You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : 'जिग्नेश यांच्या राजकारणात दलित पँथरचं प्रतिबिंब'
- Author, बद्री नारायण
- Role, समाजशास्त्रज्ञ
जिग्नेश मेवाणी दलितांचे नवीन नेते म्हणून उदयास येत आहेत. आक्रमक आणि प्रभावी असं दलित नेतृत्व म्हणून जिग्नेश यांच्याकडे सध्या पाहिलं जात आहे.
गुजरातमध्ये दलितांना पारंपरिक कामांसाठी बाध्य करणं तसंच त्याद्वारे दलितांचं दमन करणं, या सवर्ण जातींच्या प्रयत्नांना प्रतिक्रिया म्हणून जिग्नेश हीरोच्या रूपात समोर आले आहेत.
काँग्रेसच्या पाठिंब्यानं गुजरातच्या निवडणुकीत नुकताच त्यांनी विजय मिळवला आहे.
दलितांच्या समृद्धीसाठी देशात सुरू असलेली अनेक आंदोलनं आणि संघर्ष यांचाच एक भाग म्हणजे जिग्नेश मेवाणी यांचं राजकारण आहे.
पण प्रश्न हा आहे की, जिग्नेश कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहेत? त्यांच्या राजकारणाचं स्वरूप नेमकं काय आहे?
जिग्नेश यांच्या राजकारणात काहीही नवीन नाही
जिग्नेश यांची देहबोली, राजकीय संवाद आणि राजकीय बांधिलकी यांचा बारकाईनं अभ्यास केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं.
जिग्नेश यांच्यामुळे दलित राजकारणाच्या नवीन रूपाची चर्चा होत असली तरी मला यात काहीही नवीन वाटत नाही.
1970-80च्या दशकातील महाराष्ट्राच्या दलित राजकारणाचं नवा अविष्कार म्हणजे जिग्नेश यांचं राजकारण आहे, असं मला वाटतं.
महाराष्ट्रात त्याकाळी समोर आलेल्या दलित पँथरच्या राजकारणाचं प्रतिबिंब तुम्हाला जिग्नेशच्या राजकारणात दिसून येईल.
त्यावेळी दलित अस्मिता आणि मार्क्सवादी अस्मिता यांच्या एकत्रीकरणातून महाराष्ट्रात दलित रजकारणाचं वेगळं स्वरूप समोर आलं होतं.
जिग्नेश यांच्यामध्ये सुद्धा दलित अस्मिता आणि मार्क्सवादी अस्मिता यांचं एकत्रीकरण असलेलं दिसून येतं.
जिग्नेश यांची आक्रमकता काम करेल?
जिग्नेश यांच्यातील आक्रमकता दलित पँथरच्या आक्रमक स्वरूपाशी मिळतीजुळती आहे. त्याच प्रकारची भाषा, त्याच प्रकारचे प्रश्न जिग्नेश यांच्या राजकारणात दिसून येतात.
दलितांना सन्मानाची वागणूक, सन्मानपूर्वक कामं आणि दलितांच्या जमिनीचे प्रश्न जिग्नेश यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे.
जिग्नेश यांच्या देहबोलीचा सुक्ष्मपणे अभ्यास केला तर तीसुद्धा दलित पँथरच्या नेत्यांप्रमाणे आक्रमक असलेली दिसून येते.
जिग्नेश यांच्या व्यक्तिमत्वात आणि भाषेत एक प्रकारची आक्रमकता दिसून येते.
या प्रकारच्या दलित राजकारणाच्या परंपरेची सुरुवात महाराष्ट्रापासून होते. ही परंपरा कांशीराम आणि मायावती यांच्या बहुजन राजकारणापासून वेगळी आहे.
कांशीराम यांनी आपल्या बहुजन राजकारणात स्थानिकतेला महत्त्व दिलं. त्यांनी स्वत:च्या भाषेत आणि बोलीत अशी आक्रमकता विकसित केली, ज्याद्वारे एक दूरवरचं ध्येय त्यांना गाठायचं होतं, असं दिसून येत होतं.
मायावतींची भाषा तसंच देहबोलीमध्ये आक्रमकतेसोबतच धैर्य आणि दूरदर्शीपणा दिसून येतो. जिग्नेश यांच्यामध्ये मात्र याचा अभाव असलेला दिसून येतो.
सर्वसमावेशक समाज बनवण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतावर मायावती आणि कांशीराम यांचं राजकारण आधारित होतं. हाच सिद्धांत त्यांच्या राजकारणाची दिशा ठरवत असे.
दूरदर्शीपणाचा अभाव
जिग्नेश यांचं राजकारण आणि राजकीय भाषेत मात्र कोणत्याही प्रकारे भविष्यातील राजकारणाचा विचार दिसून येत नाही.
जिग्नेश यांचा मार्क्सवादाचा चांगला अभ्यास असता तर भविष्यातील समाज घडवण्याचं ध्येय त्यांच्यात स्पष्टपणे दिसलं असतं.
कारण मार्क्सवादात भविष्यातील राजकारणाचं प्रतिबिंब दिसून येतं.
आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांसोबतच मायावतींचं राजकारण दलितांची अस्मिता आणि संस्कृती यांना जोडण्याचं काम करतं.
हीच बाब उत्तर भारतीय समाजात दलितांसोबतच्या बांधिलकीसाठी अनुकूल ठरली आहे.
पण जिग्नेश वापरत असलेल्या राजकीय भाषेचा अयशस्वीपणा आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा पाहिला आहे.
अशात जिग्नेश यांच्या राजकीय भाषेला मध्य आणि उत्तर भारतातल्या दलित समाजात व्यापक स्वीकृती मिळेल, असं म्हणणं अवघड आहे.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)