मासिक पाळी : सर्वांत पवित्र काय असेल तर ती पाळी... #पाळीविषयीबोलूया

    • Author, किरण देशमुख
    • Role, सेक्स वर्कर आणि सामाजिक कार्यकर्त्या

देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे पाळीचे दिवस कसे असतील? नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स हे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या हक्कांसाठी काम करणारं नेटवर्क आहे. देशातल्या 50 हजार सेक्स वर्कर्स या नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत. या संस्थेच्या कामासाठी सध्या दिल्लीत आलेल्या किरण देशमुख यांनी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधीप्राजक्ता धुळप यांना सांगिलेले अनुभव.... हे अनुभव नावानिशी लिहू शकता असंही त्यांनी बीबीसीला सांगितलं.

मी अजूनही सेक्स वर्कर म्हणून काम करते. आता परिस्थिती बरी आहे, पण पूर्वी पाळीबद्दल खूपच अज्ञान होतं आणि दुसरीकडे या धंद्यात खूप शोषण होतं ते वेगळंच. स्वत:च्या शरीराकडे माणूस म्हणून बघायला आम्ही शिकलो, तेही खूप उशीरा....

मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा माझं वय होतं जवळपास दहा वर्षं. आमचं एकत्र कुटुंब. घरात सतत लोकांचा राबता असायचा. त्या दिवशी पडवीमध्ये सगळे पुरुष होते. माझ्या मागे रक्ताचा डाग लागलेला मला माहितही नव्हता. दादांनी वहिनीला बोलवून सांगितलं, 'बघ हिच्या कपड्यांना खेळताना काहीतरी लागलंय.'

मला काहीच कल्पना नव्हती. मग वहिनीने कपडे बदलून घ्यायला सांगितले. शिवाशिवीचे आणि बाजूला बसण्यासाठीचे नियम समजावून सांगितले. आता शहाणी झालीस असंही बजावून सांगितलं.

मध्ये काही वर्षं निघून गेली. वयाच्या सोळाव्या वर्षी परिस्थितीच अशी उभी राहिली की पुण्यात येऊन धंदा करायला लागले. तेव्हा तर काहीच कळत नव्हतं. सेक्सवर्क हा शब्दही नव्हता तेव्हा. आतासारखी हक्कांची जाणीव नव्हती. माझी पहिली घरवाली तिच्याकडल्या मुलींना, बायांना खूप त्रास द्यायची. कामासाठी पाळीचा दिवसही चुकत नव्हता. तिथून पळून जायची इच्छा व्हायची.

सांगली-मिरजच्या धंदा करणाऱ्या वस्तीचं नाव एका मैत्रिणीकडून ऐकलं होतं. मग एक दिवस पळालेच. कोणी शहरात बघेल या भीतीने दिवसभर एका सार्वजनिक शौचालयात लपून बसले होते. रात्री महालक्ष्मी एक्सप्रेसने सांगली गाठलं. त्या नवख्या शहराची भीती वाटत होती. पण कशीबशी पहाटे सांगलीच्या वस्तीत पोहोचले. जिथे थांबले होते त्या कट्ट्याजवळ एक घरवाली होती. तिने विचारपूस केली.

पाळीची सुट्टी

वेश्यावस्तीत घरवाली म्हणजे तिथल्या धंद्याची मालकीण. तिच्या घरात राहणाऱ्या मुलींचा ती सांभाळ करते. त्या घरवालीने माझी विचारपूस केली. दोन दिवस धड जेवले नव्हते. चांगलं खाऊ-पिऊ घातलं. इतकं प्रेमाने आतापर्यंत कोणीच मायेने विचारपूस केली नव्हती. त्या दिवशी मला कळलं, आईची माया काय असते ते.

मी तिला विचारलं, 'तुला काय म्हणू?' ती कानडी होती. म्हणाली, 'अव्वा म्हण'. अव्वा म्हणजे आई. मी तिच्याकडे काम करू लागले. घरवाली कसलीच जबरदस्ती करत नव्हती.

#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतला हा लेख आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या लेखमालेचा उद्देश आहे.

