मुंबईतल्या आगींसाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणारच! : आयुक्त अजॉय मेहता

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईत गेल्या महिन्यात दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. त्यानंतर महापालिकेवर, प्रशासनावर टीका होत आहे. पण प्रशासनाची बाजू काय? अशा दुर्घटनांना आळा घालण्यासाठी त्यांच्या हातात किती असतं? बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधून महापालिकेची बाजू जाणून घेतली.

गेल्या महिन्यात मुंबईत दोन ठिकाणी मोठी आग लागली. या दुर्घटनांसाठी जबाबदार कोण?

दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आग लागली. दुर्देवाने दोन्ही ठिकाणी अनेकांचा जीव गेला. या दोन्ही घटनांबाबत आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. साकीनाक्यातील आगीबाबत चौकशी अंतिम टप्प्यात असून त्याचा अहवाल एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे. कमला मिलमध्ये जी आग लागली त्याच्यासंदर्भात दोन स्वतंत्र चौकशी होत आहेत.

एक तर माझ्या अध्यक्षतेखाली चालू आहे. नेमकं आगीचं कारण काय होतं आणि अजून पुढे काय काय केलं पाहिजे? तसंच या आगीला जबाबदार कोण आहेत? यांचे चौकशी अहवाल येतीलच. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. शासन कारवाईवर ठाम आहे.

मुंबईत कुठलीही दुर्घटना झाली की शासन आणि राजकारणी यांच्यात जबाबदारीबाबत टोलवाटोलवी सुरू होते, असा आरोप अनेकदा होतो.

मुंबईमध्ये तसा प्रश्न नाही, कोणी कोणती जबाबदारी घ्यावी हे स्पष्ट आहे. आणि चौकशी सुरू आहे ती हेच शोधण्यासाठी की नेमकी कोणाची जबाबदारी होती, आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळं हे घडलं.

यात टोलवाटोलवीचा प्रश्न नाही.

पण एक 'प्रोफेशनल कंप्लेनंट्स'चा वर्ग आहे. मुंबईत अशा काही 'कंप्लेनंट्स' आणि आमच्या काही अधिकाऱ्यांमध्ये लागेबांधे आहेत. एखादा टक्का तरी असे अधिकारी प्रत्येक ठिकाणी असतात.

महापालिकेतले अधिकारी म्हणजे भ्रष्ट, असं समीकरण सर्वसामान्यांच्या मनात तयार झालं आहे.

अधिकारी असो वा इतर कुठलाही वर्ग असो, एक दोन टक्के लोक असतात जे नियमांचे पालन करत नाहीत. ट्रॅफिक सिग्नलवर ९५ टक्के लोक थांबतात, काही जण सिग्नल तोडतात. त्यासाठी आपला कायदा आहे, दंड आहे. जे नियम पाळत नाही, त्यांच्यावर कारवाई करावी लागेल.

'प्रोफेशनल कंप्लेनंट्स' म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?

प्रोफेशनल कंप्लेनंट्स असे आहेत जे प्रत्येक गोष्टीत स्वतःचं हित साध्य करून घ्यायचं म्हणून हात घालतात. त्यांच्या अपेक्षा असतात, आणि त्या पूर्ण झाल्यावर ते मागे हटतात. हा प्रकार आता सुरू झाला आहे.

या घटनांना कोणता अधिकारी जबाबदार आहे, हे नक्कीच आमच्या चौकशीतून बाहेर येईल. आणि यात कंप्लेनंट्सचा हस्तक्षेप किती आहे, यावर सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत.

अधिकाऱ्यांवर कारवाई होईलच, ती नेहमीच होते. पण परिस्थिती पुन्हा जैसे थे असते, ती बदलत नाही, असा आरोपही होतो.

असं म्हणता येणार नाही. कुठलीही घटना घडली तर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे पुढे काय करायचं हे आपण शिकतो, त्याप्रमाणे बदल आणतो. आणि प्रत्येक वेळेला मुंबईत जेव्हा जेव्हा काही दुर्दैवी घटना घडली, त्यानंतर बऱ्याचशा सुधारणा झाल्या सिस्टिममध्ये.

दुसरा भाग असतो नेमका जबाबदार कोण आणि त्याच्यावर कारवाईचा. प्रत्येक वेळी जो जबाबदार असतो त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता जे मुंबई दहा वर्षांपूर्वी होती आणि आजची मुंबई याच्यात खूप फरक आहे.

