You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : गावरान 'बबन' सोशल मीडियावर सैराट
- Author, मोहसीन मुल्ला
- Role, बीबीसी मराठी
'एम-80'वरून एक तरुण डेअरीत दूध घालतो, याच एम-80 वरून प्रेयसीसोबत फिरतो, म्हशींच्या धाराही काढतो. गावच्या राजकारणातून हाणामारीही होते. 'हम खडे तो सरकारसे बडे,' असं त्यांच्या तोडचं वाक्य आहे, जोडीला शिव्याही आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्रास दिसणारं हे चित्र साकारण्यात आलं आहे 'बबन' या सिनेमात.
सोशल मीडियावर तीही खास करून ग्रामीण भागात सध्या या सिनेमाची चर्चा जोरात सुरू आहे. कोणतही मोठं बॅनर नसलेला हा सिनेमा ग्रामीण भागातील तरुणाईसाठी चर्चेचा विषय ठरला आहे.
बबनच्या यूट्यूबरील ट्रेलरला 19 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर या सिनेमातल्याच 'साज ह्यो तुझा' या गाण्यानं 25 लाख व्ह्यूजचा टप्पा कधीच पार केला आहे. 'ख्वाडा' या पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातला विद्यार्थी आणि पैलवानकी करत असलेला मतीन शेख यानं फेसबूकवर या सिनेमाचा उल्लेख देशी बोलपट असा केला आहे. तो म्हणतो, "एका धनगराच्या पैलवान पोरावर गावातील सरंजाम पांढरपेशी वर्ग कसा अन्याय करतो आणि या अन्यायाची परतफेड कशी होते हे या सिनेमातून मांडले आहे."
तर स्वप्नील माचवे फेसबूक पोस्टमध्ये म्हणतात, "मातीचा स्पर्श आणि बोलीभाषेचा गोडवा अप्रतिम कथानक आणि त्याहूनही सुरेख अभिनय. आजपर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम मराठी चित्रपटांपैकी एक, असा सिनेमा आहे."
सज्जन यादव यानं या सिनेमाची 'पोस्ट'भर स्तूती केली आहे. बबन पाहून खूप वेळ झोप लागली नाही, असं तो म्हणतो.
राम वडगावकर यानं फेसबूक पोस्टमध्ये मराठी मातीतील अस्सल गावठी आणि रांगडा बबन नक्की पाहा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तर अक्षय कदम यानं ट्वीट करून बबन यावर्षीचा मराठीतील सर्वोत्तम सिनेमा असल्याचं म्हटलं आहे. सैराटनंतरचा सर्वोत्तम सिनेमा असं त्यांनं बबनचं वर्णन केलं आहे.
ग्रामीण भागातील भावविश्व मांडलं
या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे अहमदनगर जिल्ह्यातल्या गव्हाणवाडीतले आहेत. इथून काही अंतरावर पुण्यातलं शिरूर आहे. ते म्हणतात, "ग्रामीण भागात आजूबाजूला काय चालतं तेच मी सिनेमातून दाखवतो. दुसरं काही मला शक्यही नाही. ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांना त्यांच्या जीवनाबद्दल पाहायला नक्कीच भावेल."
'ख्वाडा' या सिनेमाच्या निर्मितीसाठी कऱ्हाडे यांना स्वतःची जमीन विकावी लागली होती. यावेळी त्यांचे 5 मित्र प्रमोद चौधरी, भाऊसाहेब शिंदे, मोनाली संदीप फंड, योगेश बिंबळे आणि चंद्रकात राऊत यांनी या सिनेमच्या निर्मितीची जबाबदारी पेलली आहे.
"ख्वाडाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं या सिनेमाची निर्मिती सोपी गेली. बबनच्या निर्मितीसाठी मित्रच पुढे आले," कऱ्हाडे सांगतात.
या सिनेमाचं काम 2 वर्षं सुरू होतं. बबनची तुलना सैराटशी करणं योग्य नाही असं ते म्हणतात.
ते म्हणाले, "प्रत्येक सिनेमा ही एक स्वतंत्र निर्मिती असते. त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. अशी तुलना काही माध्यमांतून होत आहे. प्रेक्षक तशी काही तुलना करत नाहीत."
ग्रामीण सिनेमाना नवी झळाळी
'ग्रामीण सिनेमा' हीसुद्धा नवी लाट नाही असं ते म्हणतात. पूर्वीचे गाजलेले जवळपास सर्व सिनेमे, निळू फुले आणि दादा कोंडके यांचे सिनेमे काय होते? मध्यंतरीच्या काही काळात मरगळ आली असेल पण आता ग्रामीण भागातील दिग्दर्शक पुढे येत आहेत, त्यामुळे एकप्रकारे ग्रामीण सिनेमाला नवी झळाळी मिळत आहे, असं आपण म्हणू शकतो, असं कऱ्हाडे सांगतात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)