सोशल - 'मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर राहुल गांधी का नाही?'

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरल्यास मी पंतप्रधान होऊ शकतो, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे.

तसंच, 2019 मध्ये भाजपची सत्ता येणार नाही आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाविरोधात देशातले अनेक विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुल यांनी हे मत मांडलं आहे.

"तुम्ही माझ्या वक्तव्यावर हसाल, पण 2019मध्ये भाजप सरकार स्थापन करणार नाही. आज विरोधकांमध्ये एकी आहे, त्यामुळेच भाजपला 2019ची निवडणूक कठीण जाईल," असं राहुल गांधींनी म्हटलंय.

दरम्यान, याच विषयावर आम्ही वाचकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर अनेक वाचकांनी आपलं मत नोंदवलं आहे. त्यातल्या काही जणांच्या मते, राहुल गांधी अजून तरी या पदासाठी योग्य उमेदवार नाहीत. तर काहींनी तसं झाल्यास काहीच हरकत नाही असं म्हटलं आहे.

"काय बिघडलं? मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर राहुल गांधी का नाही. या देशातल्य जनतेला ठरवू द्या कोणाला पंतप्रधान करायचे," असं मत नरेंद्र छाजेड यांनी व्यक्त केलं आहे.

तर संगीता खिरे म्हणतात,"त्यांच्या वक्तव्याचा पहिला भाग महत्त्वाचा आहे, 'काँग्रेस जिंकली तर..."

विशाल चौहान लिहितात, "हे काँग्रेसचे अध्यक्ष होण्याएवढं सोपं नाही. भारतीय जनता खूप हुशार आहे. आम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणू."

"भाजपकडे प्रचारासाठी एकही चांगला नेता नाही. लोकसभेपासून महापालिका निवडणुकीपर्यंत सगळीकडे पंतप्रधानानांच जावं लागतं," अशी प्रतिक्रिया विराज पाटणकर यांनी दिली आहे.

"तर डॉ. मनमोहन सिंह यांनीच पुन्हा पंतप्रधान होणं गरजेचं आहे. कारण भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढणं आणि भारतीय कंपन्यांना बाहेर जाण्यापासून रोखणं गरजेचं आहे," असं मत श्रीकांत जुनंकर यांनी व्यक्त केलं आहे.

मनोज इंगोले आपल्या प्रतिक्रियेत लिहितात,"मोदींनी 4 वर्षांत लाल किल्ला विकला. आता त्यांच्या हातात सत्ता गेली तर देश नक्कीच विकतील म्हणून राहुल आवश्यक आहे."

तर "त्याचं पूर्ण वाक्य नीट ऐकलं तर समजून येईल ते बोलत आहेत, 'आम्हाला तेवढ्या जागा आल्या तर…' त्या कशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष मिळवेल त्यावर सगळं अवलंबून आहे," असं अमोल गोरे-पाटील म्हणतात.

दरम्यान, "राहुल गांधींना राष्ट्रपती करून टाका कारण ते सर्वोच्च पद आहे किंवा भारताचे राजदूत म्हणून इटलीला पाठवा," असा सल्ला सुरेश फडणीस यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)