मुंबईत आगीचं तांडव : 12 जणांचा मृत्यू

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मुंबईतील साकीनाका परिसरातील खैराणी रोडवरच्या एका फरसाण फॅक्टरीला लागलेल्या आगीत बारा जणांचा मृत्यू झाला आहे.

साकीनाका मेट्रो स्टेशनजवळच्या माखरिया कंपाऊंड परिसरातील 'भानू फरसाण' या फॅक्टरी पहाटे आग लागली. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

घटनास्थळी अडकलेल्या 12 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं.

थेट ग्राउंड झिरोवरून बीबीसी प्रतिनिधी जान्हवी मुळे

सोमवारी पहाटे 4.17 ला अग्निशमन दलाला या दुर्घटनेची माहिती देणारा फोन आला. 4.34 वाजता अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि 4 जंबो टँकर्स यांच्यासह अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या.

फॅक्टरीतल्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागली तेव्हा तिथं अन्नपदार्थाच्या मोठ्या साठ्यासह फर्निचर आणि इतर वस्तू होत्या.

60 फूट X 30 फुटांच्या या कंपाउंडचा पोटमाळा आणि छत आगीमुळे कोसळलं आहे.

"आग लागली तेव्हा कंपाउंडमध्ये 10 ते 15 जण होते. यापैकी 12 जण दुकानात आग आणि धूर कोंडल्यानं पोटमाळ्यावर अडकले. परिणामी त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीमुळे दुकानाचा पोटमाळा कोसळला आहे," अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या 2 वर्षांपासून भानू फरसाण ही फॅक्टरी तिथं सुरू असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

रविवारचा दिवस असल्यानं काम बंद होतं, त्यामुळे विद्युत यंत्रणेतल्या बिघाडामुळेच ही आग लागली असल्याचा स्थानिकांचा अंदाज आहे.

आग लागल्याचं सुरुवातीला कुणाच्याच लक्षात आलं नाही, त्यामुळे लोकांना बाहेर पडण्यासाठी उशीर झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी बीबीसी मराठीशी बोलतांना सांगितलं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)