You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्णा हजारे आता मोदींविरुद्ध आंदोलन करण्याच्या पवित्र्यात
ज्येष्ठ समाजसेवक आणि गांधीवादी अण्णा हजारे पुन्हा लोकपालच्या विषयावरून आंदोलन करणार आहेत. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अण्णांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.
२०११ साली 'लोकपाल विधेयका'च्या लढाईसाठी देशभर आंदोलन छेडणारे अण्णा हजारे गेली चार वर्षं शांत होते.
तीन वर्षं वाट पाहिली पण हे सरकार भीतीने घाबरून 'लोकपाल' नियुक्त करत नाही, असा आरोप करत अण्णांनी 'भाजपा' सरकारविरुद्ध आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
लोकायुक्तांना कमजोर केलं
"या नरेंद्र मोदी सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करू. जनतेच्याही अपेक्षा होत्या. पण गेल्या तीन वर्षांत नरेंद्र मोदी सरकारनंही लोकपाल, लोकायुक्त यांना कमजोर केलं," अण्णा हजारे या मुलाखतीत म्हणाले.
पण या सर्व काळात अण्णा हजारे शांत का होते? काहीही का बोलत नव्हते?
"त्याचं कारण आहे. जे सरकार सत्तेवर येतं, त्याला थोडा वेळ तर दिला पाहिजे. काँग्रेस अनेक वर्षं सत्तेत होती, त्यांचं सरकार होतं. म्हणून ते आंदोलन सुरु ठेवलं होतं."
आपलं असमाधान व्यक्त करत अण्णा पुढे म्हणाले, "भाजपा सत्तेत आल्यावर थोडा वेळ द्यायला हवा होता. आल्याबरोबर लगेच आंदोलन सुरू केलं असतं तर लोकांना पटलं नसतं. म्हणून तीन वर्षं मी थांबलो. पत्रव्यवहार चालू राहिला. पण तीन वर्षांनंतर हे दिसलं की हे काही करत नाहीत. तेव्हा आंदोलन करायचं ठरवलं."
मे २०१४ भाजपा सरकार सत्तेत आल्यावर अण्णांनी नरेंद्र मोदी चांगलं काम करतील, अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली होती. पण मोदी आता आपल्या पत्राला उत्तरही देत नसल्याची तक्रार त्यांनी या मुलाखतीत केली.
नोटबंदीचा राजकीय स्टंट
"आत्तापर्यंत नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर तीस पेक्षा जास्त पत्रं लिहिली आहेत. एकाही पत्राला उत्तर नाही. फक्त पोचपावती येते," अण्णा हजारे म्हणाले.
पंतप्रधान मोदींना त्यांनी आता आंदोलनाचा इशारा देत निर्वाणीचं पत्र लिहिलं आहे. येत्या ७ आणि ८ ऑक्टोबरला अण्णा देशभरातल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक करणार आहेत.
त्यानंतर दिल्लीतल्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. अण्णांनी काळ्या पैशाविरुद्ध मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचीही खिल्ली उडवली आहे.
"डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला. काळा पैसा बाहेर येण्यासाठी नोटाबंदीचा कार्यक्रम केला. सारा देश रांगेत उभा राहिला. सगळ्यांनी एवढा त्रास सहन केला. काहींचा त्यात जीवही गेला. मलाही वाटलं होतं की आता काळा पैसा बाहेर येईल."
"शेवटी रिझर्व्ह बँकेनं जेव्हा आकडेवारी जाहीर केली, तेव्हा समजलं की, ९९ टक्के पैसा बँकांमध्ये जमाही झाला. मग तो काळा पैसा गेला कुठं? हा सगळा राजकीय स्टंट होता."
'फडणवीसांचं काम उत्तम'
एकीकडे नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या अण्णा हजारेंनी या मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मात्र कौतुक केलं आहे.
"मला नरेंद्र मोदींपेक्षा फडणवीसांचं काम एक पाऊल पुढे वाटतं. त्याचं कारण ते नॉन-करप्ट आहेत. दुसरं, नरेंद्र मोदी नुसतं सत्ता, पार्टी यांच्यात अडकले आहेत. फडणवीसांमध्ये पण ते आहे. तरी ते योग्य तेच करतात. मी काही त्यांच्याकडे काही जात नाही. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे."
पण त्याच वेळेस अण्णा हजारेंनी फ़डणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
"फडणवीसांचं नाव अशा आरोपांमध्ये येत नाही, हे मला चांगलं वाटतं. पण मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी आहे हे मानावं लागेल.
"पूर्वी सहा मंत्र्यांविरुद्ध माझ्याकडे पुरावे आले होते, ते मी तेव्हाच्या सरकारसमोर ठेवले होते. पण आता एकानंही माझ्याकडे कोणते पुरावे आणले नाहीत. पुरावे नसतील तर मी काय बोलणार?" अण्णा हजारेंनी त्यांची भूमिका मांडली.
भ्रष्टाचाराच्या आंदोलनासोबतच अण्णांनी अनेक मुद्द्यांवर या मुलाखतीत भाष्य केलं. गोमांस बंदी आणि त्यानंतर घडलेल्या हिंसक घटनांवर बोलतांना त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
"जर पंतप्रधानांना हे चूक वाटतं तर कारवाई का नाही करत? पंतप्रधान आहात ना ते देशाचे? मग अॅक्शन का घेत नाहीत? ती अॅक्शन घेत नाहीत याचा अर्थ हा आहे का ही आपली माणसं आहेत.... म्हणून जाऊ द्या?"
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)