एक दिवस तिने मला विचारलं, 'काय ग, तुला पाळी येते की नाही? तू कधीच सुट्टी घेत नाहीस?'

खरंच होतं. पाळीच्या दिवसांत कधी सुट्टी घ्यायची असते हे आधीच्या घरमालकिणीने कधी सांगितलंही नव्हतं. माझ्यासारख्या बाईकडून पैसा मात्र ओरबाडून घेतला होता. या नव्या घरवालीचं तसं नव्हतं. ती म्हणायची या दिवसांत सुट्टी घेऊन आराम केलास करी चालेल.

तेव्हा माझ्यासारख्या सेक्सवर्करचा पोषाख म्हणजे चोळी-परकर. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मध्ये परकर धरावा लागायचा. म्हणजे कापडाची घडी करुन कंबरेभोवती दोरी बांधायची ही पद्धत होती. कापड चालताना घासलं जायचं त्यामुळे त्वचा अक्षरश: सोलून जायची. म्हणून आम्ही बाया तेव्हा परकरच गुंडाळून खाली धरायचो. मग रक्ताने खराब झालेला परकर धुवून टाकायचा.

गुंडांची दहशत

पाळीबद्दल तेव्हा खूपच अज्ञान होतं आणि दुसरीकडे या धंद्यात खूप शोषण होतं ते वेगळंच. 90-91 साल असेल. तेव्हा मिरजच्या वेश्यावस्तीत गुंडांचा धुडगूस असायचा. बायांना बळजबरी करायचे.

एखाद्या बाईने नकार दिला आणि पाळी असल्याचं कारण पुढे केलं तर ते गुंड कंदिलाच्या उजेडात अक्षरशः परकर वर करून पाहायचे. सेक्सवर्कर बायकांमध्ये त्यांची दहशत असायची.

नंतर 92ला एचआयव्ही प्रबोधनाच्या निमित्ताने मिरज आणि सांगलीच्या वस्तीत काम करणाऱ्या संग्राम या संस्थेशी ओळख झाली. तोपर्यंत वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना आपलंही आरोग्य असतं याविषयी काही माहितीच नव्हती.

कंडोमइतकं पाळीबद्दल बोलणं नव्हतं

एचआयव्ही आणि एड्सविरोधी मोहिम नुकतीच सुरु झाली होती. धंदा करणाऱ्या बायका हळूहळू गिऱ्हाईकाकडे कंडोमचा आग्रह धरायला लागल्या होत्या. पण जितकं एचआयव्हीच्या निमित्ताने कंडोमबद्दल बोलणं होत होतं तितकं मासिक पाळीबद्दल होत नव्हतं. त्यावर आरोग्याच्या निमित्तानेही कधी चर्चा झाली नव्हती.

मला आठवतंय, संग्राम संस्थेच्या मीना शेषू यांच्यासोबत माझी सहकारी मैत्रीण एकदा कार्यक्रमाला गेली होती. तिथे तिला पाळी आली. पण परकर खराब होईल याची भीती होती. हे तिनं मीनाताईला सांगितलं. तोपर्यंत त्यांनाही पाळीच्या दिवसात आम्ही काय करतो याची कल्पना नसल्याने धक्काच बसला.

मग तिथून पुढे एचआयव्हीच्या जागृतीसोबतच आरोग्यासाठी पाळीची स्वच्छता कशी ठेवायची, सॅनिटरी पॅड कसं वापरायचं या विषयांवर आमचं प्रशिक्षण सुरू झालं. परकरावर अवलंबून असणाऱ्या तर कधी दोरी आणि कपडा वापरणाऱ्या बायका आता पॅडही वापरू लागल्या.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचेही प्रश्न असतात हे याविषयी जागृती होत होती. आम्हीही वस्तीच्या बाहेरचं जग पाहात होतो. संग्रामने 1997मध्ये महाराष्ट्रातील सांगली-सातारा-कोल्हापूर आणि कर्नाटकातील दोन अशा पाच जिल्ह्यात सेक्सवर्क करणाऱ्या स्त्रियांचा सर्व्हे केला. हे पाचही जिल्हे दोन राज्यांच्या सीमेवर होते. तेव्हा पाच हजारहून अधिक महिला या व्यवसायात होत्या. त्यांच्यापर्यंत कंडोमच्या वापराची जशी माहिती पोहोचत होती तशी आपणच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याचा प्रसारही सुरू होऊ लागला.

