You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोण होते यावेळचे अण्णा हजारेंचे समर्थक?
- Author, रोहन टिल्लू
- Role, बीबीसी मराठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णा हजारे यांनी सातव्या दिवशी त्यांचं आंदोलन मागे घेतलं. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णांनी जलप्राशन केलं.
कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता, कृषी अवजारांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणणे, लोकपाल नियुक्तीसाठी कालमर्यादा निश्चित करणे आणि निवडणूक सुधारणांबाबत सकारात्मक पाऊल उचणे, या अण्णांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसाठी अण्णांनी सरकारला सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे.
यंदा अण्णांचे पाठीराखे कोण?
डोक्यावर 'मी अण्णा हजारे'ची टोपी, हातात तिरंगा आणि तोंडी अण्णा हजारेंचं नाव... दिल्लीतल्या रामलीला मैदानावर मार्च महिन्याच्या चढत्या उन्हात उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांच्या समर्थनासाठी विशेष गर्दी नव्हती. पण जमलेल्या समर्थकांमध्ये उत्तर भारतातल्या कार्यकर्त्यांचा समावेश लक्षणीय होता.
2011मध्ये दिल्लीत झालेल्या अण्णांच्या आंदोलनामुळे किंवा आंदोलनानंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या संस्थेनं अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. अण्णांच्या समर्थनार्थ लाखो लोक रामलीला मैदानावर तळ ठोकून होते.
2018च्या मार्च महिन्यात गेल्या आठवड्यात अण्णांनी आंदोलनाची हाक दिली, त्या वेळी 2011ची पुनरावृत्ती होईल, असा कयास अनेकांनी केला होता. पण यावेळी अण्णांच्या मागे ना केजरीवाल होते ना इतर कोणताही विरोधी पक्ष! त्यामुळे रामलीला मैदानावरची गर्दी तशी रोडावलेलीच होती.
तरीही अण्णांना पाठिंबा देण्यासाठी साधारण हजारभर लोक रामलीला मैदानात तळ ठोकून होते. हे लोक कोण होते, कुठून आले, अण्णांच्या मागे का आहेत?
अण्णांना पाठिंबा का?
या सगळ्यांशी बोलल्यानंतर जाणवलेली एक गोष्ट म्हणजे, त्यांना अण्णा हजारेंबद्दल प्रचंड आदर आहे. उत्तर प्रदेशमधल्या सीतापूर जिल्ह्यातून आलेल्या ग्यानवती यांची तर अण्णांवर श्रद्धा आहे.
अण्णांच्या मागण्या आहेत, त्याच आमच्या मागण्या आहेत. अण्णा त्यांच्यासाठी काहीच मागत नाहीत, ते आमच्यासाठीच मागतात, असं ग्यानवती सांगतात. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत अण्णा उपोषण सोडणार नाहीत, असा विश्वासही त्यांना होता.
"अण्णांचं उपोषण सुरू आहे, तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार आहोत. त्यांच्याबरोबर आम्हीही आंदोलन करत आहोत. ते सांगत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही," आपलं घरदार सोडून आंदोलनासाठी आलेल्या ग्यानवती सांगत होत्या.
हरयाणामधून आलेल्या सुखदेवसिंग यांची तर अण्णांवर भक्ती आहे. "अण्णा जे बोलतात, तेच करतात. त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवलेला नाही. अण्णा विकाऊ नाहीत. अण्णा संत माणूस आहेत. ते भारताच्या हिताचं बोलतात," सुखदेव सांगतात.
अण्णा हजारेंच्या 2011मधल्या आंदोलनालाही त्यांचा पाठिंबा होता. यावेळी तर त्यांनी दिल्लीत ठाण मांडायचं ठरवलं होतं. आपल्या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय अण्णा आंदोलन मागे घेणार नाहीत, असा विश्वास सुखदेव यांना वाटत होता.
