प्रेस रिव्ह्यू : राज ठाकरेंच्या घराबाहेर फेरीवाले ठाण मांडणार?

फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच आता फेरीवाले बसणार आहेत.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली आहे.

फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स धोरण तयार करण्यात आले असून त्यापैकी एक हॉकर्स झोन हा राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घराच्या मागच्या बाजूला असणार आहे.

नुकतंच न्यायालयाच्या निर्णयानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले आहेत.

दरम्यान मुंबई महापालिकेनं मुद्दाम राज ठाकरे यांच्या घराबाहेर फेरीवाल्यांना जागा दिल्याचा आरोपही मनसेनं केला आहे.

'महाराष्ट्राची क्षमता संपली'

महाराष्ट्रात व्यावसायिक गुंतवणुकीची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी भारतातील इतर राज्यांचा विचार करावा, असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत व्यक्त केलं आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यांची क्षमता संपली असल्यानं उद्योजकांनी देशाच्या इतर भागात गुंतवणूक करावी, त्यासाठी पश्चिम बंगाल हा उत्तम पर्याय आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

'भीमा-कोरेगावची दंगल सरकारविरोधातील षड्यंत्र'

भीमा कोरेगाव येथे घडलेला प्रकार हा सरकारविरोधातील षड्यंत्र असल्याचं, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दैनिक सकाळने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

भीमा कोरेगावसारख्या घटना आगामी काळात पुन्हा घडतील असंही त्यांनी म्हटलं आहे. सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे घडत असून विकासकामांच्या गतीनं अस्वस्थ झालेली मंडळी यामागे आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजपच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशी कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने फडणवीस संवाद साधत होते.

राष्ट्रवादीनंच भिडे यांना मोठं केलं : दलवाई

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल असलेले संभाजी भिडे यांना आर.आर. पाटील आणि जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या दोन तत्कालीन गृहमंत्र्यांनीच मोठं केलं, असा आरोप काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. त्याचवेळी भिडे यांच्यासारख्यांना राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांनी पाठीशी घातले होते, अशी टीका दलवाई यांनी केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दलवाई यांचे आरोप फेटाळले आहेत.

असरचा धक्कादायक निष्कर्ष

देशभरातील 14 ते 18 वयोगटातील 25 टक्के विद्यार्थ्यी इयत्ता दुसरीच्या स्तरावरचे त्यांच्या भाषेतील वाचन करू शकत नाहीत, असा निष्कर्ष 'अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट 2017' (असर)मध्ये काढण्यात आला आहे.

मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. असरनं देशातल्या 24 राज्यांमधल्या प्रत्येकी दोन शहरांमध्ये 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले.

या संदर्भात 'द इंडियन एक्सप्रेस'नं बातमी दिली आहे. 40 टक्के मुलांना इंग्रजीचे वाचन करता आले नाही. तसंच 57 टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या स्तरावरचे गणितही सोडवता येत नाही, असं यात म्हटलं आहे. हीच स्थिती सामान्य ज्ञान या विषयाबद्दल आहे.

आठवी ते बारावीच्या वर्गांतील 36 टक्के विद्यार्थ्यांना देशाची राजधानी सागंता आली नाही शिवाय भारताचा नकाशाही ओळखता आला नाही, असं या अहवालात म्हटलं आहे.

महाराष्ट्र क्षयरोगाच्या विळख्यात

क्षयरोगाचा (टीबी) प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून, देशात प्रत्येक वर्षी 29 लाख जणांना नव्याने या संसर्गजन्य रोगाची लागण होत आहे. लोकत्तानं ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी दोन लाख नव्या क्षयरोग रुग्णांची नोंद झाली असून त्यातील एक हजार रुग्णांना पुरेसा उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे धक्कायदायक वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आलं आहे.

महाराष्ट्रात सापडलेल्या क्षयरोगाच्या रुग्णांपैकी 66 टक्के क्षयरोगाचे रुग्ण हे एकट्या मुंबई शहरातील आहेत, असं हा बातमीमध्ये म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)