स्वतःच्या शरीराकडे माणूस म्हणून पाहिलं

संग्राम या संस्थेसोबत आम्ही धंदा म्हणजेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची एक संघटना उभी केली, वेश्या अन्याय मुक्ती परिषद (व्हम्प). देहविक्रय हा शब्द आम्ही वापरत नाही. कारण आम्ही फक्त सेक्स विकतो. शरीर नाही.

आज आमचं आरोग्य चांगलं असण्यामागे या संस्था-संघटनेचा भला मोठा पाठिंबा आहे. स्वत:च्या शरीराकडे माणूस म्हणून बघायला आम्ही शिकलो. फसवणूक, शोषणाच्या विरोधात बोलायला लागलो. वस्तीच्या बाहेरचं जग पाहू लागलो.

आता आम्ही 100 टक्के कंडोमचा वापर करतो. त्यामुळे रक्तातून संसर्ग होणारे आजार टळतात. इतर लैंगिक आजारही होत नाहीत.

मासिक पाळीत अस्पृश्यता नाही

आम्ही मासिक पाळीत अस्पृश्यता मानत नाही. पण चार दिवस आरामाचे म्हणून निवांत असतो. तुम्ही वस्तीत फिरलात आणि एखादी केसाला भरपूर तेल लावलेली सेक्सवर्कर दिसली की समजायचं, तिचे आरामाचे चार दिवस सुरु आहेत. आजही हेच चित्र दिसतं. त्या दिवसांमधला रोजगार बुडतो. पण आठवड्याला एक सुट्टी अशा महिन्याच्या या चार सुट्ट्या समजायच्या.

मानसिक किंवा भावनिक थकवा आम्हालाही जाणवतो. उदास चेहऱ्याने समोरून आलेली वस्तीतली बाई पाळी आली असेल हे ओळखून तिला आधार देतो. घरवालीच नाही तर वस्तीतल्या सेक्स वर्कर स्त्रियांमध्ये ऐकमेकींना मदत करण्याची सवय असते.

आमच्याकडे येणारे गिऱ्हाईकसुद्धा हल्ली पाळी असेल तर शक्यतो नाहीच म्हणतात. पण एकदा माझ्यासोबत घडलेल्या प्रसंगाने मला कोड्यात टाकलं. माझी पाळी सुरु झाली आहे, हे मलाही माहित नव्हतं. गिऱ्हाईकाला ते लक्षात आलं. तो संतापाने म्हणाला, 'पाळी आली ते आधी सांगायचं नाही? आमच्या घरात काय बायका नाहीत?' मला काही कळेचना.

मला सांगा, हा पुरुष इकडे येणार. स्वतःची भूक भागवणार. पण बायकोला पाळीत कोणीतरी जवळ हवं असेल, तिची लैंगिक गरज असेल तर काय... तर तिने कुठे जायचं?

काय समज असतात पुरुषांचे! पाळीसारख्या नैसर्गिक गोष्टीबद्दल पुरुषांच्या मनात खूप गैरसमज असतात. तीच मानसिकता सगळ्या समाजात पेरली गेली आहे. आपण म्हणतो, सगळं देवाने तयार केलंय. पाळी ही गोष्ट जर देवाने दिली आहे, तर मग त्या बाईने देवळात का नाही जायचं. मी देवळात जाते. जरा शांत वाटतं. मन हलकं वाटतं. पाळी असली तरी जाते. पाळीच्या विटाळाची मी चर्चा ऐकते तेव्हा वाटतं- देवाच्या जशा बायका हायत की नाई.. त्या देव्या पाळतात का? त्यांना बी पाळी येतंच असेल की. देवाच्या नावाखाली हे पवित्र ते अपवित्र कसं काय करता? सर्वांत पवित्र काय असेल तर ती पाळीच आहे.

(शब्दांकन - प्राजक्ता धुळप)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)