You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेस रिव्ह्यू - भारतात राहणारे मुस्लीम हे हिंदूच : सरसंघचालक मोहन भागवत
"सर्व प्रकारच्या समुदायांना सामावून घेणं म्हणजेच हिंदुत्व असून भारतात राहणारे मुस्लीम देखील हिंदूच आहेत," असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी आगारतळा इथं केलं.
महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, "भारत ही हिंदूंची भूमी आहे. जगभरातील विविध देशांत छळवादाचा सामना करावा लागलेले असंख्य हिंदू भारतात आले आणि येथे त्यांना आश्रय मिळाला. भारतातील मुस्लीम हे त्या अर्थाने हिंदूच आहेत. सत्य या मूल्यावर हिंदूंची श्रद्धा आहे. मात्र जगात मान आहे तो ताकदीला आणि ताकद ही संघटनेत असते."
ईशान्य भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी भागवत पाच दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर आले आहेत.
2. कट्टरतावाद्यांच्या कुटुंबीयांना पासपोर्टसाठी अडचणी नाहीत
काश्मीरच्या कट्टरतावाद्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या तरुणाला पासपोर्टची आवश्यकता असेल तर त्यांना पासपोर्ट देण्यात यावा, असे आर्देश केंद्र शासनाने जम्मू-काश्मीर सरकारला दिले आहेत.
कट्टरतावाद्यांवर गुन्हा दाखल असूनही त्यांच्या कुटुंबीयांना जर पासपोर्ट हवा असेल तर तो देताना अडचणी आणल्या जाऊ नयेत, असे केंद्र सरकारचं म्हणणं असल्याचे हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात आहे.
3. राहुल गांधींविरुद्धची नोटीस मागे
निवडणूक आयोगानं काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना बजावलेली कारणे-दाखवा नोटीस मागे घेतली आहे.
गुजरात निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर गांधी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे निवडणूक आयोगानं त्यांना आचारसंहिताभंगाची नोटीस बजावली होती.
निवडणूक आयोग अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याच्या 126व्या कलमाचा अभ्यास करणार असून, त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. कारण, याच कलमांतर्गत गांधी यांना नोटीस बजावण्यात आली होती.
त्यानंतरच अशा प्रकरणांमध्ये कारवाईचा विचार केला जाणार असल्याचं वृत्त द हिंदू वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं आहे.
4. रेगारला पाहिजे होता हाफिज सईद
लव्ह जिहादचा आरोप करत पश्चिम बंगालहून स्थलांतरीत झालेल्या अफराजुल नावाच्या मुस्लीम कामगाराची निर्घुण हत्या करणाऱ्या शंभुलाल रेगार यानं राजस्थान पोलिसांना एक कबुली दिली आहे.
"मी जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईदचे भारतविरोधी वक्तव्यांचे व्हीडिओ नेहमी बघायचो. त्यामुळेच मला हाफीजला ठार करायचं होतं," असं त्यानं सांगितल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
5. 'पारले'ची बिस्किटं महागणार
अत्यंत स्वस्तात उपलब्ध होणारी पारले कंपनीची बिस्किटं नव्या वर्षापासून महागणार आहेत. ग्लुकोज, मारी आणि मिल्क बिस्किटांची किंमत चार ते पाच टक्के वाढणार आहे.
महाराष्ट्र टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीचे उत्पादन कॅटॅगरी प्रमुख मयंक शहा यांनी सांगितलं की, "किती किंमत वाढवली जाईल, याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु कर वाढल्यामुळे नजीकच्या काळात भाववाढ करावी लागणार आहे. अशी भाववाढ करताना ती किलोमागे १०० रुपयांपेक्षाही कमी असणार आहे."
आणखी वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)