मुंबई बदलली आहे, शहराचा पसारा वाढला आहे, हे कबूल आहे. पण त्यामुळं प्रशासनाचं शहराकडे दुर्लक्ष होतंय का?

मुंबई एक अतिशय दाट वस्तीचं शहर आहे, त्यामुळं इथं वेगळी आव्हानं आहेत. दाट वस्ती असल्यानं आगीचे बंब वेळेवर पोहोचणं हे आव्हान असतं. गर्दीतून मार्ग काढून आगीपर्यंत पोहोचणे, त्यातून लोकांना बाहेर काढणे अशी आव्हानं आग लागल्यावर समोर असतात. दुसरं म्हणजे सिस्टिम्स. आग लागू नये यासाठी ज्या सिस्टिम्स आपण बसवतो, ते कसं असावं हेसुद्धा मोठं आव्हान आहे.

शेवटी इतक्या मोठ्या शहरावर नियंत्रण ठेवणं, कोण कायदा पाळतो, कोण बेकायदेशीर कामं करतो यावर नियंत्रण ठेवणं हेच एक आव्हान आहे.

मग महापालिका यात काही बदल करणार का?

अग्निशमन विभागात आम्ही काही बदल करत आहोत. अग्निसुरक्षेची मान्यता देणारा विभाग आणि आगीशी लढणारा विभाग हे आता वेगवेगळे केले जातील. फायर कंप्लायन्स विभागाचं काम हेच असणार की फायरची परवानगी, NOC देणं, त्याची तपासणी करणं याची स्वतंत्र यंत्रणा आपण मुंबई शहरासाठी करत आहोत.

फक्त कारवाई नाही, तर सिस्टिममध्ये बदल आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

मुंबईत गेल्या काही काळात ज्या दुर्घटना घडल्या, त्या पार्श्वभूमीवर एक असं चित्र दिसतं की आयुक्त अजॉय मेहता काही बोलत नाहीत. पत्रकारांचीही तक्रार असते, की तुम्ही प्रसिद्धीपत्रक काढता पण थेट संवाद फारसा साधत नाही. प्रशासनानं आणखी संवाद साधण्याची गरज आहे का?

माझं म्हणणं हेच आहे बोलण्यापेक्षा करून दाखवणं आवश्यक आहे. मी इथे आलो, तेव्हा आधी काळबादेवीला मोठी आग लागली, आमचे चीफ फायर ऑफिसर त्यात मृत्यूमुखी पडले. त्यानंतर आम्ही अग्निशमन विभाग आणखी भक्कम केला.

आज मला गर्व वाटतो, की मुंबईचा अग्निशमन विभाग देशात सर्वोत्तम आणि अद्ययावत आहे. त्यांच्याकडे अतिशय आधुनिक यंत्रणा आणि प्रशिक्षण आहे. प्रशासनानं बोलण्यापेक्षा काम करून दाखवावं.

दुसरीकडे सर्वसामान्यांकडून तुम्ही काय अपेक्षा व्यक्त कराल? 

सर्वसामान्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या मालकीचं आवार आहे, तो तुमचा बिझनेस आहे. त्यात तुम्ही बसता, तुमचे कुटुंबीय बसतात. तुमचे कर्मचारी बसतात. तुमचे ग्राहक येतात.

त्याची सुरक्षा सर्वांत पहिली जबाबदारी तुमची आहे. कारण तिथे काही झालं तर सर्वांत आधी तुमचं नुकसान होणार आहे, तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे. माझी एकच विनंती आहे, आगीच्या बाबतीत गंभीर राहा, योग्य काळजी घ्या.

मुंबईचे आयुक्त म्हणून तुमच्यावरही कारवाईची मागणी काही गटांतून होते आहे.

हा प्रश्न मुंबईचा नाही, सगळीकडेच आहे. कुठल्या समस्येवर उपाय शोधण्यापेक्षा लोक अशी चर्चा करून प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करतात. आपलं काम करत राहणं, एक चांगली व्यवस्था उभी करणं यावरच माझा भर आहे. आपलं कामच कसं उत्तर देईल याकडे लक्ष देणं, हे सर्वांत महत्त्वाचं आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)