You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हेनेझुएला : तुरुंगातल्या आगीत 68 ठार
दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुएलामधल्या कारबोबो प्रांतातल्या व्हॅलेन्सिआ शहरातील एका पोलीस स्टेशनाच्या तुरुंगांत दंगल आणि आग यामुळे 68 जण मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इतक्या जणांचे प्राण घेणाऱ्या या प्रकरणाचं मूळ कशात आहे याची चौकशी सुरू असल्याचं मुख्य सरकारी वकील तारेक साब यांनी सांगितलं.
तुरुंगातील कैद्यांनी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी गाद्या आणि चटया पेटवून दिल्या. यातूनच आग लागली. आगीची बातमी कळताच पीडितांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला वेढा घातला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला.
आगीनंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्यानं जीव गमावल्याच्या वृत्ताला प्रशासनानं दुजोरा दिला आहे.
आग आटोक्यात आल्याची माहितीही प्रशासनानं दिली आहे.
अनेकांचे प्राण घेणाऱ्या या दुर्घटनेमुळे काराबोबोवर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये बहुतांश कैद्यांचा समावेश आहे. शिवाय, कैद्यांना भेटायला आलेल्या दोन महिलांचाही समावेश आहे, अशी माहिती साब यांनी दिली.
आगीमुळे जीव गुदमरून अनेक कैद्यांनी जीव गमावल्याचं पीडितांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांनी भरलेल्या तुरुंगांसाठी व्हेनेझुएलाची ओळख आहे. प्रचंड गर्दीमुळे हिंसाचार आणि दंगलीच्या घटना वारंवार घडतात.
आर्थिक संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणावरील कैद्यांना तुरुंगात सामावून घेणं व्हेनेझुएलासमोरील आव्हान आहे. यावर उपाय म्हणून तात्पुरत्या स्वरुपाचे तुरुंग उभारले जातात. व्हॅलेन्सिआमधील तुरुंग हा अशाच स्वरुपाचा होता.
काही तुरुंगांमध्ये क्षमतेच्या पाच पटींपेक्षा जास्त कैदी असल्याची माहिती उना व्हेंटाना अ ला लिर्बेटाड अर्थात 'अ विंडो ऑन फ्रीडम' संस्थेचे प्रमुख कार्लोस निइटो यांनी सांगितलं.
गेल्या महिन्यात काराबोबोमधील एका अन्य तुरुंगात काही कैद्यांनी दंगल घडवून आणली आणि काहीजणांना ओलीस ठेवलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)