहज वाचता येऊ शकतो. तसेच युजर व्हेरिफेकिशनची प्रक्रिया ही खूप सोपी आहे त्यामुळे ती सहज हॅक करता येऊ शकते असं प्रशांतो सांगतात.

बोलो मेसेंजरलाच रामदेव बाबांनी रिब्रॅंडिंग केल्याचं ऑल्ट न्यूज वेबसाइटने म्हटलं आहे. 'आधी अस्तित्वात असलेल्या अॅपलाच रिब्रॅंडिंग करून स्वदेशी अॅप बाजारात आणल्याचा प्रचार पतंजलीनं केला', असं ऑल्ट न्यूजनं सांगितलं आहे.

पतंजलीचे तिजारावाला यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

हे अॅप आमच्या इंजिनअर आणि डेव्हलपरनी तयार केलं आहे. जेव्हा आम्ही हे अॅप पूर्णपणे लाँच करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आम्ही यासाठी किती प्रयत्न केले आहेत, असं तिजारावाला यांनी म्हटलं.

भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 50 कोटीच्या घरात आहे. व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)