स्वत: शेतकरी असलेल्या सुखदेवसिंग यांना अण्णांनी सर्व देशातल्या शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसावं, याचंच अप्रुप वाटतं. अण्णा आमच्यासाठी लढा देत आहेत, त्यामुळेच आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं सुखदेवसिंग यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशमधल्या लालाराम यांच्या मते अण्णा शेतकऱ्यांचे अन्नदाता आहेत. ते शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध काहीच करणार नाहीत. अण्णा समर्पण भावानं काम करतात म्हणूनच आपला त्यांना पाठिंबा आहे, असं ते सांगतात.
पंजाबमधले रायसिंग हे नवनिर्माण किसान संघ नावाची संस्था चालवतात. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच ते अण्णांच्या या आंदोलनात सहभागी व्हायला आले आहेत.
2011मध्येही अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या श्रीपाल तेवलिया यांच्या बरोबर यावेळी त्यांचे इतरही मित्र आंदोलनात सहभागी झाले आहेत.
ते म्हणतात, "आम्ही सरकारविरोधी नाही. जनलोकपाल लागू करण्याची मागणी अत्यंत व्यवहार्य आहे. भ्रष्टाचार दूर करण्याचं वचन देऊनच मोदी सत्तेवर आले आहेत आणि मोदीच तो बदल करू शकतात."
श्रीपाल म्हणतात की, महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच अण्णा हजारे एक ब्रँड आहेत. तो ब्रँड भ्रष्टाचाराविरोधी लढा देतो आणि त्या ब्रँडमागे समर्थक गोळा होतात.
आंदोलकांची गर्दी गेली कुठे?
या वेळी अण्णांच्या आंदोलनात समर्थकांची विशेष गर्दी जाणवत नव्हती. पण उत्तर प्रदेशातून आलेल्या लालाराम यांच्या मते संख्या कमी असली, तरी समर्थकांची श्रद्धा अढळ आहे.
ते म्हणतात, "इथे पंजाबमधूनही अनेक जण आले आहेत. गुरू गोविंदसिंग यांनी सांगितलं होतं की, चिमणी ससाण्याबरोबर लढू शकते तसंच आपणही सव्वा लाखांच्या सैन्याशी लढू शकतो. त्यामुळे इथे जमलेला एक एक समर्थक एक एक लाखासारखा आहे."
अण्णांच्या आंदोलनात 2011मध्ये सहभागी झालेल्या लातूरमधल्या मनोहर पाटील यांनी या वेळीही आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या मते 2011मध्ये अण्णांबरोबर आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना सत्तालालसा होती. यावेळी आंदोलकांची संख्या कमी असली, तरी प्रत्येक आंदोलक सच्च्या भावानं इथं आला आहे.
यावेळी आंदोलकांची गर्दी कमी आहे, ही गोष्ट श्रीपाल यांनाही मान्य आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. इतर कोणत्या संस्थाही कमी आहेत, असं निरीक्षण श्रीपाल नोंदवतात. पण त्यांच्या मते, इथे आलेल्या प्रत्येक आंदोलकाला अण्णांवर प्रचंड विश्वास आहे.
गेल्या वेळी आंदोलनाचा फायदा घेत इतर लोकांनी सत्तासोपान चढला होता. तशी गोष्ट आता होऊ नये, यासाठी अण्णा प्रतिज्ञापत्र भरून घेत आहेत. त्यामुळेही गर्दी कमी झाल्याचं श्रीपाल सांगतात.
कानपूरमधून आलेल्या सुभाष ठाकूर यांना फेसबूकवरून अण्णांच्या आंदोलनाबद्दल माहिती मिळाली. ते आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते.
काहीही झालं, तरी इथे जमलेल्या लोकांना अण्णा हजारे म्हणजे भ्रष्टाचारविरोधी लढ्याचा चेहरा वाटतात. त्यांच्या मागे, त्यांच्यासाठी हे लोक अण्णांबरोबरच कितीही दिवस आंदोलन करायला तयार आहेत. अण्णांनी या वेळी आंदोलन मागे घेतलं, तरी पुढल्या वेळी लढ्याची हाक दिल्यावर आपण पुन्हा येऊ, असंच हे कार्यकर्ते सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)