गुजरात निवडणुकीच्या निकालांवर का आहे चीनची करडी नजर?

ज्या गुजरातनं नरेंद्र मोदींना जगभरात पोहोचवलं, त्याच गुजरातच्या सिंहासनावर आता कोण बसणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.

सोमवारी दुपारून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट होईल.

गुजरातच्या निकालांकडे फक्त भारतातच लक्ष नाही तर शेजारील देशसुद्धा या निकालांवर लक्ष ठेवून आहेत.

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला असला, तरी गुजरातच्या निकालांबद्दल चीन खूपच उत्सुकता दाखवत आहे.

चीनचा एवढा इंटरेस्ट का?

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'मध्ये गुरूवारी आलेला लेख याच बाबीकडे लक्ष वेधतो.

"भारताच्या गुजरात राज्यात गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं. सोमवारी येणाऱ्या त्याच्या निकालांवर चीनमधले अनेक अभ्यासक नजर ठेवून आहेत."

"गुजरात निवडणूक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याची परीक्षा असणार आहे. तसंच भारतासोबत वाढत्या राजकीय सलगीमुळे या निवडणुकीचे निकाल चीनसाठी चिंतेचा विषय आहे."

असे मुद्दे ग्लोबल टाइम्सच्या एका लेखात मांडण्यात आले आहेत.

"मोदींच्या भारतीय जनता पक्षानं गुजरात निवडणुकीत पराभवापासून वाचण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न केले आहेत. 2014 साली पंतप्रधान बनण्याआधी नरेंद्र मोदी गुजरातचे 13 वर्षं मुख्यमंत्री होते."

"जीएसटीसारखी आर्थिक सुधारणा आणि 'मेक इन इंडिया'सारखी मोहीम म्हणजे मोदींच्या गुजरात विकास मॉडेलला देशभरात पोहोचवण्याचा प्रयत्न होता, असं म्हटलं जातं."

"असं असलं तरी, मोदींच्या या मॉडेलवर विरोधी पक्षांनी आणि अर्थशास्त्रज्ञांनी बरीच टीका केली. पण मोदींच्या या मॉडेलची समीक्षा गुजरातची जनता कशी करते याकडे सर्वांच लक्ष आहे."

चीनी कंपन्यांवरील परिणाम

या लेखात पुढे लिहिण्यात आलं आहे,

"निवडणुकीचा निकाल काहीही लागला, तरी मोदींच्या विकासच्या अजेंड्याबाबात इतर भागातल्या लोकांच्या मतावर याचा खूप परिणाम होणार आहे."

"सध्या चीनची भारतातली गुंतवणूक वाढली आहे. 2016 मध्ये त्यात 2015च्या तुलनेत नक्कीच वाढ झाली आहे. भारतातल्या आर्थिक सुधारणा देशात काम करणाऱ्या ओप्पो आणि शिओमी या कंपन्यांशी प्रत्यक्षरित्या संबंधित आहेत."

"गुजरात निवडणुकीत भाजपचा धमाकेदार विजय झाल्यास मोदी सरकार आर्थिक सुधारणांबद्दल अधिक आक्रमक होईल आणि भारतासोबतच चीनच्या कंपन्यांवरही याचा परिणाम जाणवेल."

भाजपचा पराभव झाला तर काय?

"पण गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाल्यास तो मोदींनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांसाठी मोठा झटका ठरेल."

"गुजरातमधल्या पराभवाचा परिणाम इतर राज्यांच्या मतदारांवरही होऊ शकतो. म्हणून यापेक्षा मोठ्या परिणामांपासून वाचण्यासाठी मोदींकडून आर्थिक सुधारणांना अल्पविराम दिला जाण्याची शक्यता आहे."

"गुजरात निवडणुकीत भाजप जिंकली, पण पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरीसुद्धा आर्थिक सुधारणांवर संकट ओढवू शकतं."

निकालावर नजर

"गुजरातमधल्या भाजपच्या पराभवाच्या साशंकतेमुळे बाजारात निर्माण झालेली भीती ही भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये असलेला दोष अधोरेखित करते."

"देशातील लघुउद्योजक आणि सामान्य लोकांना या सुधारणांमुळे काही फायदा होत नसल्याची लोकांमध्ये शंका आहे. सरकारने असा मार्ग निवडायला हवा ज्यामुळे आर्थिक सुधारणांना सामान्य माणसांचा पाठिंबा मिळेल."

"त्यामुळेच गुजरात निवडणुकांच्या निकालामुळे बाजारात होणाऱ्या मोठ्या आर्थिक बदलांसाठी चीनच्या कंपन्यांनी तयार रहायला हवं." असे वेगवेगळे मुद्दे या लेखात मांडण्यात आले आहेत.

तुम्ही हे वाचलंय का?

आवर्जून पाहावं असं

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)