सोशल : 'गेली 4 वर्षं अण्णा झोपले होते काय?'

जनलोकपाल विधेयक आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर अण्णा हजारे दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णा हजारे आंदोलन करत आहेत. त्यांच्या या उपोषण आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं? हा प्रश्न आम्ही सोशल मीडियावर विचारला होता.

या प्रश्नावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रतिक्रियांचा सारांश आणि काही निवडक प्रतिक्रिया आम्ही इथे देत आहोत.

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी आपली मतं मांडली. यात 'गेली 4 वर्षं अण्णा हजारे का पुढे आले नाहीत?' असा सूर अनेकांच्या प्रतिक्रियांमधून डोकावला.

याबाबत बोलताना राजाभाऊ नागरे म्हणतात की, "अण्णांनी गेली चार वर्षं शांतता धारण केली होती. शेतकऱ्यावर अन्याय, जनतेला उन्मादाची वागणूक, आश्वासनांची पूर्तता न करणे या सर्व बाबी डोळ्यांसमोर दिसत असूनही अण्णा मौन धारण करून बसले होते."

या प्रश्नावर व्यक्त होताना दिनेश पाटील म्हणतात, "अण्णा व मोदींना भारतीय जनतेनं साथ देऊन पाहिली पण त्यांनी जनतेला निराश केलं. जनता अण्णांबरोबर नाही हे या दोन दिवसांत दिसून आलं. पुढे हीच वेळ मोदींवरही येणार आहे."

अमोल पाटील यांनी मात्र व्यक्त होताना माध्यमांवर आरोप केला आहे. पाटील म्हणतात, "मोदींच्या भीतीमुळे आणि पैसे मिळाल्यामुळे मीडिया अण्णांपासून दूर आहे. अण्णा मीडियाला पैसे देऊ शकत नाहीत. मागच्या वेळी आरएसएस आणि भाजपनं त्यांना रसद पुरवली होती. मीडिया प्रसिद्धी देत नसल्याने अण्णांच्या आंदोलनाला गर्दी कमी आहे."

तर, "गेली 4 वर्षे लोक अण्णा हजारेंना झोपेतून उठवत होते. पण, अण्णा काही उठायला तयार नव्हते." असं विकास सोलनकर यांचं म्हणणं आहे.

बाबू डिसूझा म्हणतात, "केवळ आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी म्हणून त्यांचा हा सारा खटाटोप आहे. चार वर्षे झाल्यानंतर त्यांना या सरकारबद्दल संवेदनहीनत असल्याचा साक्षात्कार झाला आहे."

अण्णा हजारेंच्या आंदोलनाबद्दल महेंद्र कदम म्हणतात, "अण्णा हजारे सरकारचाच पत्ता आहे आणि हा पत्ता तेव्हाच खेळला जातो, जेव्हा सरकारवर प्रश्न वाढत जातात. शेतकरी मोर्चाच्या वेळी ते कुठे होते? तामिळनाडूचे शेतकरी दिल्लीत आंदोलन करत होते तेव्ही कुठे गेले होते अण्णा?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)